वाघाची मावशी निबंध मराठी – Waghachi Mavshi Nibandh Marathi

त्या दिवशी काय झाले की बाबांनी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी दार उघडले तर दारात एक मांजर घोटाळत होती. त्यांनी दार उघडल्यावर ती सरळ तिचेच घर असल्यासारखी घरातच शिरली आणि म्याव म्याव करीत इकडे तिकडे फिरू लागली. तिला बहुदा भूक लागली असावी. मी अभ्यास करीत बसले होते तिथेही ती म्याव म्याव करीत आली. ती पांढरेशुभ्र मनीमाऊ बघून मला खूपच गंमत वाटली.

तो जणू काही लोकरीचा मऊमऊ गुंडाच होता. मी आईला म्हटले की ‘मला ही मनीमाऊ पाळायची आहे.” त्यावर आई म्हणाली,” तुला जमणार आहे का ते? चार दिवस कौतुक करशील, पुढे मग मात्र तिचा व्याप माझ्याच गळ्यात पडेल.” पण मी आईला निर्धाराने सांगितले, “नाही, मी तिला सांभाळणार म्हणजे सांभाळणार.” तेव्हापासून खरोखरच मी माझ्या मनूची चांगली काळजी घेते. तिला रोज सकाळी दूध प्यायला देते. माझ्या पानातली पोळी पण देते. बाकी तिचे फारसे काही करावे लागत नाही.

आई म्हणते की मांजर माणसांवर नाही तर घरावर प्रेम करते. म्हणूनच कुत्र्यासारखा पट्टा बांधता येत नाही. तर त्याच्या गळ्यात आईचे म्हणणे खरे आहे कारण मी शाळेतून घरी आल्यावर मनी काही कुत्र्यासारखी नाचत माझ्या स्वागताला पुढे येत नाही. ती मस्त दुपारचं उन खात आमच्या गॅलरीत बसलेली असते. ती एकदा डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहाते. बस्…बाकी काही करीत नाही.

आमचे घर तळमजल्यावर आहे त्यामुळे आमच्या घरात उंदरांचा फार त्रास होता. परंतु मनीमाऊ आल्यामुळे हा त्रास हल्ली बराच कमी झाला आहे. मग मी आईला म्हणते की माझ्या मांजरीमुळेच तुझ्यामागची कटकट किती कमी झाली ते पाहा.

मांजरीला वाघाची मावशी असे म्हणतात कारण दोघांचाही जन्म एकाच मार्जार कुळात झाला आहे. मांजर आपली पिल्ले एकटीच सांभाळते. उलट बोक्यापासूनच त्या पिलांचे रक्षण तिला करावे लागते. मांजरीच्या पिलांचे डोळे जन्मल्यावर पहिले सात दिवस उघडलेले नसतात. त्यामुळे तर तिला त्यांची फारच काळजी घ्यावी लागते. ती त्यांची मानगूट तोंडात पकडून त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेते ते अगदी बघण्यासारखे असते. आमच्या मांजरीलाही आता पिले होणार आहेत. मी त्यांची वाट पाहात आहे. तर अशी आहे ही वाघाची मावशी.

वाघाची मावशी निबंध मराठी – Waghachi Mavshi Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply