Set 1: माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी – Maza Avadta Rutu Unhala Essay in Marathi
Table of Contents
मला उन्हाळा ऋतू खूप आवडतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शाळेला सुट्टी असते. त्यामुळे गावी जायला मिळते. गावी गेल्यावर मज्जाच मज्जा असते.
गेल्या वर्षी गावी खूप मजा केली. घराजवळच्या रानात मित्रांबरोबर मी भरपूर खेळलो. आंबा, फणस व काजू भरपूर खायला मिळाले. रानात फिरून मी स्वत:च खूप करवंदे काढली आणि खाल्ली. मला झाडावर चढता येत नव्हते. पण गेल्या वर्षी झाडावर चढायला थोडे थोडे शिकलो. आमच्या गावातील नदीला मे महिन्यातही पाणी असते. त्यामुळे मी पोहायलाही शिकलो.
उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे खूपजण गावी येतात. आमची वाडी गजबजून जाते. खूप मित्र भेटतात. रात्री जेवण झाल्यावर सगळेजण जमतात आणि खूप गप्पागोष्टी करतात.
ही सर्व मजा उन्हाळ्याखेरीज कोणत्या ऋतूत मिळेल? म्हणून मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो.
Set 2: माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी – Maza Avadta Rutu Unhala Nibandh Marathi
पृथ्वीच्या सूर्याभोवती होणा-या भ्रमणामुळे आपल्याला सहा ऋतू अनुभवायला मिळतात त्यापैकी एक ऋतू आहे ग्रीष्म. वसंतऋतूच्या नंतर हा उकाड्याचा आणि घामाघुम करणारा ऋतू येतो. वैशाख आणि ज्येष्ठ ह्या दोन महिन्यांच्या काळात हाच ऋतू निसर्गावर राज्य करीत असतो.
मकरसंक्रांतीनंतर सूर्याचे उत्तर गोलार्धात आगमन होते. त्यामुळे आपल्याकडे उन्हाळा सुरू होतो. उष्णतेचे प्रमाण वाढू लागते. दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. पृथ्वीवरील पाण्याची वाफ होऊन पाणी आटते. गरम वारे वाहातात. लहान झाडेझुडपे पाण्याअभावी माना टाकतात. उकाड्यामुळे माणसांना आणि पशूपक्ष्यांना जिणे असह्य होते. उन्हात फिरल्यावर उष्माघात होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यापासूनच थकल्याची जाणीव होते. त्यामुळे लोक उन्हात बाहेर पडायचे टाळतात. पडावे लागलेच तर छत्री घेऊन बाहेर पडतात. थंड पाणी, शीतपेये, आईस्क्रीम ह्यांचे महत्व वाढते. त्यामुळे उलट सर्दी, घसादुखी असे आजार होतात.
हा ऋतू त्रासदायक वाटला तरी तो आवश्यकही आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कारण तो पुढे येणा-या वर्षा ऋतूची तयारी करीत असतो. ह्या ऋतूत पाण्याची वाफ होऊन ते आकाशात जाते आणि वर्षा ऋतूमध्ये मेघांच्या सहाय्याने पुन्हा खाली येते. हा ऋतू जणू आपल्याला संदेशच देतो की दुःखानंतरच सुख येते. आणि कष्ट सोसल्यानंतरच पुढे चांगले दिवस येतात. म्हणूनच कष्टांना आपण घाबरता कामा नये. सदा कर्मकरीत राहावे हे आपल्याला ह्या ऋतूकडून शिकावयास मिळते.
त्याशिवाय ग्रीष्म ऋतूचा आणखीही एक फायदा आहे बरे. तो फायदा म्हणजे ह्या काळात आपली आवडती मे महिन्याची सुट्टी असते. त्या सुट्टीत आपण गावाला जाऊन खूप धमाल करू शकतो. बरेच लोक ह्या काळात सिमला, कुलू मनाली, काश्मीर अशा थंड हवेच्या ठिकाणी जातात. मुख्य म्हणजे ह्या काळात आपल्याला भरपूर आंबे आणि फणस खायला मिळतात. म्हणून ग्रीष्म ऋतूमला आवडतो.
Set 3: माझा आवडता ऋतू – उन्हाळा मराठी निबंध – Summer Season Essay In Marathi
उन्हाळा म्हटले की आम्हा मुलांना उन्हाळ्याची सुट्टीच आठवते. उन्हाळा आणि सुट्टीचे नातेच तसे आहे.
उन्हाळ्यात खूप गरम होते, घराबाहेर दुपारचे अजिबात पडता येत नाही. जमिनीतून गरमागरम वाफाच निघत आहेत असे वाटते. त्यामुळे मी घरातच बसून मित्रांबरोबर कॅरम, पत्ते, बुद्धिबळ असे खेळ खेळतो. कधीकधी आम्ही टीव्हीवरील कार्टून बघतो. कुणीच नसेल तर मी पुस्तक वाचतो नाहीतर संगणकावर खेळतो.
माझी आई उन्हाळ्यात कैरीचे पन्हे करते. माझ्या आवडीचा मोरंबा करते. त्यामुळे मी खुश असतो. दुसरे म्हणजे उन्हाळ्यात आमच्याकडे गावाहून आंब्याची पेटी येते. तेव्हा तर माझी अगदी चंगळ उडते.
उन्हाळ्यात संध्याकाळी आम्ही सोसायटीतल्या मैदानावर क्रिकेट, कबड्डी, खोखो, लगोरी असे वेगवेगळे खेळ खेळतो. मागच्या वर्षी मी उन्हाळ्यात पोहायला शिकलो. ह्या वर्षीही बाबा मला उन्हाळ्यात पोहायला पाठवणार आहेत.
कधीकधी उन्हाळ्याचे आम्ही महाबळेश्वर किंवा माथेरान अशा थंड हवेच्या ठिकाणीही जातो. परंतु हल्ली सगळीकडे वृक्षतोड झाल्यामुळे पहिल्यासारखे थंड तिथेही वाटत नाही.
असा हा उन्हाळा शाळेला सुट्टी असते म्हणूनच बरा वाटतो एरवी मात्र तो नकोच असतो.
Set 4: माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी – Summer Season Essay In Marathi
उन्हाळा म्हणजे उकाडा. उन्हाळा म्हणजेच आग ओकणारा सूर्य. उन्हाळा म्हणजे घामाचा चिकचिकाट. म्हणूनच लोकांना उन्हाळा आवडत नाही. परंतु आम्हा मुलांना मात्र उन्हाळा आवडतो कारण तेव्हा आमच्या शाळांना सुट्टी मिळते. तेव्हाच आम्हाला आमच्या गावी जाऊन मनसोक्त हुंदडायला मिळते. आमच्या गावाला म्हणजे कोकणात तेव्हा भरपूर आंबे, फणस आणि काजू असतात. फुले तर त्या वेळेस अगदी वेड लागल्यासारखी फुलतात.
माझी आई नोकरी करते. परंतु आई-बाबा, दोघेही रजा घेऊन आमच्यासोबत कोकणात येतात. तेव्हा माझा मामा, मावशा आणि त्यांच्या घरची मंडळीही येतात. मग काय? आम्हा मुलांची अगदी धमाल उडते. शिवाय आजीही आमचे सगळे आनंदाने करीत असते. तिची मुलं, मुली आणि लाडकी नातवंडे आलेली असतात ना सुट्टीसाठी.
रोज सकाळी आम्ही सर्वजण चुलीवरचा गरमागरम मऊ भात, मेतकुट आणि पोह्याचा पापड न्याहारीसाठी खातो. मग आम्ही मुले विहिरीवर पोहायला जातो, झोपाळ्यावर बसतो, वाडीत खाली पडलेले आंबे वेचायला जातो. खूप मज्जा करतो आम्ही. आणि ती मला उन्हाळ्यातच करायला मिळते. म्हणून तर हा उन्हाळा मला आवडतो.
आमची आजी, मामी, मावशी आणि माझी आई-चौघी मिळून स्वयंपाकघरात गप्पा करीत एकत्र स्वयंपाक करतात. कधी चिवडा, कधी लाडू, कधी चिरोटे तर कधी अनरसे असे पदार्थही त्या आमच्यासाठी बनवतात. त्याच वेळेस आजी बटाटे, पोहे ह्यांचे पापड, सांडगे, मिरगुंडे, बटाट्याचा कीस, चिकवड्या आणि कुरड्या करण्याचा घाट घालते आणि आम्हा सर्वांना घरी जाताना डबे डबे भरून हे सगळे पदार्थ देते.
उन्हाळ्यात आम्ही सर्वजण संध्याकाळी समुद्रावर जातो आणि तिथल्या वाळूत खेळतो. अशी खूप मज्जा येते ती उन्हाळ्यातच. म्हणून मला उन्हाळा कितीही उकडत असले तरी खूप खूप आवडतो.
Set 5: माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी – Maza Avadta Rutu Unhala Essay in Marathi
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे भारतातील तीन मुख्य ऋतू आहेत. ऋतुचक्राप्रमाणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळ्याचे आहेत.
सूर्याचे उत्तरायण चालू झाल्यावर २१ मार्चला सूर्य विषुववृत्तावर येतो. तेव्हापासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवायला सुरुवात होते. कडक उन्हाच्या झळा मारायला लागल्या की नको वाटतो तो उन्हाळा ऋतू. दिवसभर अंगात आळस. कोणीतेही काम करायचे म्हटले तर उत्साह वाटत नाही.
उन्हाळ्याचा त्रास कुणालाच सहन होत नाही. म्हणूनच मार्च महिन्यापासून शाळा सकाळची भरते. उन्हाळ्यात थोडे जरी खेळले तरी खूप घाम येतो. लगेच अशक्तपणा जाणवायला लागतो. अनवाणी चालणाऱ्यांचे तर पाय पोळून निघतात. या ऋतूत सैल, सुती व पांढरी कपडे वापरल्यामुळे अंगाची होणारी लाही-लाही थोडी कमी होते. कडक उन्हातून फिरून आल्यावर माठातील थंडगार पाणी प्याल्यामुळे मनाला शांत वाटते.
उन्हाळ्यात निसर्गातही खूप बदल होतो. कडक उन्हाळा असूनही झाडांना नवी पालवी येते. उन्हाळ्यात लागणारी विविध फळे जणू आरोग्य रक्षणासाठी आणि उन्हाळ्यातील होणारा त्रास कमी करण्यासाठी निर्माण झालेली आहेत. जांभूळ, करवंदे, आंबे, अळू हा रानमेवा उन्हाळ्यात मनमुरादपणे खायला मिळतो. याशिवाय कलिंगड, काकडीमुळे आरोग्य चांगले राहते.
पुढे वाचा:
- माझा आवडता अभिनेता निबंध मराठी
- माकडांची शाळा निबंध मराठी
- महाराष्ट्रातील अभयारण्ये मराठी निबंध
- महापूर निबंध मराठी
- महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती निबंध मराठी
- महापुरुषांचे मोठेपण निबंध मराठी
- महात्मा बसवेश्वर निबंध मराठी
- महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी
- महागाई एक समस्या मराठी निबंध
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
- मराठी बाणा निबंध मराठी