विज्ञान युगातील माणूस मराठी निबंध – Vidnyan Yugatil Manus Marathi Nibandh

विज्ञानयुगातील माणूस हा त्याच्या पूर्वजांपेक्षा फार वेगळा आहे. पूर्वी आपली आजी जात्यावर दळण दळत असे आणि मग चूल पेटवून गरम गरम भाकरी करत असे. आता अगदी खेडोपाडीही विजेवर चालणाऱ्या पिठाच्या गिरण्या व गॅसच्या शेगड्या आल्या आहेत. पूर्वी एका गावाहून दुसऱ्या गावाला निरोप पाठवायचा म्हणजे माणूस पाठवावा लागे.

श्रीमंतांच्या बाबतीत निरोप पोचवण्याचे काम घोडेस्वार करत असे. विज्ञानयुगात तार करून किंवा शक्य असल्यास दूरध्वनीवरून महत्त्वाची बातमी त्वरित कळवली जाते. थोड्याच दिवसांत टेलिफोनवरून बोलणारी माणसे एकमेकांना पाहू पण शकतील.

विज्ञानयुगातील माणूस चंद्रावर जाऊन पोचला आहे. वेगवेगळ्या देशांत होणारे ऑलिम्पिक सामने तो आपल्या घरी बसून दूरदर्शनवर पाहू शकतो. विज्ञानाने माणसाच्या जीवनाला विलक्षण गती लाभली आहे. संगणकामुळे त्या गतीचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अशक्य वाटणाऱ्या असाध्य आजारांवर विज्ञाननिष्ठ माणसाने मात केली आहे. कृषिक्षेत्रातही विज्ञानामुळे विलक्षण समृद्धी आली आहे.

विज्ञानयुगातील माणसाने अक्षरश: गगनाला गवसणी घातली आहे. अथांग आकाशात तो पक्ष्याप्रमाणे मुक्तपणे संचार करू शकतो. खोल सागरातून पाणबुडीच्या मदतीने जलप्रवास करू शकतो. हृदयपरिवर्तन शक्य नसले तरी हृदयाचे आरोपण यशस्वीपणे करू शकतो. चित्रपटाद्वारा तसेच ध्वनिफितीद्वारा असंख्य कलावंतांच्या कलाकृतीना चिरंजीवित्व देऊ शकतो.

असा हा विज्ञानयुगातील प्रगत माणूस सुखी आहे का? याबद्दल मात्र ‘नाही’ असेच उत्तर दयावे लागेल. विज्ञानाच्या वरदानामुळे माणूस. अधिक स्वार्थी व अधिक संहारक बनला आहे. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने विध्वंसक शस्त्रास्त्रे बनवली आहेत. विज्ञानाने जग जवळ आले आहे; पण एक माणूस शेजारच्या माणसापासून कित्येक योजने दूर गेला आहे. हीच तर या प्रगत मानवाच्या जीवनाची शोकांतिका आहे.

विज्ञान युगातील माणूस मराठी निबंध

पुढे वाचा:

Leave a Reply