आजचे चित्रपट आणि आम्ही मराठी निबंध
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
खळाळती कोटी ज्योती या
एका मराठी वाहिनीवर हे गीत ऐकले आणि चित्रपट या माध्यमाचा विचार नकळतपणे मनात येत गेला. १९१३ हे वर्ष चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील महत्वाचे वर्ष. दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करून सर्वांचे लक्ष या माध्यमाकडे वेधले. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणू ओळखले जाऊ लागले. नंतर अनेक जण या क्षेत्रात आले. विविध विषयांवर चित्रपट येऊ लागले. ‘आलम आरा’ हा भारतातील पहिला बोलपट ठरला. पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिक, ग्रामीण असे अनेक विषय या चित्रपटांनी हाताळले. भालजी पेंढारकर यांनी तर चित्रपटाला ‘बोलपट ‘ म्हटले.
जसा काळ बदलत गेला, तसे चित्रपटाचे तंत्र बदलत गेले. व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर अशी अनेक मंडळी या क्षेत्रात आली. कोणी गीतकार म्हणून, कोणी दिग्दर्शक म्हणून तर कोणी लेखक किंवा निर्माता म्हणून. आचार्य अत्रे निर्मित ‘शामची आई’ हा राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता पहिला मराठी चित्रपट ठरला. काळाच्या ओघात नवीन नवीन शोध लागत गेले आणि चित्रपट तांत्रिक दृष्ट्या प्रगल्भ झाला. कृष्णधवल चित्रपट रंगीत झाला. ‘शामची आई’ नंतर एकदम पन्नास वर्षाने ‘श्वास’ चित्रपटाने राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळवले आणि तो चित्रपट ऑस्कर पर्यंत देखील गेला.
आज चित्रपटाकडे एक उद्योग आणि करिअरचे साधन म्हणून बघितले जाते. नवनवीन शोध लागले, इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा काळ आला. अनेक गायक, अनेक कलावंत पुढे आले. आजच्या चित्रपटांचा विचार केला तर एक सांगता येईल की आज अनेक चित्रपट हे आपल्याला विचारांची दिशा देतात. सामाजिक समस्यांवर भाष्य करतात. चित्रपटाकडे फक्त करमणुकीचे माध्यम म्हणून पाहिले जात नाही, तर एक समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिलं जातं. सत्य घटनांवर आधारित चित्रपट सुद्धा खूप आले. २६ नोव्हेंबर च्या दहशतवादी हल्ल्यावर हिंदी चित्रपट आला. बालगंधर्व, मी सिंधुताई सपकाळ, १९०९, लोकमान्य हे चित्रपट तर व्यक्तिविशेष आहेत. म्हणजे आजची पिढी देखील त्या निमित्ताने अशा व्यक्तिमत्वांचा अभ्यास करत आहे. कादंबरीवर आधारित चित्रपट सुद्धा येऊ लागले. ‘शाळा’ या चित्रपटाने मिलिंद बोकील यांच्या कादंबरीला न्याय दिला. तर चेतन भगत यांच्या पुस्तकांवर ‘थ्री इडियट’, ‘काय पोचे’ असे चित्रपट आले. स्मिता तळवलकर, किशोरी शहाणे अशा अभिनेत्री देखील निर्मात्या म्हणून आपल्यासमोर आल्या.
काही चित्रपटांनी पौगंडावस्थेतील मुलांचे भावविश्व उलगडले, ‘बालक पालक’ हा चित्रपट हे त्याचेच उदाहरण. ‘यलो’ सारख्या चित्रपटाने तर गौरी गाडगीळ या मुलीची कहाणी आपल्यासमोर आणली आणि त्याच ‘स्पेशल चाइल्ड’असणाऱ्या गौरीने चित्रपटात प्रमुख भूमिका केली. ‘झपाटलेला’ ने थ्रीडी तंत्र मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचवले. आजच्या चित्रपटांची ही झाली एक बाजू. आता अनेक चित्रपट हे हिंसाचाराला पाठिंबा देतात, त्यातील दृश्ये ही बालमनावर वाईट परिणाम करणारी असतात. लोकांची अभिरुची बदलत चालली आणि त्यामुळे ‘शीला की जवानी आणि ‘मुन्नी बदनाम हो गयी’ असे म्हणणाऱ्या गल्लाभरू चित्रपटांचे प्रमाण वाढले. चित्रपटात व्यर्थी संवाद वाढत गेले. अर्थात याला अपवाद असणारे चित्रपट पण आहेच. पण ज्यावेळी आपण आजचे चित्रपट’ असा विचार करतो, तेव्हा हे सांगितले पाहिजेच.
आज भारतीय चित्रपट ऑस्कर पर्यंत जाऊ लागला, अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट दाखवले जाऊ लागले ही जमेची गोष्ट म्हणायला हवी. चित्रपट या क्षेत्रात अभ्यास करणारी तरुण पिढी पण वाढली, चित्रपटाचे तंत्र शुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था देखील वाढल्या, त्यामुळे येणारा भविष्यकाळ चित्रपटांसाठी उज्वल आहेच.
पुढे वाचा:
- आपली व्यथा दुसऱ्याला न सांगता दुसऱ्याची व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करावा
- आजची मराठी रंगभूमी वास्तवदर्शी आहे का?
- कुंभार मराठी निबंध
- एका मंदिराचे वर्णन मराठी निबंध
- कर्म हीच पूजा मराठी निबंध
- आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
- हॉकी वर मराठी निबंध
- हे विश्वची माझे घर निबंध
- हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
- हुंडा एक सामाजिक समस्या
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
- स्वावलंबन मराठी निबंध
- स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती