युवकांचा असंतोष मराठी निबंध – Yuvkancha Asntosh Marathi Nibandh
आज आपल्या देशात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हय्या कुमारचे प्रकरण गाजते आहे. देशद्रोह म्हणजे काय ह्या विषयावर चर्चासत्रे झडत आहेत. सर्वच राजकीय पक्ष ह्या प्रकरणात आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करीत आहेत ते फार वाईट आहे. युवकांची भूमिका ही कुठल्याही समाजाच्या दृष्टीने पाहिली असता महत्वाची असते. तरूण हेच उद्याची आशा असतात. त्यांच्यात जिगर असते, धाडस असते आणि संकटाला तोंड देण्याची हिंमत असते. अनुभवी माणसांचे बोटचेपेपण त्यांच्या अंगी नसल्यामुळे ध्येयप्राप्तीसाठी ते स्वतःला झोकून देऊ शकतात.
तरूणांचा असंतोष जरी समाजाला त्रस्त करीत असला तरी त्याचे फायदेही आहेत. तो जर चांगल्या मार्गाने वळवला तर फायदे नाहीतर तोटे असाच त्याचा प्रकार आहे. लोकमान्य टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी पदवी मिळाली होती कारण त्यांनी भारतीय युवकांच्या मनात सद्यपरिस्थितीबद्दलच्या असंतोषाची बीजे पेरली.
गांधीजींनीही सत्याग्रहाच्या मार्गाने अनेक तरूणांना आपल्या लढ्यात सामील करून घेतले आणि कॉन्ग्रेसला लोकचळवळीचे रूप बहाल केले. पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी युवकांचा असंतोष लाभदायक ठरला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदी युवकांनी देशासाठी प्राणार्पण केले.
१९७५ साली लोकनारायण जयप्रकाश ह्यांनी बिहारमध्ये युवकांना गोळा करून आंदोलन केले कारण इंदिरा गांधी ह्यांच्या राज्यकारभाराची गाडी रूळावरून घसरू लागली होती. आसाममध्ये १९७५ च्या सुमारास विद्यार्थ्यांनी चळवळ उभारली. नेपाळमध्येही विद्यार्थ्यांनीच लोकशाही स्थापन केली.
युवकांचा असंतोष हाजर समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितार्थ असेल, तो सत्य आणि न्याय ह्यांच्या आधारावर उभा असेल तरच तो असंतोष विधायक ठरतो. अन्यथा तो विघातक ठरतो. त्याच्यामुळे देशहिताला बाधा येते.
एके काळी आसामात उल्फा ही जहाल संघटना कार्यरत होती. आजही काश्मीर आणि ईशान्य भारतात फुटीरतावादी कारवायात गुंतलेले बरेच गट आहेत. त्याशिवाय नक्षलवादी संघटना आहेत. आयसिससारख्या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी जाणा-या तरूणांची संख्याही वाढते आहे. हे सर्व भरकटलेले, दिशाहीन तरूण आहेत. त्यांचा असंतोष हा समाजविघातक असंतोष आहे. त्यामुळे देशाचे नुकसान होऊ शकते. म्हणून अशा त-हेच्या असंतोषाचा उद्रेक होऊ नये ह्याची आपण काळजी घ्यायला हवी. राजकीय पक्षांनी क्षुद्र राजकीय स्वार्थानेच सर्व गोष्टींकडे पाहू नये. त्यांनी देशहिताचा विचार केला तर अर्धे अनर्थ टळतील.
युवकांच्या असंतोषासाठी आपली शिक्षणपद्धतीही जबाबदार आहे. पदवी घेऊनही नोकरी मिळाली नाही की वैफल्य येते. आपले राजकीय पक्षही त्याला जबाबदार आहेत कारण देशातील तरूणांच्या आशा आकांक्षा पु-या करण्यात ते कमी पडत आहेत. युवकांमधील असंतोषाने घातक वळण घेऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था चांगली असली पाहिजे. तरूण मुलांमध्ये चांगले नागरिक बनण्याची तत्वे बिंबवली गेली पाहिजेत. त्यांना व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी संघटनांवर राजकीय पक्षांचा प्रभाव नसावा. असे झाले तर युवकांमध्ये चुकीच्या कारणाने असंतोष निर्माण होणार नाही.
पुढे वाचा:
- या हो या, चंद्रदेवा ! मराठी निबंध
- म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध
- मोबाईल निबंध मराठी
- मोगल उद्यानात फेरफटका निबंध मराठी
- मोग-याच्या फुलाची आत्मकथा
- मुलामुलींनी एकत्र शिक्षण घ्यावे काय?
- आंब्याचे झाडाचे मनोगत निबंध मराठी
- मी स्पर्धेत भाग घेते निबंध मराठी
- मी शाळेचे दप्तर बोलतोय
- मी सैनिक झालो तर निबंध मराठी
- मी सायकल शिकते तेव्हा निबंध मराठी
- मी सागरातील एक मासा निबंध मराठी
- मी सरपंच झालो तर निबंध लेखन
- मी शाळेची घंटा बोलते निबंध मराठी