Set 1: वसंत ऋतू निबंध मराठी – Vasant Rutu Nibandh Marathi

शिशिर ऋतूतील पानांची पानझड आता थांबली होती. वसंत ऋतूच्या आगमनाची सारेच आतुरतेने वाट पाहत होते. बहरलेल्या सृष्टीचे छायाचित्र टिपायला सारेच आसुसलेले होते.

वसंत ऋतूला ‘ऋतुराज’ ही दिलेली उपमा प्रफुल्लित झालेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती सार्थच आहे असे वाटते. सृष्टीच्या नसानसांत नवचैतन्य निर्माण झाले होते. झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्याने वृक्षतरुंना फुटलेली नव पालवी न्याहाळताना मन प्रसन्न होत होते. सारी सृष्टीच सप्तरंगांची उधळण करीत आहे असे दृश्य सगळीकडेच !दिसत होते.

सृष्टीतील विविध फुलझाडांवर, वृक्षलतांवर आलेली मधुर सुवासिक फुले, त्यांचा मकरंद टिपण्यासाठी घोंगावणाऱ्या मधमाशा, असे दृश्य जिकडे-तिकडे पाहायला मिळत होते. वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या गोड, मंजूळ आवाजाने, सप्तसुराने कोकिळेने सारी सृष्टीच व्यापून टाकली होती.

वसंतोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच ! या ऋतूतील वातावरण आल्हाददायी असते. सृष्टीला नवसंजीवनी प्राप्त झालेली असते. म्हणूनच वसंताच्या आगमनाचे स्वागत आपण होळी पौर्णिमेने आणि रंगपंचमीने करतो. या सणादिवशी सारा देश रंगात न्हालेला असतो. म्हणूनच वसंत ऋतूला मिळालेली ‘ऋतुराज’ ही पदवी सार्थ वाटते.

Set 2: वसंत ऋतू निबंध मराठी – Spring season essay in Marathi

मौसमी हवामान असलेल्या आपल्या देशाला देवाने निसर्गसौंदर्याचा खजिनाच बहाल केला आहे. भारतातील निसर्गाचे निरीक्षण केले तर आपल्याला सहा ऋतू स्पष्टपणे दिसून येतात. हे सहा ऋतू आहेत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर.ह्या प्रत्येक ऋतूचा कालावधी साधारण दोन महिन्यांचा असतो. ह्यातील प्रत्येक ऋतूत आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे स्वरूप दिसते.

ह्या सर्व ऋतूंचा राजा आहे वसंत. ह्याचा काळ फाल्गुन महिना ते चैत्र महिना असा असतो. ह्या ऋतूत फारशी थंडीही नसते आणि फारसा उष्माही नसतो. त्यामुळे वातावरण अगदी आल्हादकारी असते. शिशिरात पाने गळून गेलेल्या झाडांना नवीन पालवी ह्याच काळात फुटते. कोकिळ मधुर स्वरात गाऊ लागतात. आंब्याला नवा मोहर येतो. अनेक प्रकारची फुले फुलतात. त्यांचा मंद मंद सुगंध वारा सगळीकडे पसरतो.

फुलपाखरे आणि भुंगे नुकत्याच फुललेल्या फुलांवर भिरभिरू लागतात. शेतात डोलणारी रब्बीची पिके पाहून शेतकरी राजा आनंदलेला असतो. चंद्राचे शीतल चांदणे सा-या जगाला सुखावत असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळेच सृष्टी नव्या नवरीसारखी सजलेली आहे की काय असा भास होऊ लागतो.

चैत्र महिना सुरू झाला की हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते. नव्या वर्षाचे स्वागत म्हणून चैत्रातल्या दाराबाहेर गुढी उभारतात. म्हणून ह्या पाडव्याला गुढी पाडवा असेही म्हणतात. त्याशिवाय होळी, रामनवमी आणि हनुमान जयंती हे सणही ह्या महिन्यात येतात. आसपासचा निसर्ग उल्हसित असला की माणसाचे मनही उल्हसित होते. म्हणून वसंतऋतूला ऋतूंचा राजा असे म्हटले आहे. परंतु हल्ली शहरीकरण झालेले असल्यामुळे शहरात झाडांची संख्या कमालीची घटली आहे.

त्यामुळे निसर्गातील हे ऋतूवैभव पाहाण्यास आपण मुकलो आहोत. केवळ पुस्तकातूनच आपल्याला वसंतऋतूचे वैभव काय असते हे वाचावे लागते ह्याचे फार वाईट वाटते. त्याशिवाय प्रदूषणामुळे हल्ली ऋतूही बदलले आहेत त्यामुळे जुन्या संस्कृत साहित्यातील कालिदासांसारख्या कवींनी वर्णिलेले वसंतवैभव आता उरले नाही असे म्हणावे लागते.

Set 3: वसंत ऋतू निबंध मराठी – Essay On Spring Season in Marathi

भारत नैसर्गिक सौंदर्याचे भांडार आहे. इथे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर ऋतू क्रमाने येतात. प्रत्येकाचा कालावधी दोन महिने असतो. निसर्ग मनुष्याचा मित्र बनून त्याला आपल्या जादूंनी मंत्रमुग्ध करतो. प्रत्येक ऋतू आपणास काही तरी संदेश देतो ज्यामुळे जीवन उत्साहाने भरून जाते.

ऋतूंचा राजा वसंत आहे. त्याला ‘ऋतुराज’ म्हणतात. याचा काळ फाल्गुन ते चैत्र ते असतो. या ऋतूत थंडीही जास्त नसते व उष्णताही जास्त नसते. त्यामुळे वातावरण आल्हाददायक असते. निसर्ग एखाद्या नववधूप्रमाणे साजशृंगार करतो. वृक्षांना नवी पालवी फुटते. कोकिळा मधुर स्वरात गीत गाते. आम्रवृक्षाला मोहोर येतो. अनेक प्रकारची फुले फुलतात. त्यांचा मंद मंद सुगंध येतो. फुलपाखरे या फुलांवर भिरभिरतात. शेतात डोलणारे गव्हाचे पीक पाहून शेतकरी खुश होतो. वारा वाहत असतो. चंद्राचे शीतल चांदणे पडते.

वसंतपंचमीच्या दिवसाने लोक वसंत ऋतूचे स्वागत करतात. यादिवशी पिवळे वस्त्र धारण करतात. शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सामूहिक नृत्य केले जाते. घरांत पक्वान्ने बनविली जातात. लहान थोर सगळेच आनंदात असतात.

वसंत ऋतूत संवत् वर्षाची (नव वर्ष) सुरवात होते. यादिवशी सरस्वतीची पूजा केली जाते. शिक्षण सुरू करण्यासाठी नववर्ष दिन सर्वोत्तम मानला जातो. रामनवमी आणि होळी हे सण याच ऋतूत येतात. गुढीपाडव्यापासून हिंदूंच्या नववर्षाची सुरवात होते.

निसर्गात उत्साही वातावरण असले की आपले मन पण प्रफुल्लित होते. मनाची प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते. वसंत ऋतू हा संदेश देतो की, माझ्याकडून तुम्ही उत्साही राहण्यास शिका.

वसंत ऋतू निबंध मराठी – Vasant Rutu Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply