गांधीवाद निबंध मराठी – Gandhivad Marathi Nibandh
२० व्या शतकातील थोर विभूतींपैकी गांधीजी एक आहेत. त्यांच्या मोठेपणाला किती तरी पैलू आहेत. त्यांनी सत्य, अहिंसा, सहिष्णुतेचा आपल्या जीवनात ज्या व्यापक स्तरावर अवलंब केला तो त्यांच्या अलौकिकतेचा निदर्शक आहे. ते एक महामानव, पुढारी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, लेखक सर्व काही होते. ते थोर स्वातंत्र्यसेनानी, राजकीय नेते आणि पत्रकार होते. ते आपल्या आदर्शासाठी, सिद्धांतांसाठी जगले. त्याचा प्रचार केला व त्यासाठीच त्यांनी आपले बलिदान केले. त्यांचे सांगणे आणि करणे यात साम्य होते. ते थोर कर्मयोगी होते. आज ते प्रत्यक्षपणे आपल्यात नाहीत. परंतु त्यांचे आदर्श, त्यांच्या प्रेरणा त्यांनी सांगितलेला मार्ग आपल्याबरोबर आहे. ते देशाचे बापू, महात्मा, राष्ट्रपिता राष्ट्रनिर्माते होते. भारताला अहिंसेच्या मार्गाने नेऊन स्वातंत्र्य मिळवून देण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. राजकारणात खऱ्या धार्मिकतेचा आणि नैतिकतेचा समावेश त्यांनी केला. त्यांनी जीवनाच्या सर्व पैलूंवर खूप काही लिहिले. खूप बोलले आणि तसेच आचरण केले. त्यांच्या चरित्रालाच गांधीवाद म्हणतात.
ते सत्य आणि अहिंसेचे उपासक होते. सत्यालाच ते ईश्वराच्या रूपात पाहत होते. ते म्हणत “सत्य हाच परमात्मा आणि परमात्मा हेच सत्य” राजकीय स्वातंत्र्याबरोबरच ते स्वावलंबन व आर्थिक स्वातंत्र्यावर जोर देत असत. साधी राहणी उच्च विचारसरणी हा त्यांचा मूलमंत्र होता. त्यांचे संपूर्ण जीवन याच आदर्शाचे व्यावहारिक रूप आहे. त्यांचा सर्वोदयावर विश्वास होता. सर्व वर्ग जाती, धर्म इत्यादी चा सर्वांगीण विकास व्हावा असे त्यांना वाटे समाजातील दुर्बल वर्ग, स्त्रिया, मुले, अनुसूचित जातिजमाती, मागासलेल्या लोकांची बाजू ते घेत. जातिभेद व अस्पृश्यतेच्या ते विरोधात होते. विविध मानवी मूल्यांचे ते एक साकार रूप होते. भौतिक बळ आणि स्वामित्वाच्या तुलनेत ते आत्मबल, नैतिक धैर्य, सामाजिक मर्यादा आणि आदर्शाना ते प्राधान्य देत. ते असे मानत की निखळ शुद्ध भौतिकवादच आपल्या सर्व समस्यांचे मूळ आहे. अशा प्रकारे गांधीवाद सत्य, अहिंसा, करुणा, मानवी मूल्ये, सर्वोदय अस्पृश्योद्धार, पूर्ण स्वातंत्र्य, स्वावलंबन यावर आधारलेला एक थोर आणि व्यवहार्य जीवनदर्शन आहे.
