बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध – Berojgari Essay in Marathi

वाढती लोकसंख्या ही आपल्या देशाची खूप मोठी समस्या आहे. ह्या मुख्य समस्येतूनच ब-याच समस्यांची निर्मिती झाली आहे. त्यातलीच एक समस्या म्हणजे वाढती बेकारी होय.

खरे तर राष्ट्राच्या निर्मितीत आणि विकासात तरूण पिढीची महत्वाची भूमिका असते. हेच तरूण जर रोजगाराला वंचित राहिले तर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा आणि समाजाचा विकास खुंटतो.

ह्या देशात इंग्रज येण्यापूर्वी सर्व खेडी स्वयंपूर्ण होती. म्हणजे असे की त्या खेड्यातील गावगाड्यात शेतकरी होतेच परंतु त्या जोडीला सुतार, चांभार, लोहार, सोनार, विणकर इत्यादी वेगवेगळे कसबी कारागीरही होते. शेतीच्या जोडीला हे सर्व व्यवसाय फुलतबहरत होते. परंतु इंग्रज आले आणि त्यांनी ह्या देशातील उद्योग रसातळाला नेले. भारतातून कच्चा माल स्वस्तात न्यायचा आणि यंत्रावर तयार झालेला सुबक माल इथे आणून भरपूर किंमतीला विकायचा असे त्यांनी सुरू केले. त्यामुळे भारतातील कारागीर मंडळी बेकार झाली. तीही मग शेतीकडे वळली. तेव्हापासून जो बेकारीचा प्रश्न उभा राहिला आहे त्या प्रश्नाला आपण आजतागायत तोंड देत आहोत.

वेगाने वाढणारी लोकसंख्या हे बेकारीचे एक कारण आहे. बेकारीचे दुसरे कारण म्हणजे सध्याची प्रचलित शिक्षण पद्धती. ही शिक्षणपद्धती व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यात, मुलांना आपल्या पायांवर उभे करण्यात कमी पडते. बेकारीच्या समस्येमुळे बेशिस्त, अराजकता, गरिबी, दहशतवाद आदी राक्षस निर्माण होत आहेत. बेरोजगार मुले स्वतःवरील आत्मविश्वास तर हरवून बसतातच, त्याशिवाय ती कुटुंबाला ओझे वाटू लागतात. रिकाम्या मनात नको ते विचार येऊन अशी मुले अंमली पदार्थांकडे किंवा गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना भरकटवले जाते आणि दहशतवादी मार्गांकडे वळवले जाते.

मुळात तरूणांची लोकसंख्या अधिक असणे हे आपल्या देशाच्या दृष्टीने लाभदायक गोष्ट होऊ शकते. फक्त हा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. आज युरोपातील ब-याच देशात जन्मदर शून्य किंवा ऋण आहे. अशा देशातील लोकसंख्या कमी होऊ लागल्यामुळे आपल्यापेक्षा अगदी उलट्या समस्या म्हणजे वाढत्या वृद्ध लोकसंख्येची समस्या तिथे जाणवू लागली आहे.

आपल्या देशातील बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी आता आपल्या सरकारने व्यवसाय शिक्षण, कुटुंब नियोजनाचा प्रचार, लघु आणि कुटीर उद्योगांना उत्तेजन अशा अनेक योजना राबवायला सुरूवात केली आहे. आर्थिक उदारीकरणाचे धोरण अवलंबिल्यामुळे बँका आता नवउद्योजकांना कर्जे देऊ लागल्या आहेत.

तरूणांनी ह्याचा जरूर लाभ घ्यावा. परिश्रमाला पर्याय नाही हे ध्यानात घेऊन झटपट श्रीमंत होण्याच्या भूलथापांना बळी पडू नये. खोटा स्वाभिमान सोडून कष्ट करायला लाजू नये.

ग्रामीण भागातही उद्योगांना भरपूर वाव आहे. खरोखरच आपल्या देशाची ही युवाशक्ती आपण योग्य मार्गाला लावली तर आपला देश एक महासत्ता बनेल ह्यात काहीच शंका नाही.

बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध – Berojgari Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply