बालदिन माहिती मराठी – Baldin Information in Marathi

पंडित जवाहरलाल नेहरूंना मुले फार आवडत असत. मुलेही त्यांना ‘चाचा’ म्हणत आणि त्यांच्यावर प्रेम करत. त्यामुळे १४ नोव्हेंबर हा नेहरूंचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

गोरेपान, देखणे, हसतमुख चेहरा, कोटावर नेहमी गुलाबाचे फूल असे जवाहरलाल नेहरूंचे रूप होते. जनतेचे त्यांच्यावर फार प्रेम होते आणि त्यांनीही आपले जीवन देशाला अर्पण केले होते. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की, ‘मी मेल्यावर माझ्या शरीराची राख विमानातून भारताच्या भूमीवर विखरून टाकावी.

पंडित जवाहरलाल नेहरू

१४ नोव्हेंबर १८८९ रोजी जवाहरलालांचा जन्म एका श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील मोतीलाल व आईचे नाव स्वरूपाराणी. मोतीलाल मोठे प्रसिद्ध वकील होते, पण हा भरभराटीतील व्यवसाय सोडून ते राजकारणात पडले. काँग्रेसच्या प्रारंभिक दिवसात ते स्वराज्य पक्षाचे नेते होते.

जवाहरलाल नेहरूंचे बालपण मोठ्या लाडा-कौतुकात गेले. त्यांनी इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतले आणि १९१२मध्ये ते बॅरिस्टर होऊन हिंदुस्थानात परतले.

वडिलांचा वकिलीचा वारसा पुढे चालवण्याचे त्यांनी ठरवले होते, पण त्यात त्यांचे मन फारसे रमले नाही.

१९१२ साली बिहारमधील बांकीपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास ते उपस्थित राहिले. तेव्हा ते नामदार गोखल्यांच्या भाषणाने प्रभावित झाले व हळूहळू राजकारणाकडे वळू लागले. मात्र काँग्रेसचे तेव्हाचे नेमस्त धोरण त्यांना फारसे रुचत नसे.

१९१५ साली अलाहाबाद येथे त्यांनी आपले पहिले जाहीर भाषण केले. वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणार्‍या कायद्याच्या विरोधात ही सभा भरली होती.

लखनौ काँग्रेसमध्ये नेहरूंची गांधीजींशी भेट झाली आणि नेहरू त्यांच्या विचारांकडे ओढले गेले. नंतर त्यांनी राजकारणाला वाहून घेतले. ते खादी वापरू लागले. असहकाराच्या चळवळीतही ते सामील झाले.

६ डिसेंबर १९२१ साली त्यांना प्रथम अटक झाली आणि यानंतर त्यांना एकूण नऊ वेळा कारावासाची शिक्षा झाली.

१९२९ साली ते लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी गांधींची खूप इच्छा होती. नेहरूंच्या उत्कट देशप्रेमाबद्दल त्यांना जशी खात्री होती तशी त्यांच्या विवेकपूर्ण व विचारी नेतृत्वावरही होती. १९४७ सालापर्यंत एकंदर चार वेळा त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले.

१९२७ साली ब्रुसेल्स येथे भरलेल्या पददलित राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या सभेत ते काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. नंतर त्यांनी रशियासही भेट दिली. याचा परिणाम म्हणून हिंदुस्थानात परत आल्यावर ते मजूर चळवळीतही लक्ष घालू लागले.

त्यांनी वकिली सोडली होती, तरी जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या सेनाधिकार्‍यांवर सरकारने खटला भरला, तेव्हा नेहरूंनी त्या क्रांतिकारकांचे वकिलपत्र घेतले.

भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान बनले आणि पुढे सतरा वर्षे त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले. पंचवार्षिक योजनांद्वारा त्यांनी मोठमोठी धरणे बांधली, पोलादाचे कारखाने उभारले. भारताचा औद्योगिक क्षेत्रात विकास व्हावा, तसेच भारताने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. होमी भाभांसारख्या शास्त्रज्ञांना उत्तेजन देऊन भारताने अणुयुगात पुढे जावे असा त्यांनी प्रयत्न केला.

आपल्या शेजार्‍यांशी भारताचे संबंध चांगले राहावेत, तसेच भारताला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळावी, असा त्यांचा प्रयत्न होता.

१९४२ साली त्यांनी अहमदनगरला कारावासात असताना त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ सारखे उत्तम पुस्तक लिहिले. शांतीचे पुरस्कर्ते, विज्ञानाचे उपासक अशा पंडित जवाहरलाल नेहरूंना ‘नवभारताचे शिल्पकार’ असेही म्हटले जाते.

नेहरू लखनौ काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा गांधी त्यांच्याबद्दल म्हणाले होते, ‘तो स्फटिकासारखा शुद्ध आहे. त्याच्या सचोटीबद्दल शंकाच नाही. राष्ट्राचे भवितव्य त्याच्या हाती सुरक्षित आहे.’ गांधींचे उद्गार त्यांनी सार्थ ठरविले.

२७ मे १९६४ रोजी भारताच्या या लाडक्या नेत्याचे निधन झाले.

पुढे वाचा:

Leave a Reply