जर वीज नसती तर मराठी निबंध – Vij Nasti Tar Marathi Nibandh
मानवाने खूप शोध लावले त्यातील एक महत्वाचा शोध विजेचा होता. त्या शोधामुळे मानवाचे सारे जीवनच पालटून गेले. पूर्वी माणसाला सकाळी सूर्य उगवल्यावर उठायला लागायचे आणि सूर्य मावळल्यावर त्याचे सगळे जीवन ठप्प होऊन जायचे. परंतु वीजेचा शोध लागल्यावर मात्र क्रांतीच घडली.
विजेमुळे त्याला दिवा मिळाला, दिव्यामुळे उजेड मिळाला. त्याचा दिवस खूप मोठा झाला. आणि तो त्या अधिक मिळालेल्या वेळात खूप काही करू लागला.
हेच बघा ना, पूर्वी वीज नव्हती तेव्हा फक्त राजेलोकांसाठीच पंखे घेऊन सेवक उभे असत. आज अगदी लहानश्या झोपडीतल्या माणसाकडेही टेबलावर ठेवायचा पंखा असतो. विजेची उपकरणे स्वयंपाकघरात वरदानच ठरली. कुकर, मिक्सर कम ग्राइंडर, वॉशिंग मशीन इत्यादी यंत्रांमुळे स्त्रियांचे घरातील जीवन सुखकर बनले. मग ही वीज नसेल तर काय होईल?
वीज नसेल तर दिवे नाहीत, पंखे नाहीत, टीव्ही नाही, मोबाईल नाही, इस्त्री नाही, कारखाने नाहीत, आगगाड्या नाहीत, माणसांना काम नाही. वीज नसेल तर रात्री सात-साडेसात वाजताच सर्वांची रात्र होईल. वीज नसेल तर सिनेमागृहात सिनेमा कसा दाखवणार?
विजेमुळेच आपण आज आपण एवढी प्रगती करू शकलो. त्यामुळे वीज नसेल तर काय होईल ही कल्पनाही करवत नाही.
वीज गेली तर मराठी निबंध – Vij Nasti Tar Nibandh Marathi
काय झाले ? गाडी का थांबली ? छे काय छान कार्यक्रम होता पण झाले काय ? टी.वी. का बंद झाला ? अरे मेणबत्ती आण. काय हा अंधार!
होय सगळीकडे अंधारच अंधार होईल. नाही का ? अहो ! साधी कल्पना करा… जर वीज गेली तर दिवसाची सुरुवातच कशी होईल? स्वयंपाक घरातील मिक्सर चालणार नाही. मग डब्याला भाजी कशी मिळेल ? गीझर बंद असेल तर गरम पाण्याचे काय ? मग अंघोळीचे तीन तेराच वाजतील.
रेल्वे स्थानकावर काय ? गोंधळच गोंधळ होईल. गर्दीच गर्दी असेल. घरातील टी.वी., फ्रीज यांना तर रजाच मिळेल. शाळेत पुन्हा पूर्वीची घंटा घणघण वाजेल. कारखान्यातील कामगारांना आराम मिळेल. पण देशाचे नुकसान होईल.
रात्री कंदिल आणि वातीशिवाय प्रकाश मिळणार नाही. रस्त्यावर फिरायला मग पुन्हा बॅटरी लागेल. पण सगळीकडे अंधारच अंधार असेल.
वीजच पळाली तर – जर वीज नसती तर मराठी निबंध – Vij Nasti Tar Marathi Nibandh
परवा काय झाले, भर दुपारी आम्ही पंखा लावून घरात बसलो होतो. रविवारचा दिवस त्यामुळे सगळे घरातच होते. बाबा दुपारची झोप काढत होते तर आई टीव्हीवरील कार्यक्रम बघत होती. मी आणि बंटी संगणकावर खेळ खेळत होतो आणि अचानकच वीज गेली की हो… वीज गेल्यामुळे बाबांना पाचच मिनिटांत घामाच्या धारा वाहायला लागल्या आणि खडबडून जाग आली.
