वस्तूसंग्रहालयास भेट निबंध मराठी – Vastu Sangrahalayas Bhet Nibandh Marathi

दर वर्षी आमच्या शाळेतून आम्हाला शैक्षणिक सहलीसाठी एक दिवस नेतात. ह्या वर्षी आम्हाला शाळेने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे आमच्या मुंबईतील वस्तुसंग्रहालय दाखवावयास नेले होते. ते पाहून मला असे वाटले की आपण भूतकाळातली सहलच करून आलो की काय?

ह्या वस्तुसंग्रहालयाची स्थापना १० जानेवारी, १९२२ रोजी म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी करण्यात आली. त्या वेळेस त्या संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालय असे होते. स्वातंत्र्यानंतर गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्यासाठी आपण त्याचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असे केले आहे.

आज मुंबईतील फोर्ट भागातील काला घोडा येथे ही ऐतिहासिक वारसा असलेली इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. युनेस्कोने तिला जागतिक वारसा असलेली इमारत म्हणून घोषित केले आहे. तिथे एवढ्या वेगवेगळ्या वस्तू मांडून ठेवल्या होत्या की आम्ही सर्व मुले ते पाहून अगदी दंगच होऊन गेलो. नंतर आम्हाला अशी माहिती कळली की तिथे एकुण ५०००० वस्तू आहेत. खरोखरच एक दिवसात हे संग्रहालय संपूर्ण पाहाणे अशक्यच आहे. तरी आम्ही काही मुख्यमुख्य गोष्टी पाहिल्या. तिथे प्रामुख्याने तीन विभाग आहेत. कलाविभाग, उत्खनन विभाग आणि नैसर्गिक इतिहास विभाग. त्याशिवाय आणखीही नवीन दालने उघडण्यात आली आहेत.

सर दोराब टाटा, सर रतन टाटा आणि सर पुरूषोत्तम मावजी ह्यांनी आपल्या वैयक्तिक कलासंग्रहातील वस्तू ह्या संग्रहालयाला दान दिल्या आहेत. कला दालनात प्रामुख्याने त्यातील वस्तू आम्हाला दिसल्या. मुघल, राजस्थानी, पहाडी आणि दखनी ह्या चार प्रकारातील चित्रे तिथे होती.

तसेच अकराव्या आणि बाराव्या शतकातील भूर्जपत्रावर लिहिलेले लेखही तिथे होते. त्याशिवाय पितळेच्या सुबक मूर्ती तिथे होत्या, हस्तीदंताच्या विभागात तर कलात्मक वस्तूंची लयलूट होती. त्यातील काही वस्तू नाजूक चिनी माती आणि हस्तीदंत ह्यातून घडवलेल्या होत्या. सम्राट अकबराच्या दरबारातील काही चित्रे तिथे होती ते पाहून आम्ही तोंडात बोटेच घातली. उत्खनन विभागात आम्हाला दगडी कलात्मक मूर्ती, स्तूप, वेगवेगळ्या काळातील नाणी, वेगवेगळ्या काळातील तलवारी, शस्त्रे, चिलखते अशा वस्तूंनी सजला होता. त्यातील एकेक शस्त्र एवढे जड वाटत होते की ते उचलून लढत कसे असतील असा प्रश्नच आम्हा मुलांना पडला.

आपल्या भारताची संस्कृती किती प्राचीन आहे, आपल्या परंपरा किती समृद्ध आहेत हे आम्हाला संग्रहालय पाहाताना चांगलेच उमजले. भूतकाळाचा हा वारसा जतन करण्याबद्दलची आणि नवीन पिढीपर्यंत पोचवण्याबद्दलची लोकजागृती होत आहे ह्यात काही वादच नाही.

संग्रहालयास भेट निबंध मराठी – Vastu Sangrahalayas Bhet Nibandh Marathi

संग्रहालय हे माहिती व ज्ञान यांचे भांडार असते. येथे आपल्याला भुतकाळातील वैभवाची ओळख होते. येथील कला, इतिहास आणि विज्ञानाशी संबंधित वस्तू आपल्या जुन्या संस्कृतीची साक्ष देतात. माझ्या मागच्या उन्हाळयाच्या सुटीत मी मुंबईच्या एका प्रसिद्ध संग्रहालयास भेट दिली. मी माझे आई-वडिल व बहिण यांच्या सोबत तेथे गेलो होतो. मुंबईचे हे संग्रहालय अतिशय मोठे व प्रसिद्ध आहे. तेथे निरनिराळ्या विषयांचे वेगवेगळे विभाग आहेत. अनेक दुर्मिळ वस्तू तेथे व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत. प्रत्येक वस्तुचे नाव व थोडक्यात माहिती लिहीलेली आहे.

या संग्रहालयातील पहिल्या विभागात देशातील विविध ठिकाणांहून खोदलेल्या वस्तू ठेवलेल्या होत्या. यात अनेक शिल्पकलेचे नमुने, मूर्ती, दागिने व मोठ-मोठी भांडी होती. अनेक देव-देवतांचे मातीचे व धातुचे पुतळे होते. जुन्या पद्धतीची चूल मी तेथे पहिल्यांदा पाहिली. त्यानंतरचा विभाग शस्त्रात्रांचा होता. यात वेगवेगळ्या राजा-महाराजांची शस्त्रे, धनुष्य-बाण, तलवारी, भाले, ढाली व इतर साधने ठेवलेली होती. राजांचे पोशाख, मुकुट इत्यादिही ठेवलेले होते. त्यानंतर आम्ही ऐतिहासिक विभागास भेट दिली. येथे जुने ग्रंथ, पोथ्या ठेवलेल्या होत्या. भुर्जपत्रावर लिहीलेल्या रामायण व महाभारताच्या प्रती मी तेथे पाहिल्या. या ग्रंथांमधील प्रसंगांची चित्रेही होती, एका बाजूला जुन्या नाण्यांचा संग्रह होता. जुन्या पद्धतीची टांकसाळ व नाणी पाडण्याची प्रक्रिया यांचे एक मॉडेल ठेवलेले होते. आम्ही हस्तकला व कलादालनही पाहिले. येथे जुन्या पद्धतीचे पोशाख, साड्या, धातुच्या वस्तु, संगीतातील साधने इत्यादि ठेवलेले होते. विविध संगीत साधने म्हणजे वीणा, तंबोरा, ढोलक याबद्दलची माहिती व त्यांची नावे मी तेथे पाहिले.

सर्वात शेवटी प्रकाशन दालन होते. तेथे अनेक प्रकारचे नकाशे, गाइड्स, संशोधित पत्रके, पोस्टकार्ड इत्यादी ठेवलेले होते. संग्रहालयातील वस्तुंची चित्रे व भेटकार्ड होती. आम्ही काही भेटकार्ड व मुंबईची माहिती देणारे एक पुस्तक विकत घेतले. मला हे संग्रहालय खुपच आवडले. आमची ही भेट खरोखर मनोरंजक व ज्ञानप्रद होती.

पुढे वाचा:

Leave a Reply