पहाटेचा फेरफटका निबंध मराठी – Pahatecha Ferfatka Nibandh Marathi

पहाटेची वेळ किती रमणीय असते ना? सूर्य पूर्व दिशेकडून वरती यायला निघालेला असतो. आकाशात लाल, केशरी रंगांची उधळण झालेली असते. पोपट, चिमण्या आणि इतर अनेक पक्षी झोपेतून उठून किलबिल करू लागले असतात. वा-याची थंडगार झुळुक येत असते. अशा हवेवर फिरायला किती छान वाटते ना?

आमच्या मुंबईत ही अशी पहाट हरवूनच गेली आहे. कारण आम्हा मुलांना सकाळी उठून क्लासला नाहीतर दप्तराचे ओझे पाठीवर घेऊन बसने शाळेत जायचे असते. पहाटे फिरायला इथे वेळ आहे कुणाला? परंतु उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुट्टीच्या वेळेस मात्र हा पहाटेच्या फेरफटक्याचा आनंद मी भरपूर घेतो बरे का.

बहुदा सुट्टीत मी गावालाच जातो. आमच्या गावाचे नाव चौल आहे. तिथे दत्ताची एक छान टेकडी आहे. रोज पहाटे आम्ही मुले फिरायला बाहेर पडतो तेव्हा आपोआपच आमचे पाय दत्ताच्या टेकडीकडे वळतात. टेकडीवर चढायचे म्हणजे सोप्पे काम नाही. परंतु आम्ही लहान मुले टणाटण उड्या मारत चढतो. जाताना वाटेत करवंदाच्या जाळ्या लागतात. तिथली करवंदे वेचून खाणे हा आमचा आवडता उद्योग असतो.टेकडीच्या शिखरावर गेले की तिथे एक दत्तमंदिर आहे. मंदिरातल्या थंडगार फरशीवर पाय ठेवला तरी खूप छान वाटते.

दत्ताला नमस्कार करून आम्ही मंदिराबाहेर येतो तेव्हा उंचावरून सगळा गाव केवढा सुंदर दिसतो म्हणून सांगू? सगळीकडे हिरव्यागार वाड्या दिसतात, त्यातच झुलणारे माड आणि पोफळी दिसतात. चौलचा समुद्रकिनारा आणि त्यावरले सुरूचे बनही टेकडीवरून दिसते. जरा वेळाने उन्हें वरती येऊ लागली की आमचा हा पहाटेचा फेरफटका आम्हाला आवरता घ्यावा लागतो.

कधीकधी आम्ही समुद्रावरही फिरायला जातो. ओल्या वाळूत फिरणे, सायकल चालवणे, चेंडूने खेळणे हे उद्योग आम्ही तेव्हा करतो. त्याशिवाय सुरूच्या बनात जाऊन ‘खांब खांब खांबोली’ हा खेळसुद्धा खेळतो.

मात्र जरा वेळाने सूर्यबाप्पा वरती येऊ लागला की मात्र थोड्याच वेळात उन्हाचे चटके बसू लागतात आणि घामाच्या धारा वाहू लागतात. मग मात्र आम्ही तिथून लग्गेच निघतो.

असा होतो आमचा सकाळचा फेरफटका.

पुढे वाचा:

Leave a Reply