मी पाहिलेला महापूर निबंध मराठी – Mi Pahilela Mahapur

मी माझ्या आजोळी गावच्या जत्रेसाठी गेले होते. हे गाव येरळा नदीकाठी वसले आहे. यात्रा तीन दिवस असते. निरनिराळ्या दिवशी निराळे कार्यक्रम असतात. यात्रेत शेकडो प्रकारची दुकाने लागलेली असतात. प्रत्येकजण दुरदूरच्या गावाहून आपला माल विकणे व खरेदी करण्यासाठी आलेला असतो त्यामुळे गावाला यात्रेमुळे फार गर्दीचे स्वरुप प्राप्त होते.

आम्ही देखील यात्रेची मजा लूटण्यासाठी घरातून बाहेर पडलो. निरनिराळ्या दुकानातून वस्तू खरेदी करत खाऊ खात आम्ही मनसोक्त हुंदडत होतो. परंतु या यात्रेत दरवर्षी भरणाऱ्या यात्रेप्रमाणे गर्दी नव्हती. सकाळी – सकाळीच यात्रा संपूष्टात येण्याच्या मार्गावर होती. चौकशी करता समजले की गावाला अचानक नदीला आलेल्या पुराने वेढले आहे. व पुराचा लोंढा गावातील लोकांना गिळंकृत करण्यासाठी वाढतच आहे. आम्ही सर्वजण व्यथित भयाने शंकाकूल झालो. पूर कुठेपर्यंत व किती पसरला आहे हे पहाण्यासाठी संपूर्ण गाव नदीकाठी लोटला होता. पण बऱ्याच लोकांच्या किंकाळ्या कानावर पडत होत्या. चौकशी करता समजले की गावातील एक दहाबारा वर्षांचा मुलगा या महापुरात अडकला आहे. त्याची माता व इतर नातेवाईक आक्रोश करत होते परंतु कोणालाच त्या महापूरात झेप घ्यायचे धाडस होत नव्हते. मुलगा आर्ततेने ‘वाचवा – वाचवा’ म्हणून टाहो फोडत होता.

एवढ्यात त्या लोंढ्यात आणखी एक व्यक्ती पोहत जाताना दिसली. तो बहादूर युवक त्याच गावातील पटीचा पोहणारा व हिंमतवान होता. त्याने पोहता पोहताच त्या मुलाला येतो, धीर धर असे सांगून दिलासा दिला.

आता सर्व लोक श्वास थांबवून ही जीवघेणी घटना पहात होते कारण तो बुडणारा मुलगा आता पुराच्या पाण्यात वाहून जात असतानाच त्याच्या जगण्याची आशा बनून तो युवक त्याचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करत होता, स्वत:चा प्राण धोक्यात घालून बहादूरी दाखवत होता.

अत्यंत पराकाष्ठेने त्याला बुडणाऱ्या मुलापर्यंत जाण्यासाठी यश मिळाले. त्याने मुलाला काठापर्यंत आणले व स्वत: अतिश्रमाने बेशुद्ध पडला. गर्दीतील लोकांनी, त्याला उचलून दवाखान्यात आणले. सर्वांना त्याचे कौतुक वाटत होते. त्याला शुद्ध आल्यावर सर्वांनी त्याची वाहवा केली. त्याला ग्रामपंचायतीतर्फे पारितोषिक देण्यात आले.

थोड्या वेळाने नदीचे पाणी थोडे थोडे कमी होऊ लागले. सर्वजण बहादूर युवकाचे नाव ओठावर घेत घरी परतले पण यातूनच जाणवले की अशा शूरवीरांनी आपला देश खऱ्या अर्थाने नावारुपाला पोहचवला आहे. अशा बहादूर युवकांनी हातात शस्त्र घेऊन देशाच्या सीमेवर आपले रक्षण करण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो.

मी पाहिलेला महापूर निबंध मराठी – Mi Pahilela Mahapur

पुढे वाचा:

Leave a Reply