Set 1: प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी – Prani Sangrahalay Bhet Essay in Marathi
हल्लीच आम्ही म्हैसूर येथे गेलो होतो तेव्हा तिथल्या प्राणी संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला.
हे प्राणीसंग्रहालय खूपच मोठ्या भागात पसरलेले आहे. तिथे पिंजरे फारच कमी आहेत. मोठमोठ्या मैदानांभोवती खंदक खणून त्या मैदानांत प्राण्यांना मोकळेच सोडलेले आहे. खंदकांचा अडथळा मध्ये असल्यामुळे प्राणी ते ओलांडून बाहेर येऊ शकत नाहीत आणि माणसेसुद्धा खंदक ओलांडून आत जाऊ शकत नाहीत.
वाघ, सिंह, अस्वल, साळू असे अनेक प्राणी तिथे त्यांच्या नेमून दिलेल्या मैदानी भागात मुक्त संचार करीत असल्यामुळे त्यांच्या चेह-यांवर तुकतुकी दिसत होती. नाही तर बरेचदा हे प्राणी अगदी निस्तेज दिसतात. कारण त्यांना लहान जागेत कोंडून ठेवले जाते आणि खायलाप्यायलाही पुरेसे दिले जात नाही. पण इथे मात्र तसे नव्हते.
आम्ही तिथे उंटाचे एक छोटेसे पिल्लू पाहिले. ते फारच गोंडस दिसत होते. मी त्याला हात लावला परंतु ते घाबरले नाही त्यामुळे मग मी त्याला कुरवाळले. फक्त माकडांना तेवढे पिंज-यात ठेवलेले होते. पण पिंज-यात असूनही ती माकडे भरपूर उड्या मारीत होती. त्यांचा खेळ पाहून मला आमच्या वर्गाची आठवण झाली.
ह्या प्राणीसंग्रहालयात जागोजागी लिहिले होते की ‘प्राण्यांना काहीही खायला देऊ नका. आम्ही त्यांना व्यवस्थित खायला देतो.’ तसेच ‘ प्राण्यांना दगड मारू नका, अशीही सूचना लिहिलेली होती. ती वाचून मला खूप आश्चर्य वाटले. म्हणजे ह्या वन्य प्राण्यांना छळायला आणि त्रास द्यायलाही काही लोकांना आवडते तर. ही गोष्ट मला खूपच खटकली.
तिथे हरणे, काळवीटे, सांबर, ससे, लव्हबर्ड्स, मोर, काकाकुवा, घुबड, ससाणा असे अनेक पक्षी होते. पक्ष्यांना पिंज-यात ठेवलेले बघून मात्र फार वाईट वाटत होते. बिचा-यांचे स्वातंत्र्य आपण असे हिरावून घेणे योग्य नव्हे.
मुख्यत्वेकरून लहान मुलांसाठी करमणूक म्हणून आणि मोठ्यांनाही असणारे कुतुहल म्हणून ही प्राणीसंग्रहालये बांधली जातात. त्यांच्याभोवती बाग असते. त्या बागेत लोकांना मोकळेपणाने फिरता येते. प्रत्येक शहरातील नगरपालिकेचे ते कामच आहे. त्या संग्रहालयातील प्राण्यांची निगा राखण्यासाठी, त्यांना पुरेसे खाणे देण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी माणसे नेमणे, त्यांच्या तब्येतीची देखभाल करण्यासाठी पशूवैद्य नेमणे हे सगळे काम स्थानिक शासनव्यवस्था सांभाळते. बाबांनी मला सांगितले की जंगलात सापडलेल्या जखमी, आजारी पक्ष्यांना आणि प्राण्यांनाही प्राणीसंग्रहालयात आणले जाते आणि तिथे त्यांची जपणूक केलीजाते. त्यामुळे मला प्राणीसंग्रहालयाचे महत्व विशेष पटले आहे.
Set 2: प्राणी संग्रहालयास भेट निबंध मराठी – Prani Sangrahalay Bhet Essay in Marathi
मागच्या रविवारी आभाळ भरून आले होते. वातावरण खूप छान होते. मी माझ्या मित्रांसमोर प्राणिसंग्रहालयास जाण्याचा प्रस्ताव मांडला. ते सगळे माझ्याशी सहमत झाले. आम्ही मारुती मोटारीने प्राणिसंग्रहालयास गेलो. गाडी उभी करून मुख्य प्रवेशद्वाराकडे गेलो. तिथे खूप जण तिकिटे घेत होते. काही जण गप्पा मारीत होते. काही जवळच्या झाडाखाली आराम करीत होते. आम्ही पण तिकिटे विकत घेतली.
औरंगाबादचे हे प्राणिसंग्रहालय बसस्टँडजवळच्या सिद्धार्थ उद्यानात आहे. उद्यानात एक तळे आहे. त्यात अनेक प्रकारचे मासे पोहत होते. सुंदर-सुंदर बदके, बगळे, अनेक प्रकारच्या चिमण्या, पक्षी जलक्रीडेचा आनंद घेत होते. पुढे गेल्यावर पक्ष्यांचा विभाग आला. त्यात नाना प्रकारचे पक्षी, पोपट, कबुतर, नीळकंठ पक्षी आदी किलबिलत होते. तिथे आम्हाला घुबड पण पाहावयास मिळाले.
आणखी थोडे पुढे गेल्यावर उंच जाळी लावलेल्या मोठ्या विभागात सिंह आणि चित्ते फिरत होते. काही विश्रांती घेत होते. काही प्रेक्षकांना पाहून डरकाळ्या फोडीत होते. काही सिंह पिंजऱ्यात बंद केलेले होते. त्यांच्या खाण्याच्या भांड्यात मांसाचे तुकडे पडलेले होते. एका पिंजऱ्यात काही दुर्मिळ असणारे पांढरे सिंह होते. हे सिंह एका राजाने प्राणिसंग्रहालयाला भेट म्हणून दिले होते. अजून थोडे पुढे गेल्यावर आम्ही एका बागेत पोहोचलो. तिथे अनेक जातींची हरणे चरत होती. ते खूप सुंदर दिसत होते. काही हरणांची शिंगे खूप मोठी होती. त्याच्या पुढे गेल्यावर अनेक माकडे दिसली. मुले त्यांना चिडवीत होती. काही मुले त्यांच्या पुढे फुटाणे टाकीत होते. माकडे झाडावरून खाली उड्या मारून ते फुटाणे खात होते.
प्राणिसंग्रहालयात अस्वले, पाण घोडा, शहामृग, जिराफ आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. एका विभागात नीलगाय, आफ्रिकेतला रेडा व अन्य काही दुर्मिळ प्राणी होते. इथे गेंडा पण पाहावयास मिळाला. कांगारु हा प्राणी आम्ही येथे पहिल्यांदाच पाहिला.
फिरून-फिरून आम्ही थकून गेलो. अडीच तीन तास झाल्यावरही पूर्ण प्राणिसंग्रहालय बघणे झाले नव्हते. मध्येच लहान मुलांसाठी असलेली एक रंगी बेरंगी रेल्वे गाडी दिसली. त्यात बसलेली मुले आनंदाने हसत-खिदळत होती. प्राणीसंग्रहालयात हत्तीवर बसून फेरी मारण्याचा आनंद घेण्याची सोय होती. आम्हीही रेल्वे व त्यानंतर हत्तीवर बसून फेरी मारली.
औरंगाबादचे हे प्राणिसंग्रहालय एक प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे खूप स्वच्छता पाळली जाते. शक्य तितकी नैसर्गिक वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. जनावरांच्या देखभालीसाठी बराच मोठा नोकरवर्ग आहे. आजारी प्राण्यांच्या इलाजासाठी येथे जनावरांचे डॉक्टर पण येतात. केवळ भारतीयच नव्हे तर विदेशी पर्यटकही हे प्राणिसंग्रहालय पाहण्यास येतात. प्राणिसंग्रहालयात आम्हाला आनंदाबरोबरच बरीच माहिती पण मिळाली.
पुढे वाचा:
- प्राणी आमचे मित्र मराठी निबंध
- प्रसंगी अखंडित वाचीत जावे निबंध मराठी
- प्रवासाचे महत्त्व निबंध मराठी
- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे
- प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध
- प्रदूषण निबंध मराठी
- प्रदुषणाचा भस्मासुर निबंध मराठी
- प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट निबंध मराठी
- प्रगत भारतीय महिला निबंध मराठी
- पोस्टमन निबंध मराठी
- बैल पोळा निबंध मराठी
- पोलीस निबंध मराठी
- पोरक्या मुलीचे मनोगत
- पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
- पुस्तके आपली मार्गदर्शक निबंध
- पुस्तकाची कैफियत निबंध मराठी
- पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध