पावसाळ्यातील एक दिवस निबंध लेखन – Pavsalyatil Ek Divas Nibandh

भारतात वेगवेगळे ऋतू अनुभवायला मिळतात. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे सर्वच ऋतू महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे. पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुगंध मला अतिशय प्रिय आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पावसाला फार महत्त्व आहे. नदी, कालवे, तलाव, विहिरी असून ही पावसाची सदा गरज असते.

जून महिना होता. शाळा उघडल्या होत्या. कित्येक दिवसांपासून तापमान वाढलेले होते. रस्ते, घरे, चहू कडे आगीचा वर्षाव होता होता. शाळेत फार कठीण परिस्थिती होती. पत्रे खूप तापले होते. पंख्याचे वारे पण उष्णच येत होते. तीन वाजण्याची वेळ असेल. अचानक जोरदार वारे वाहू लागले. आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. खिडक्याची दारे आपटू लागली. चहूकडे अंधार पडला. खोलीत लाईट नव्हता, असे वाटले जणू रात्रच झाली. मास्तरांनी शिकविणे नाइलाजाने बंद केले. वाऱ्याचा वेग वाढला आणि सुरुवातीला हळूहळू येणाऱ्या पावसाचा वेग काही वेळातच वाढला. विजा कडाडू लागल्या. पत्र्यावर पावसाचे थेंब वाजू लागले. थोड्याच वेळात मोडक्या खिडकीतून पाण्याचे तुषार आत येऊ लागले. पाहता पाहता आणखी ढग आले. असे वाटत होते की जणू आकाशाला कोणी शाईच लावली आहे. शाळेच्या खोल्या ओल्या झाल्या, मैदानात पाणी जमू लागले. तितक्यात एका खोडकर मुलाने गोंधळ माजविला की पाण्यात वीज उतरली आहे. सगळे शिक्षक बाहेर आले. मुलांना शाळेतून बाहेर काढले. मुख्याध्यापकांनी सुट्टीची घंटा वाजविण्यास सांगितले.

पाऊस कमी झाला होता पण थांबला नव्हता. शाळेत येताना मी छत्री आणली नव्हती त्यामुळे घरी जाताना भिजलो, रस्त्याच्या उतारावर पाणी जमले होते. वाहतूक जवळपास बंद झाली होती. काही लोक छत्री घेऊन उभे होते. बरेचसे लोक भिजले होते. शाळेजवळच्या खड्डयात पाणी जमले होते. सगळे रस्ते स्वच्छ धुतले गेले होते. पक्षी झाडांवर किलबिल करु लागले वातावरण थंड झाले. झाडेही पावसात न्हाऊन आनंदाने डोलत होती. आम्ही रस्त्याच्या कडेला साठलेल्या पाण्यात उडया मारायला व कागदांच्या बोटी सोडायला सुरुवात केली. घरी पोहोचलो तेव्हा मी चिखलाने पूर्ण मारवलो होतो, आईने मला हात-पाय धुउन कपडे बदलण्यास सांगितले. मग गरम दूध व नाश्ता दिला. अशा प्रकारे पावसाळयातीला हा पहिला दिवस मी मजेत घालवला.

पावसाळ्यातील एक दिवस निबंध – Pavsalyatil Ek Divas Nibandh

“असे हे जगाचे फिरे चक्र बाळा

हिवाळा, उन्हाळा, पुन्हा पावसाळा’

असं एक गीत ‘नंदिनी’ नावाच्या मराठी चित्रपटात आहे. त्या पावसाच्या आगमनाची प्रत्येकजणच प्रतिक्षा करत असतो. ग्रीष्माने तप्त झालेल्या धरणीला चैतन्य देणारा, मानवी मनावर सुखाची बरसात करतो तो हा पाऊस. याच पावसाळ्यात एक दिवस सहलीला जायचं आम्ही ठरवलं.

सहलीला कुठं जायचं, याची चर्चा सुरू झाली. शेवटी आमच्या चाळीतल्या लोकांनी ‘लोणावळा’ हे ठिकाण निश्चित केलं. पस्तीस जणांची बस बुक करून आम्ही लोणावळ्याला जायचा दिवस ठरवला. रविवार उजाडला. सकाळी सहा वाजताच आम्ही निघालो आणि अवघ्या दोन-अडीच तासात ‘भुशी डॅम’ येथे आम्ही पोचलो. मात्र अजून पावसाचं काहीच चिन्ह दिसत नव्हतं. पावसाळ्यातील सहल पावसाशिवायच अनुभवायला लागते की काय, अशी शंका मनात येत होती. आम्ही भुशी डॅमच्या पायऱ्यांवर बसलो होतो. अनेकजण आले होते. कोणी अंताक्षरी खेळत होते, तर कोणी त्या पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटण्याची वाट पहात होते.

इतक्यात आभाळ भरून आलं. आभाळात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि थोड्याच वेळात पावसाला सुरूवात झाली. आम्ही कमालीचे खुश झालो होतो. डॅमवर पायऱ्यांच्या एका बाजूला एक बाई शेगडीवर कणसं भाजून विकत होत्या. गरमागरम कणसं म्हणजे ‘भुट्टा’. तो खाण्यात एक वेगळीच गंमत होती. आम्ही सुद्धा ती कणसं विकत घ्यायचं ठरवलं. इतक्यात कुणाचा तरी त्या शेगडीला धक्का लागला आणि त्यातले कोळसे आणि त्यावरची कणसं पायऱ्यांवरून खाली आली. कोळसा एका माणसाच्या पाठीवर पडला. एवढ्या थंडगार पाण्यात गरम चटका कसा लागला, म्हणून तो पाठी वळून बघू लागला. ती बाई पडलेली कणसं गोळा करण्यासाठी धावत खाली येत होती. लोकांना काय घडतंय, याची कल्पनाच येत नव्हती. काही जण तर ती पडलेली कणसं वेचून खाऊही लागले होते. •

भुशी डॅममधील पाण्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटल्यानंतर आम्ही खंडाळ्याच्या घाटात पावसामुळे जे झरे, धबधबे निर्माण होतात, तिथे जायचं ठरवलं. आम्ही तिथे गेलो. त्या डोंगरातून चालताना मनाला एक वेगळाच आनंद होत होता. आमच्यातील काही जणांना ट्रेकींगचा अनुभव होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खंडाळ्याच्या घाटातल्याच त्या छोट्या पाऊलवाटेनं धबधब्याकडे जाऊ लागलो. पण तिथे जे दृश्य पाहिलं, ते पाहून मन सुन्न झालं. काही कॉलेज तरूण त्या कपारीत मद्यपान करत होते. वेफर्सच्या पुड्या तशाच टाकलेल्या होत्या. दारूच्या बाटल्यादेखील त्या जागी पडून होत्या. तिथे जाणं ‘सुरक्षित’ नसल्याने आम्ही आमचा मार्ग बदलला.

खंडाळ्याला एका गृहस्थांचा बंगला होता. तिथेच एंजॉय करण्याचं आम्ही ठरवलं. पाऊस अजूनही सुरूच होता. तो हिरवागार निसर्ग पाहून मन एका वेगळ्याच विश्वात रमू लागलं. बंगल्यात गेल्यावर आमच्यातील काही जण पावसाची गाणी म्हणणार होते. झुणका-भाकर, कांदाभजी आणि पुलाव अशा जेवणाची आचाऱ्यांना ऑर्डर दिली होती.

बंगल्यात उतरलो. एव्हाना भिजण्याची हौस फिटली होती. थोड्या वेळानं रंगू लागली पावसाची गाणी ! ओ, आई, मला पावसात जाऊ दे’ पासून ‘सर्जा’ चित्रपटातल्या ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ पर्यंत अनेक गाणी सादर केली गेली. संध्याकाळी त्या हिरव्यागार निसर्गाचं रूप डोळ्यात साठवून आमची बस मुंबईच्या दिशेनं निघाली. मनाचा शीण दूर झाला होता. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा तेच रुटीन सुरू होणार होतं. शाळा, अभ्यास, क्लास आणि पंधरा दिवसांनी असणाऱ्या परीक्षेची करावी लागणारी तयारी…

पावसाळ्यातील एक दिवस निबंध लेखन – Pavsalyatil Ek Divas Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply