सिंहगडाचे आत्मवृत्त किंवा मी सिंहगड बोलतो आहे – Mi Sinhagad Boltoy Nibandh Marathi

या पाहुण्यांनो या ! मी तुमचा लाडका सिंहगड तुमचे स्वागत करायला उभा आहे. कोठून आलात? काय पाहण्यासाठी आलात? दूरदर्शनचे प्रक्षेपण कसे होते ते पाहण्यासाठी आलात? छान छान ! अशीच जिज्ञासा असावी. मनी वेगवेगळ्या इच्छा बाळगून दरवर्षी हजारो लोक येथे येतात.

कुणाला माझे दर्शन घेण्याची इच्छा असते. कुणाला येथे येऊन महाराष्ट्राचा रम्य भूतकाळ आठवायचा असतो. कुणाच्या मनात शूर वीर तानाजी ठसलेला असतो, तर कुणाला लोकमान्यांचे विश्रांतिस्थान पाहायचे असते. कोणत्याही हेतूने या; पण या ! अहो, हा एकटेपणा मला मुळीच सहन होत नाही.

आज शेकडो वर्षांचा महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास मी पाहत आहे. समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर मी उभा आहे. गेल्या तीनचारशे वर्षांत केवढे विलक्षण बदल होत गेले. माझी नावे सुद्धा बदलत गेली. कधी मी सिंहगड होतो, तर कधी कोंडाणा ! तानाजीसारखा सिंह येथे लढता लढता धारातीर्थी पडला म्हणून मी ‘सिंहगड‘ झालो, ही कथा खोटी आहे; कारण त्यापूर्वीपासूनच माझे नाव ‘सिंहगड’ होते. शिवाजी महाराजांनी मला तीनदा जिंकले आणि दोनदा त्यांना माझा त्याग करावा लागला.

माझ्यावर अनेकांनी सत्ता गाजवली; पण माझ्यावर खराखुरा पराक्रम घडवला तो मात्र नरवीर तानाजीने. आजही त्याची समाधी माझ्याजवळ आहे. या तानाजी-उदय भानूच्या लढाईप्रमाणे १८१८ साली मी शेवटचा लढा इंग्रजांशी दिला. ती झुंजही आठ दिवस चालू होती. शेवटी इंग्रजांनी माझ्यावर आपला झेंडा फडकवलाच आणि मला अक्षरशः लुटून नेले. त्यामुळे मी पार उद्ध्वस्त झालो. .

माझ्याजवळ गोड पाण्याच्या लहान-मोठ्या अठेचाळीस टाक्या आहेत. त्यांतील ‘देवटाके’ लोकांमध्ये विलक्षण प्रिय आहे. अनेक शाळा, कॉलेजांतील मुले, प्रौढ माणसे माझ्याकडे येतात. कल्याण दरवाजा, सुरुंगाचे कोठार, देवटाके, अमृतेश्वर, तानाजीचा कडा समाधी, टेहळणीचा बुरुज, राजारामाची समाधी, लोकमान्यांचा बंगला ही सर्व लोकांची आकर्षणे ठरली आहेत. अनेक तरुण गिर्यारोहणाचा सराव करण्यासाठी येथे येतात, तेव्हा मी रोमांचित होतो; कारण त्यामुळे मला स्मरतो तो शिवरायाचा दिव्य भव्य काळ !”

सिंहगडाचे आत्मवृत्त किंवा मी सिंहगड बोलतो आहे – Mi Sinhagad Boltoy Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply