पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत – Pinjryatil Poptache Manogat in Marathi
मी पिंजऱ्यातला पोपट. आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही माणसे तुमच्या आनंदासाठी आम्हांला पकडता, घरी आणता आणि पिंजऱ्यात ठेवता. पण आम्हांला काय वाटत असेल, याचा विचार तुम्ही माणसे करत नाहीत.
हेच बघा ना! या घरात आज अनेक वर्षे मला पिंजऱ्यात ठेवलेले आहे. ही घरातील माणसे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला आवडणारे पदार्थ खायला देतात. माझ्यासाठी खास पेरू आणतात. माझे नेहमी कौतुक करतात. येणाऱ्या पाहुण्यांपुढे माझे प्रदर्शन करतात. मला नवे नवे शब्द बोलायला शिकवतात. पण मला खरोखरीच काय हवे आहे, ते हे लोक समजून घेत नाहीत.
मला स्वातंत्र्य हवे आहे. अगदी सोन्याचा पिंजरा असला, तरी तो मला नकोसा वाटतो. मला रानात मुक्तपणे विहार करायचा आहे. माझ्या भाऊबंदांबरोबर मला मोकळ्या आकाशात उडायचे आहे. मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, तुम्ही माणसे स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी झगडता, युद्धही करता; मग आमचे स्वातंत्र्य मात्र कसे हिरावून घेता?
मला आता या पिंजऱ्यातून मुक्त करा. मी तुम्हांला रोज भेटायला येईन.
पोपटाचे मनोगत – Poptache Manogat in Marathi
एके दिवशी शाळा संपल्यावर माझ्या एका मित्राने मला घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी आणलेली भेट पहाण्यासाठी तो मला घेऊन गेला. ती भेट म्हणजे एक छानसा पोपट होता. पिंजऱ्यातील तो पोपट पाहून मलाही खूप आनंद झाला. मित्राने त्याचे नाव रामू असे ठेवले होते. आम्ही त्या पोपटाशी खेळलो. त्याला पेरु व हिरव्या मिरच्या खायला दिल्या. नंतर आम्ही त्याला बोलायला शिकवू लागलो. शिकवत असताना तोच आमच्याशी बोलू लागला आम्हाला खूपच आश्चर्य वाटले.
‘मला बोलताना पाहून आश्चर्य वाटले ना?” रामू म्हणाला, “पण तुम्हाला माहितच आहे आम्ही पोपट तुमच्यासारखेच बोलू शकतो ते. आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. माझा जन्म एका मोठ्या झाडावर झाला. मी व माझे कुटुंब एका सुंदरशा घरट्यात रहात होतो. माझी आई मला अनेक प्रकारची फळे, अळया, धान्य खायला आणून देई. मी मोठा झालो व पंखात बळ आले तसे मी आकाशात मजेत उडायला लागलो. मला बरेच मित्रही मिळाले. आम्ही सर्वजण दिवसभर फिरायचो आणि ताजी फळे, शेतातील धान्य याच्यावर ताव मारायचो. संध्याकाळी घरटयाकडे परतायचो अतिशय मजेचे दिवस होते ते. पण मला माझ्या भविष्यात काय आहे ते माहित नव्हते.
एके दिवशी, दाणे टिपत असताना दुर्दैवाने माझा पाय एका जाळ्यात अडकला. मी त्या जाळ्यातुन बाहेर पडू शकलो नाही. माझे मित्रही मला मदत करु शकले नाही. काही वेळाने एक पारधी तेथे आला, त्याने मला जाळ्यातून सोडविले व माझे पाय बांधले. नंतर एका पिंजऱ्यात घालून तो मला एका दुकानात घेऊन गेला. मी त्या दुकानात बरेच दिवस होतो. दोन दिवसांपूर्वी तुझे वडिल आले व त्यांनी तुझ्यासाठी मला खरेदी केले.
तू माझी सर्व प्रकारची काळजी घेतोस. मला ताजी व गोड फळे देतोस. माझा पिंजराही सुंदर आहे. मला माहित आहे तुझे माझ्यावर प्रेम आहे. पण मी मात्र येथे अतिशय दु:खात आहे. विचार करा, तुम्हाला असे कोंडून ठेवले तर तुम्हाला आनंद वाटेल का? माझेही तसेच आहे. मला या सोनेरी पिंजऱ्याचा वीट आलाय. मला माझे पूर्वीचे दिवस आठवतात. तुम्ही मानव आपल्या स्वातंत्र्याविषयी इतके जागृत असता मग आम्हाला का कोंडून ठेवता? हीच माझी कहाणी आहे. आता तुम्हीच ठरवा, मला सोडून द्यायचे की डांबून ठेवायचे ते.” रामू त्यानंतर गप्प झाला. आम्हाला वाटले तो जणू रडतो आहे.
