या हो या, चंद्रदेवा !

एकदा काही मुलांनी वाद घातला ‘सूर्य श्रेष्ठ की चंद्र श्रेष्ठ?’ या चर्चेत मुलांनी चंद्राला खूप नावे ठेवली. कुणी त्याला परप्रकाशी म्हटले, तर कुणी त्याला ‘क्षयी’ म्हणून हिणवले, कुणी त्याला ‘भाजलेला पापड’ म्हटले. हे सारे ऐकून चांदोबा खूप रागावला आणि शुक्ल पक्ष असूनही आकाशात उगवलाच नाही.. मी खूप अस्वस्थ झालो, कारण लहानपणापासून चंदामामा मला खूपच आवडतो. आता रुसलेल्या त्या चंद्राची समजूत कशी घालायची बरे? मी आकाशाकडे पाहून, नमस्कार करून म्हटले

या हो या, चंद्रदेवा, तुम्ही आमच्यावर असे रागावू नका. तुमची-आमची लहानपणापासूनची केवढी दोस्ती ! आईच्या कडेवर बसून मी प्रथम तुम्हांला पाहिले. तेव्हापासून तुम्हांला तूपरोटी दिली. तुमच्याकडून हट्ट धरून टोपी मागून घेतली. चंद्रदेवा, एके दिवशी तुमच्या गावाला यायचेच असा बेत मी माझ्या बालपणी मनात आखला होता.

तुम्हांला भेटून आलेल्या अंतराळ प्रवाशांनी तुमच्याविषयीची माहिती लिहून ठेवली आहे, ती पण मी वाचली आहे, तरी तुमच्याविषयीचे माझे आकर्षण कधीच कमी झाले नाही. तुमच्या तेजस्वी अंगावरचा ससा आणि तुमची हरिणाची गाडी मला खूप खूप आवडते. तेव्हा हे चंद्रदेवा, तुम्ही लवकर या ! ,

तेवढ्यात आईने मला हटकले “अरे राजू, तू कोणाशी बोलत आहेस?” मी तिला माझी खंत सांगितली, तेव्हा हसून आई म्हणाली, “अरे आकाशात पावसाचे ढग जमले आहेत. तुझा चांदोबा त्या ढगाआड लपला आहे, म्हणून तो तुला दिसत नाही. “

पुढे वाचा:

Leave a Reply