त्यांचा विश्वबंधुत्वावर विश्वास होता. कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्यांना मान्य नव्हता. ते मानत की सगळे मानव हे ईश्वराची संताने आहेत. ते सारख्या प्रमाणात सुख, समृद्धी आणि प्रगतीचे अधिकारी आहेत. त्यांनी सदैव सत्यावर जोर दिला आणि सत्याचाच आग्रह धरला. म्हणून तर त्यांना थोर सत्याग्रही म्हणतात. सत्याचा मार्ग हा अहिंसा, प्रेम आणि शांती, सर्वोदय आणि खऱ्या विकासाचा मार्ग आहे. त्यांनी कधी कुणाला शत्रू मानले नाही. इतकेच नव्हे तर स्वत:चाच खुनी नथुरामला क्षमा केली. त्यांचे जीवन, विचार आचरणात हिंसा, घृणा द्वेषाला स्थान नव्हते. त्यांचे सारे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक होते. त्यात कुठेही काहीही लपविलेले नव्हते. हेच खरे स्वातंत्र्य उन्मुक्तता आणि सुखाचे राज्य आहे. याच आदर्शावर आधारित ‘रामराज्याची कल्पना ते करीत. रामराज्य हे एक असे राज्य व शासन असेल जिथे प्रत्येक व्यक्ती नैतिकदृष्टया खूप संपन्न असेल तिचे जीवन पूर्णपणे अहिंसक आणि संयमी असेल. जिथे शोषण, बेरोजगारी नसेल.
गांधीजींनी भारताचा व्यापक दौरा केला. प्रवास केला. समाजातील सर्व वर्गांशी त्यांचा संवाद असे. खरा भारत खेड्यांमध्ये वसलेला आहे हे त्यांना माहीत होते. म्हणून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यावर, तिला स्वावलंबी करण्यावर विशेष भर दिला. कुटीर उद्योगाच्या प्रसार-प्रचाराची त्यांना आवड होती. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची ते बाजू घेत. पंचायती राज्य आणि व्यवस्थेला लोकप्रिय करू इच्छित होते. पंचपरमेश्वरावर त्यांचा अटळ विश्वास होता. ते असे मानत की ग्रामीण भारताचा खरा विकास याच उपायांनी होऊ शकतो. जोपर्यंत ग्रामीण जनता प्रत्येक स्तरावर सहभागी होत नाही तोपर्यंत वास्तविक बदल आणि प्रगती शक्य नाही. राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी समतेवर आधारित व न्यायाने व्हावी असे त्यांना वाटे त्यामुळे गरिबी श्रीमंतीमधील दरी कमी होईल आणि ग्रामीण जनता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतंत्र होईल. ते असे मानत की उत्पादन आणि वितरणावर मूठभर लोकांचा एकाधिकार असणे निंदनीय आहे. आपल्या सुखसोयी आणि आवश्यकतांना आपल्या मनाप्रमाणे वाढविण्याचे वाईट परिणाम होतात. तो भोगवाद, भांडवलवाद आणि एकाधिकारचे कट्टर विरोधक होते. कारण सामाजिक असमानता शोषण, अन्याय, दुराचार यावरच आधारित आहे.
गांधीजी गीतेतील कर्मयोगाने व टॉलस्टॉय व रस्कीनच्या विचारांनी प्रभावित झाले होते. म्हणून गांधीवाद पूर्णपणे लोक कल्याणकारी राज्याच्या स्थापनेचे एक आदर्श रूप प्रस्तुत करतो. ज्यात नैतिक आणिं आध्यात्मिक जीवन मूल्यांचा आग्रह घरला आहे. त्यांचे ‘रामराज्य’ सर्वोदय, स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव, सत्य, नैतिकता, स्वावलंबन, श्रम, संयम, मर्यादा आणि उच्च विचार या मूल्यांवर आधारलेले आहे.
पुढे वाचा:
- चंद्रशेखर व्यंकटरमण मराठी निबंध
- चलचित्रपटांचा प्रभाव मराठी निबंध
- राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध
- एका मंदिराचे वर्णन मराठी निबंध
- कर्म हीच पूजा मराठी निबंध
- आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
- हॉकी वर मराठी निबंध
- हे विश्वची माझे घर निबंध
- हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
- हुंडा एक सामाजिक समस्या
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
- स्वावलंबन मराठी निबंध