माझ्या मित्राने आणि मी एकमेकांकडे पाहिले. आम्हाला रामुच्या भावना कळल्या होत्या. माझ्या मित्राने पिंजरा गच्चीत नेला आणि त्याचे दार उघडले. रामू एक क्षण तसाच बसून राहीला व हळूच पिंजऱ्याच्या बाहेर आला. गच्चीच्या कठड्यावर बसून त्याने आमच्याकडे पाहिले. मग त्याने पंख पसरले आणि पुढच्या क्षणी आकाशात झेपावला. आम्ही त्याच्याकडे पाहत राहिलो, तो दिसेनासा होईपर्यंत.
पाळीव पोपटाचे मनोगत – Autobiography of Parrot in Marathi
एके दिवशी गंमतच झाली. पिंजऱ्यातील पोपट बाहेर आला आणि आम्ही त्याला शिकवलेल्या शब्दांपेक्षा वेगळेच काही बोलू लागला. तेव्हा आम्हा सर्वांना नवल वाटले आणि घरातली सारी माणसे त्याच्याभोवती जमली. पोपट सांगत होता, “हल्ली तुम्ही माझ्या पिंजऱ्याचे दार उघडे ठेवता. पण मी पिंजऱ्याबाहेर सहसा येत नाही. कारण वर्षानुवर्षे या पिंजऱ्यात राहिल्याने मला आता पिंजरा हेच आपले घर वाटू लागले आहे. बाहेरच्या जगाचे मला थोडेही आकर्षण राहिले नाही.
तुमच्याकडे येण्यापूर्वी मी माझ्या आईवडलांसह रानात मोकळे जीवन जगत होतो, त्यावेळी मी अगदी लहान होतो. ‘कसे उडायचे’ हेही मला अवगत नव्हते. आईवडील माझ्यासाठी खाऊ आणायला गेल्यावर मी झाडाच्या ढोलीत त्यांची वाट पाहत राहत असे. याच प्रचंड झाडाच्या ढोलीमध्ये इतर पोपटांची वस्ती होती. त्यामुळे त्यांच्या छोट्यांबरोबर असे ! खेळण्यात, उडण्याचा सराव करण्यात माझा वेळ किती छान जात
अचानक तो घातवार उजाडला. एका पक्षिविक्याने मला पकडले. त्याच्याकडून मी तुमच्या घरी आलो. तुम्ही पहिल्या दिवसापासून माझे कौतुक करत आहात. मला खाऊपिऊ घालत आहात. लाडाने माझ्याशी बोलत आहात. तेव्हा तुमच्या व जगाच्या दृष्टीने मी येथे सुखी आहे. पण खरे पाहता, मी सुखी नाही. कारण माझे स्वातंत्र्य मी कायमचे गमावले आहे. आकाशात मी केव्हाच उंच भरारी मारली नाही. आता तुम्ही मला मुक्त केलेत, तरी स्वतंत्र जगात मी जगूच शकणार नाही. आता माझे एकच सांगणे आहे की, माझ्या मृत्यूनंतर हा पिंजरा फेकून दया. दुसऱ्या कोणालाही कदापिही गुलाम करू नका.”
पुढे वाचा:
- पिंजऱ्यातील पक्षांचे आत्मवृत्त
- पावसाळ्यातील निसर्ग निबंध मराठी
- पावसाळ्यातील गमती जमती निबंध मराठी
- पावसाळ्यातील एक दिवस निबंध लेखन
- पाणी मराठी निबंध मराठी
- पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
- पाचवीतील पहिला दिवस निबंध मराठी
- पाखरांची शाळा निबंध मराठी
- पाऊस पडला नाही तर निबंध मराठी
- पहाटेचा फेरफटका निबंध मराठी
- पर्यटन निबंध मराठी
- परोपकारासाठी झटावे निबंध लेखन
- परोपकार निबंध मराठी
- परीक्षा रद्द झाल्या तर निबंध लेखन
- परीक्षा नसती तर मराठी निबंध