आईचा टीव्ही आणि आमचा संगणकही बंद पडला. त्यामुळे आम्हाला तर आमच्या हातातले खेळणेच कुणीतरी हिसकावून घेतले आहे की काय असे वाटले. ही वीज फक्त आपल्याच घरातली गेली आहे की शेजारपाजारची पण गेली आहे ते मी आणि बंटीने लगेच शोधून काढले. तेव्हा कळले की सगळ्यांचीच वीज गेली आहे. म्हणून मग सर्वानुमते ठरले की थोडा वेळ वाट पाहूया. गेलेली वीज दहा मिनिटांत परत आलीसुद्धा परंतु माझ्या मनात विचार आला की दहा मिनिटे वीज गेली तरी एवढे हाल होतात. तर हीच वीज कायमचीच पळाली तर काय होईल? बापरे, त्या कल्पनेनेच मला घाम फुटल्यागत झाले.
खरोखर वीजेमुळे आपल्याला किती सुलभ झाले आहे ना सगळे? थॉमस अल्वा एडिसन ह्या शास्त्रज्ञाने ३१ डिसेंबर, १८७९ ह्या दिवशी पहिल्यांदा वीजेवर चालणारा दिवा लोकांना पेटवून दाखवला आणि त्यानंतर माणसाचे जीवन पार बदलून गेले. खरोखर वीजेचे महत्व आजच्या जीवनात केवढे आहे? .
वीज नसेल तर सारे व्यवहार ठप्प होतील. सर्व कारखाने आणि उद्योगधंदे बंद करावे लागतील कारण वीजेशिवाय त्यांची यंत्रे चालणार तरी कशी? त्यामुळे देशाचे केवढेतरी नुकसान होईल. आज फ्रीज, टीव्ही, मिक्सर, ग्राईंडर, वॉशिंग मशीन, इस्त्री, गीझर, पंखे, दिवे, कुलर, वातानुकुलन यंत्रे, संगणक अशी बरीच यंत्रे आपण रोजच्या जीवनात वापरत असतो. टीव्ही नसेल तर किती चुकल्या- चुकल्यासारखे होते. मग मोबाईलची आणि संगणकाची बॅटरी चार्ज कशी होणार? फ्रीज, मिक्सर नसेल तर केवढी पंचाईत होईल? संगणक क्षेत्र तर सगळेच बंद होईल.
आज आपल्या देशात बाहेरच्या देशातली संगणकावरची भरपूर कामे येतात. त्यामुळे चांगले परकीय चलन मिळते. ते बंद होईल. शिवाय इस्पितळातली बरीच उपकरणेही वीजेवरच चालतात. वीज नसेल तर रोग्यांचे किती हाल होतील? अनेक शस्त्रक्रिया तर करताच येणार नाहीत. मग अंतराळात रॉकेट्स कशी पाठवता येतील? ते तर सोडाच, पण वीजेवर चालणा-या आगगाड्याही बंद कराव्या लागतील. विमानसेवाही वीज नसेल तर शक्य होणार नाही.
त्यामुळे वीज पळाली तर घड्याळाचे काटे उलटे फिरतील आणि आपल्याला पुन्हा मागील काळात जावे लागेल हे मात्र नक्कीच आहे. त्यामुळे वीजेचा तुटवडा जरी असला तरी आहे ती वीज जपून वापरणे, गरज नसताना वीजेची उपकरणे बंद ठेवणे हे तर आपल्या हातात आहेच ना?
पुढे वाचा:
- विहिरीचे मनोगत निबंध मराठी
- विवाहाचे दृश्य निबंध मराठी
- विद्यार्थ्यांनी राजकारण करावे काय?
- विद्यार्थी वर्ग कालचा, आजचा
- विज्ञान एक वरदान निबंध मराठी
- विज्ञान युगातील माणूस मराठी निबंध
- विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
- वायु प्रदूषण निबंध मराठी
- लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम निबंध मराठी
- बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध
- वाचाल तर वाचाल निबंध मराठी
- वाचवील पाणी, साठवील पाणी
- वाचन एक चांगला छंद मराठी निबंध