Set 1: मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध – Mi Pahilela Prekshaniya Sthal

‘केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार’ असे रामदासस्वामींनी म्हणून ठेवलेच आहे. त्यामुळे प्रेक्षणीय स्थळांना भेटणे हा आम्हा मुलांच्या अभ्यासाचाच एक भाग आहे.

यंदा शाळेने आमची सहल रायगडावर नेली होती. इतिहासाच्या जुन्नरकर सरांनी सहलीची व्यवस्था केली होती. शिवाय ते आमच्याबरोबर असल्यामुळे आम्हाला खूपच मजा आली.

शाळेने स्वतंत्र बसच केलेली असल्यामुळे आम्हाला ते सोयीचे झाले. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड येथे आहे. आम्ही बसने रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावापाशी गेलो. पाचाडला माता जिजाऊच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही गडाच्या पाय-या चढायला सुरूवात केली. खरे तर तिथे आता विजेचा पाळणा केला आहे. परंतु आम्हा शाळेतल्या मुलांना पाळणा काय करायचा? म्हणून आम्ही चालतच निघालो. जुन्नरकर सरसुद्धा आमच्यासोबत चालत होते. थोडे अंतर चढल्यावर आम्हाला चित् दरवाजा लागला. तो भला मोठा दरवाजा पाहून आम्हाला वाटले की गड जवळ आला. परंतु तसे नव्हते. गड अजून बराच उंचावर होता. गडावर चढताचढता आसपासचे विहंगम दृश्य पाहात आम्ही चढत होतो.

वर गेल्यावर महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाच्या खोल्यांत आमची सोय केली होती. खोल्या खूप प्रशस्त आहेत. खोलीच्या गॅलरीत उभे राहिल्यावर भोवतीच्या सह्याद्रीच्या डोंगरकपा-या एवढ्या सुंदर दिसत होत्या की ते दृश्य पाहात तिथेच उभे राहावेसे वाटत होते.

दुस-या दिवशी सकाळी आम्ही रायगडदर्शनास बाहेर पडलो. शिवाजीमहाराजांची ही राजधानी असल्यामुळे गड चांगलाच भव्य आहे. गडावर फिरण्यासाठीही बरेच आहे. १०३० साली रायरी नामक किल्ला सरदार मोरे ह्यांनी बांधला होता. शिवाजीमहाराजांनी त्यांच्याकडून तो घेतला आणि तिथे राजवाडा, राणीमहाल आणि राजदरबार बांधवून घेतला. किल्ल्यावरील बाजार आजही शाबूत आहे. तेथील दुकानांची जोती एवढी उंच आहेत की खुशाल घोड्यावर बसून वस्तू विकत घ्याव्यात.

आम्ही टकमक टोक पाहिले. तिथे आता कुंपण घातले आहे. तिथून पूर्वी गुन्हेगारांचा कडेलोट केला जात असे. त्याशिवाय आम्ही कुंभलडा बुरूज, हत्ती तलाव, नाने दरवाजा आणि गंगासागर तलावही पाहिला. तिथेच बाजूला हिरकणी बुरूज होता. हिरकणी नावाची गौळण गडावर दूध विकायला खालच्या गावातून येत असे. एके दिवशी दूध घालता घालता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. तिचे तान्हे बाळ घरी होते म्हणून बाळासाठी जीवावर उदार होऊन ती ह्या दुर्गम कड्यावरून उतरून खाली गेली होती. तिथे महाराजांनी नंतर हिरकणी बुरूज बांधला. त्याशिवाय रायगडावर महाराजांचा दरबार आहे, त्यांची समाधी आहे. त्यांच्या समाधीजवळच त्यांच्या स्वामीनिष्ठ कुत्र्याची- वाघ्याचीसुद्धा समाधी आहे.

सर आम्हाला शिवाजीमहाराजांच्या कुशल राज्यकारभाराचे वर्णन करून सांगत होते आणि सह्याद्रीच्या कुशीतील रायगडावर उभे राहून आम्ही गुंग होऊन ते ऐकत होतो.

असा तो रायगड. त्याने आम्हाला इतिहासाकडे पाहाण्याची नवीन दृष्टीच दिली.

Set 2: मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध – Mi Pahilela Prekshaniya Sthal

यावर्षी उन्हाळयाच्या सुटयांमध्ये आमच्या शाळेने हिमाचल प्रदेशात सहल आयोजित करण्यात आली होती. ही सहल १५ दिवसांची होती व सिमला, कुलू आणि मनाली तसेच डलहौसी ही ठिकाणे पहाणार होतो. आम्ही सर्वजण या सहलीची आतुरतेने व उत्सुकतेने वाट पहात होतो. अखेर तो दिवस उजाडला.

आम्ही पुण्याहून रेल्वेने निघालो व दुसऱ्या दिवशी दिल्लीला पोहोचलो. दिल्लीपासून पुढे एक बस ठरविली होती. आम्ही सकाळी सिमल्याला पोहोचलो. एका हॉटेलमधे आमची व्यवस्था करण्यात आली होती. आम्ही आमचे सामान खोल्यांमध्ये नेले व सर्व आवरुन बाहेर पडलो. सिमला ही हिमाचल प्रदेशची उन्हाळयातील राजधानी आहे. शहर अतिशय सुरेख आहे. आम्ही सर्वप्रथम पतियाळाच्या महाराजांचा राजवाडा पहाण्यास गेलो. आता या राजवाड्याचे रुपांतर एका हॉटेलमध्ये केले आहे. येथे जगातील सर्वात अधिक उंचीवरील क्रिकेटचे मैदान आहे. सिल्यापासून जवळच एक जुने गोल्फ मैदान आहे. रस्त्यात आम्हाला, देवदार वृक्षांचे घनदाट जंगल, लाल कौलारु घरे, रंगीबेरंगी फुले व विस्तिर्ण गवताळ कुरणे दिसली. घाटातील वळणा-वळणाचे रस्ते अतिशय सुंदर होते. आमच्या सोबतच रस्त्याने धावत होती बियास नदी! तिच्या पाण्याचा मधुर आवाजाने मन प्रसन्न झाले. काय पाहू आणि काय नाही असे वाटत होते.

सिमल्याहून आम्ही कुलू व मनाली येथे आलो. हा तर पृथ्वीवरचा स्वर्गच होता, शहराच्या चारही बाजूंनी बर्फाच्छादित शिखरे चमकत होती. प्रत्येक घराबाहेर व कोपऱ्यांवर गुलाबाच्या फुलांची झाडे होती. या झाडांवर फुलांचे घोस लटकत होते. सफरचंदांच्या बागा आम्ही येथे प्रथमच पाहिल्या हवामान अतिशय प्रसन्न व आल्हाददायक होते. येथून काही अंतरावर असलेल्या सुंदरनगर येथे डोंगर खोदून सरोवर बनविलेले आहे. आम्ही मनालीला भीमाची बायको व घटोत्कचाची आई, हिडींबा हिचे मंदीर पाहिले. आम्ही एका स्वेटर विणण्याच्या कारखान्यासही भेट दिली. आमच्यापैकी काहींनी तेथून स्वेटर, शाली खरेदी केल्या.

हिमाचल प्रदेशातील अजून एक सुंदर ठिकाण म्हणजे डलहौसी. येथील अस्पर्श सौंदर्य, गवताळ कुरणे व घनदार जंगले पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती. आम्ही येथे खजिहार सरोवर पाहिले. विश्रामगृहाजवळ चित्रे, हरणे व इतर जंगली जनावरे पहाण्याची सोय होती. देवदार व पाईनच्या गगनचुंबी वृक्षांनी वेढलेल्या या शहरावर निसर्गाने सौंदर्य उधळून दिलेले आहे. खरोखर हिमाचल प्रदेश म्हणजे स्वर्ग आहे. ज्याने ही ठिकाणे पाहिली नाहीत त्याचे जीवन व्यर्थ आहे. मी ही सहल कधीही विसरू शकणार नाही.

मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध – Mi Pahilela Prekshaniya Sthal

पुढे वाचा:

Leave a Reply