पावसाळ्यातील गमती जमती निबंध मराठी – Pavsalyatil Gamti Jamti Nibandh

“येरे-येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा.” मे महिन्याचा उन्हाचा ताप कधी संपतो नि गार-गार करणारा पावसाळा कधी सुरू होतो याची सर्वजण वाट पाहत असतात. उन्हाने हैराण झालेले पशु, पक्षी, माणसे, मुले पावसाने तृप्त होतात म्हणून मुलेही पावसात आनंदाने नाचू लागतात. शाळेची सुरूवात नवा वर्ग, नवे मित्र यांचे स्वागत देखील पावसानेच होते.

खूप पाऊस झाला की शाळेला सुट्टी असते. आई गरमगरम वडे तळते. सर्व रस्ते, मैदाने, पाण्याने भरुन जातात. नद्यानाले तुडूंब भरुन वाहू लागतात. अंगणातील तळ्यात मुले कागदी नावा सोडतात, बेडूक डराव-डराव करतात. पावसाळ्यात मातीचा सुगंध येतो. झाडांची पाने टवटवीत ताजी तवानी होतात. सर्व तरुण मुले धबधब्याच्या ठिकाणी सहली काढतात. आकाशात वीजांचा कडकडाट झाला की. लहान बाळे आईला पकडून बसतात. पावसाळ्यात मैदान हिरव्या गवताच्या गालिच्या प्रमाणे दिसते, जणू काही अलंकार घातलेली हिरव्या शालूतील नववधुच !

” श्रावणात ऊन-पाऊस तरी लपंडाव खेळत असतात “आला पाऊस गेला पाऊस मुले लागली नाचू.” पावसाळ्यात सर्वजण रेनकोट छत्र्या, गमबूट या वेशात निराळेच दिसतात. पाऊस गरीब-श्रीमंतांना सारख्याच आनंद देतो. शेतकरी, कामकरी यांना तो वरदानच वाटतो.

‘जो न देख सके रवी वो देख सके कवी’ या उक्तीप्रमाणे कवींच्या मधील काव्यप्रतिभा पावसाळ्यात जागृत होते. कोणाला पाऊस बालकाप्रमाणे खट्याळ भासतो. कोणाला नववधुप्रमाणे लाजरा बुजरा वाटतो. नवयुवकांना पावसाळ्यात जणू नवचैतन्य प्राप्त होते. धुंद होत पावसात भिजण्याचा आनंद काही आगळाच. वृद्धांना आपल्या तरुणपणाची आठवण देणारा पावसाळा सर्वांना सुखावतो.

निरनिराळ्या रंगांचे रेनकोट, छत्र्यांतून जाणारा जनसमुदाय पावसाळ्यात विशेष ताजातवाना, टवटवीत वाटतो. मनुष्याप्रमाणे प्राणीमात्रही पावसाने प्रेरित होतात. इवलाले पंख फडफडवत आपल्या घरट्यातून पावसाची गंमत पहात रहातात. प्राणी आपल्या निवाऱ्यात आळसावतात.

अशा प्रकारे आबालवृद्धांना सुखावणारा पावसाळा सजीवांना वरदानच आहे.

पावसाळ्यातील गमती जमती निबंध मराठी – Pavsalyatil Gamti Jamti Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply