Set 1: माझा आवडता खेळ – क्रिकेट मराठी निबंध – Cricket Essay in Marathi
Table of Contents
भारतातल्या बहुतेक मुलांना क्रिकेट हाच खेळ आवडतो कारण लहानपणापासून आपण त्या खेळाचे कौतुक ऐकलेले असते आणि पाहिलेलेसुद्धा असते. मोठी माणसे टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघतात, तो बघताना भारत जिंकला की आरडाओरडा करतात, फटाके वाजवतात, त्या सगळ्याचा आपल्याही मनावर परिणाम होऊन आपल्यालाही क्रिकेट आवडू लागते. माझेही तसेच झाले.
आमच्या सोसायटीत आम्ही सुरूवातीला क्रिकेट खेळत असू परंतु तिथे फारशी जागा नव्हती. शिवाय तळमजल्यावरच्या लोकांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या त्यामुळे आमच्या क्रिकेट खेळण्यावर तिथे बंदी आली. परंतु माझे सुदैव असे की आमच्या शाळेच्या पटांगणावर जाऊन आम्ही क्रिकेट खेळू शकत होतो.
नंतर एके दिवशी असे झाले की आमच्या घराशेजारी असलेल्या एका सामाजिक संस्थेने ठरवले की त्यांच्याकडे असलेल्या मैदानाचा काही भाग क्रिकेटचे प्रशिक्षण देणा-या संस्थेला भाड्याने द्यायचा. त्यामुळे तर काय, माझी खूपच मजा झाली. बाबांची परवानगी घेऊन मी त्या प्रशिक्षणात दाखल झालो. माझ्यासाठी क्रिकेटचे कपडे, नवी बॅट, नवा चेंडू, डोक्याला मार लागू नये म्हणून शिरस्त्राण, हातांना आणि पायांना मार लागू नये म्हणून गार्ड्स अशा वस्तू घेण्यात आल्या. क्रिकेट खेळायला खूप मजा येऊ लागली.
आमचे सर शिकवायचेही छान. परंतु दोन वर्षांनी ते प्रशिक्षण बंद झाले कारण त्या संस्थेने मैदान भाड्याने देणे बंद केले. आता बघूया, पुढल्या वर्षी तरी हे प्रशिक्षण चालू होते का ? मी मात्र त्यामुळे खूप हिरमुसलो आहे. आता आम्हा मुलांवर शाळेच्या पटांगणावर जाऊन खेळण्याची वेळ पुन्हा आली आहे.
सचिन तेंडुलकर हा माझा सुपरहिरो आहे. एवढी वर्षे तो उत्तम खेळला, त्याने शतकांवर शतके ठोकली ते मला खूपच आवडत होते. त्याच्या खेळण्यात चमक होती. खेळ हाच त्याचा जीव की प्राण होता. त्याने आपल्या यशाची हवा कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. मला शास्त्रशुद्ध क्रिकेट ह्यापुढे शिकायला मिळेल की नाही ते माहिती नाही. कारण आपल्या इथे मुलांचा अभ्यास वाढला की खेळ आपसुकच बंद होतात. त्यामुळे ती माझी करियर होऊ शकत नाही. तरीही माझ्या जीवनात मी जे काही करीन ते मी सचिनसारखे जीव तोडून करीन एवढे मात्र नक्की.
Set 2: माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध – Essay On Cricket In Marathi
खेळ हा लहान मुलांच्या आवडीचा विषय. मग तो आवडीचा खेळ असेल तर सोन्याहून पिवळे! माझा आवडता खेळ आहे क्रिकेट. माझे मित्रही हा खेळ आवडीने खेळतात. त्यामुळे या खेळाचा मला कंटाळा येत नाही.
भारत हा क्रिकेटवेडा देश मानला जातो. खूप लोक क्रिकेट पाहतात आणि खेळतातही. सुनील गावस्कर हा जुन्या पिढीतील महान खेळाडू. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा काढण्याचा विश्वविक्रम प्रथमच केला. आज दहा हजारांहून अधिक धावा काढणारे ब्रायन लारा, अॅलन बॉर्डर, सचिन तेंडूलकर असे खेळाडू आहेत.
सचिन तेंडूलकर तर क्रिकेटमधील महान तारा. त्याच्या नावावर एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त धावा काढणारा व सर्वांत जास्त शतके काढणारा फलंदाज असे अनेक विक्रम आहेत.
मलाही सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखे महान खेळाडू व्हावे असे वाटते. त्यासाठी मी खूप मेहनत घेतो. सुटी असली की, आमची क्रिकेटशी गट्टी जमते. मी ओपनर बॅटस्मन म्हणून नेहमी खेळायला येतो. एकेरी, दुहेरी धावा घेण्यापेक्षा चौकार, षट्कार यांची आतषबाजी करायला मला खूप आवडते.
शहराप्रमाणे खेड्यांतही लहान मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. हाफ पीच व ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा खेड्यात विशेष लोकप्रिय आहेत. क्रिकेटच्या मैदानावर जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला तहान भुकेचे भान राहत नाही.
Set 3: माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध – Maza Avadta Khel Cricket
लहान मुलांनी आणि अगदी मोठ्या माणसांनीसुद्धा कुठल्या ना कुठल्या खेळात आपले मन रमवलेच पाहिजे. खेळामुळे चांगला व्यायाम घडतो, मन प्रफुल्लित आणि उत्साही बनते. मानसोपचार तज्ञ तर म्हणतात की नको ती व्यसने लागणे खेळामुळे टळते, तसेच खेळात हार-जीत असते. त्यामुळे दोन्हीची सवय होऊन अंगात खिलाडू वृत्ती बाणवली जाते.
आपल्या देशात बरेच खेळ खेळले जातात. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, हॉकी, टेबल टेनीस, लॉन टेनीस, बॅडमिंटन, खोखो, बुद्धिबळ ही त्यापैकी काही खेळांची नावे. ह्या सर्व खेळांमध्ये क्रिकेट हा खेळ सर्वात लोकप्रिय आहे. हा खेळ इंग्रजांनी सर्वप्रथम आपल्या देशात आणला. जागतिक स्तरावर पाहिले तर अमेरिका आणि युरोपीय देशांत फुटबॉल हाच खेळ लोकप्रिय आहे. इंग्लंडचे राज्य ज्या देशांवर होते असे देश म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, वेस्ट इंडिज, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि दस्तुरखुद्द इंग्लंड एवढेच देश क्रिकेट खेळतात.
क्रिकेट एकुण दोन प्रकारात खेळले जाते. एक दिवसीय सामना आणि पाच दिवसीय सामना. एक दिवसीय सामन्यात दोन्ही देश ठराविक ओव्हर्स खेळतात. सामन्याचा निकालही त्याच दिवशी लागतो. ह्याविरूद्ध पाच माता दिवसीय सामना मात्र अगदी संथ गतीने चालतो. त्यात किती ओव्हर्स खेळायच्या तेही ठरवून घेतलेले नसते. त्यामुळे हारजीत न होता सामना तुटू शकतो.
क्रिकेटचा सामना दोन संघात होतो. प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. निर्णय देण्याची कामगिरी दोन पंचांवर सोपवलेली असते. क्रिकेट खेळायचे झाले तर मोठे मैदान लागते. ते चांगले साफ केलेले असावे लागते. धावपट्टीच्या दोन्ही बाजूंना तीन तीन विकेट लावलेल्या असतात. ह्या विकेट्समधील अंतर २२ मीटर असले पाहिजे असा नियम आहे. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांना बोलावून नाणेफेक करतात. अगोदर बॅटीग कुणी करायची हे जो कर्णधार जिंकतो तो ठरवतो. सामना सुरू झाला की चेंडू फेकणा-या संघाचे सर्व अकरा खेळाडू आणि बॅटींग करणा-या संघाचे दोन खेळाडू मैदानात येतात. प्रत्येक ओव्हरमध्ये गोलंदाज सहा चेंडू टाकतो.
गोलंदाजाने तीन चेंडू लागोपाठ तीन विकेट घेतल्या तर त्याला हॅट ट्रिक म्हणतात. फलंदाजाने षट्कार मारला तर पंच दोन्ही हात वर करतो, चौकार मारला तर हात पुढे करून फिरवतो आणि तो बाद झाला तर एक बोट आकाशाकडे दाखवतो. पंचाचा निर्णय मानणे सर्व खेळाडूंवर बंधनकारक असते. धावांची मोजणी करण्यासाठी बाजूला धावफलक लावतात. एक फलंदाज बाद झाला की दुसरा मैदानात येतो. दहा फलंदाज बाद होईतो हा क्रम चालतो. नंतर मग दुसरा संघ फलंदाजी करण्यास येतो.
एकदिवसीय सामने हल्लीच्या घाईगडबडीच्या जमान्यात लोकप्रिय झाले आहेत ह्यात काहीच नवल नाही. क्रिकेटच्या खेळाडूंना अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. परंतु चांगला खेळ खेळण्यासाठी परिश्रमही घ्यावे लागतात.खेळताना खूप सावध, चपळ आणि एकाग्र असावे लागते.
भारतात हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
Set 4: माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध – Essay on Cricket in Marathi
खेळ हे मनोरंजनाचे एक साधन आहे. खेळामुळे चांगला व्यायाम होतो. शरीर बांधेसूद आणि मजबूत बनते. आपल्या भारतात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. उदा. हॉकी, टेबल टेनिस, बुद्धिबळ, व्हॉलिबॉल, कबी, फुटबॉल. या सर्व खेळांमध्ये क्रिकेट सर्वात लोकप्रिय असल्यामुळे राष्ट्रीय खेळ सूचीत त्याचे नाव सर्वात वर आहे. क्रिकेट इंग्लंडमधून भारतात आला. क्रिकेटचे सामने दोन प्रकारचे असतात. एक दिवसीय सामना आणि पाच दिवसांचा सामना. एक दिवसीय सामन्यात दोन्ही संघ ठरलेले ओव्हर्स खेळतात. सामन्याचा निर्णय पण त्याच दिवशी लागतो. पाच दिवसीय सामना संथपणे चालतो. त्याचे ओव्हर्स ठरलेले नसतात. सामना हार जीत न होता संपू शकतो. क्रिकेट भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका, दक्षिण अफ्रिका, न्यूझिलंड इ. देशांमध्ये फार प्रिय आहे.
क्रिकेटचा सामना दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघात ११ खेळाडू असतात. निर्णय घेण्याचे काम करण्यासाठी दोन अंपायर (पंच) असतात. खेळण्यासाठी मोठे, समतल, स्वच्छ मैदान लागते. धावपट्टीच्या दोन्ही बाजूला समोरासमोर तीन तीन विकेट लावलेल्या असतात. त्यांच्यातील अंतर २२ मीटर असते. खेळासाठी चेंडू आणि बॅट लागते. सामना सुरू होण्यापूर्वी टॉस केला जातो. त्यासाठी दोन्ही संघांच्या कप्तानांना बोलावतात. जो कप्तान जिंकतो त्याच्या मनावर पहिली खेळी कुणी खेळावी ते अवलंबून असते. सामना सुरू होताच चेंडू फेक करणाऱ्या संघाचे ११ खेळाडू आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचे दोन खेळाडू मैदानात येतात. बॉलिंग करणारा प्रत्येक ओव्हरमध्ये सहा बॉल टाकतो. बॉलरने तीन चेंडूत एकामागोमाग एक तीन विकेट घेतल्या तर त्याला हॅट ट्रिक म्हणतात. खेळाडूने षटकार मारला तर अंपायर दोन्ही हात वर करतो. चौकार मारला तर हात पुढे करून फिरवितो. खेळाडू बाद झाला तर हाताचे एक बोट दाखवितो. अंपायरच्या निर्णयाला कोणताही खेळाडू विरोध करु शकत नाही. त्याचा निर्णय सर्वांना मान्य असतो. धावांची मोजणी करण्यासाठी एक स्कोअर बोर्ड पण असतो. त्यावर किती धावा झाल्या हे दर्शविले जाते. एक खेळाडू आऊट झाल्यावर दुसरा खेळाडू मैदानात येतो. दहा खेळाडू बाद होईपर्यंत हाच क्रम चालू असतो. मग दुसरा संघ खेळतो. आजकाल एक दिवसीय सामना फार लोकप्रिय झाला आहे. यात ५० ओव्हर्स खेळतात. आज-काल २० ओव्हर्स ही मॅच खेळली जाते. मागील वषी आपण २० ओव्हर्स सामन्यात विश्वविजेते ठरलो.
क्रिकेटचा खेळाडू सावध, चपळ, एकाग्रता असलेला असावा. जिंकण्यासाठी त्याने शेवटच्या क्षणपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. क्रिकेट खेळाडूंना अमाप प्रसिद्धि मिळते. चांगला खेळ केल्यास जगातील रसिकांच्या गळ्यातील तो ताईत बनतो. भारतात क्रिकेट खूपच लोकप्रिय आहे.
Set 5: माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध – Essay on Cricket in Marathi
खेळ आपल्यासाठी अंत्यत आवश्यक गोष्ट आहे. खेळ नसेल तर आपलं जीवन निरस आणि जड होऊन जाईल. खेळल्या नंतर विश्रांती आणि परिश्रमाचा आनंद मिळतो. यामुळे आपल्या जीवनात संतुलन कायम रहाते. मनोरंजनासोबत यामुळे व्यायाम देखील आपोआप होतो.आपल्याकडे देशी-विदेशी असे अनेक प्रकारचे खेळ लोकप्रिय आहेत. कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, धावणे, कुस्ती, नेमबाजी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, पोलो क्रिकेट आदी काही महत्त्वाच्या खेळांची नावे सांगता येऊ शकतात. क्रिकेट एक आधुनिक आणि अतिशय लोकप्रिय खेळ आहे. ठिक-ठिकाणी क्रिकेट संघटीत आणि असंघटीत स्वरूपात खेळल्या जातो. मुळात हा एक विदेशी खेळ आहे. इंग्लडवरून तो इथे आला परंतु आता तो इतका लोकप्रिय झाला आहे की तो विदेशी वाटत नाही.
भारतीय क्रिकेट टीम जगातील नावाजलेल्या टीमपैकी एक आहे. या टीमने वल्डकप देखील जिंकला आहे आणि अनेक क्रिकेट सामने देखील. अंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय क्रिकेट टीमचे मोठे नाव आहे. आपल्याकडे अनेक प्रसिद्ध क्रिकेटचे मैदान आहेत आणि आणखी आहेत सामने, पुरस्कार, शील्डस्, कप आदी.क्रिकेटचे मॅच दोन प्रकारचे असतात. एक, एक दिवसीय आणि दुसरा टेस्ट मॅच, टेस्ट मॅच पाच दिवस खेळला जातो. हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो. प्रत्येक टीममध्ये आकरा-आकरा खेळाडू असतात. ज्यावेळी एक संघ बल्लेबाजी करतो, तर दुसरा बॉलिंग व क्षेत्र-रक्षण, एक खेळाडू सहा वेळा बॉल फेकू शकतो, त्याला ओव्हर म्हणतात. बॅटधारक आलेला बॉल जास्तीत जास्त दूर जाईल असा फटका मारता, क्रिकेटच्या खेळाचे विस्तृत नियम-उपनियम आहेत. या खेळ खेळण्यासाठी खेळाडू नेहमी सावध, सतर्क, एकाग्र, धैर्यवान आणि पूर्णपणे फिट असायला हवा.
एक दिवशीय सामन्याने क्रिकेटला एक नवा आयाम आणि लोकप्रियता दिली आहे. भारताशिवाय पाकिस्तान, इंग्लड, ऑस्ट्रलिया, न्युझिलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ देखील जगप्रसिद्ध आहे. झिंबाबे व बंग्लादेशसारखे देश देखील आता या खेळात उतरले आहेत.
पुढे वाचा:
- माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध
- माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी
- माझा आवडता अभिनेता निबंध मराठी
- माकडांची शाळा निबंध मराठी
- महाराष्ट्रातील अभयारण्ये मराठी निबंध
- महापूर निबंध मराठी
- महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती निबंध मराठी
- महापुरुषांचे मोठेपण निबंध मराठी
- महात्मा बसवेश्वर निबंध मराठी
- महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी
- महागाई एक समस्या मराठी निबंध
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