पिंजऱ्यातील सिंहिणीचे मनोगत – Pinjryatil sihiniche Manogat Nibandh

“या मुलांनो, या ! पुस्तकातील सिंहिणीची कहाणी वाचूनच तुम्ही मला पाहायला आला आहात ना ! तुम्हांला माझे जीवनचरित्र ऐकायचे आहे ना? मग ऐका तर ! माझा जन्म घनदाट जंगलात झाला. बालपणाचे ते दिवस फार रम्य होते. भावंडांबरोबर खेळण्यात मजा येत होती. आई वेळेवर खाऊ घालत होती. शिकार कशी करायची, हे शिकवत होती. त्या लुटुपुटूच्या लढाईत मी रमले होते. आपण खूप मोठे झालो, अशी माझी समजूत होती.

या गैरसमजुतीतून मी आईच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि घराच्या हद्दीपासून एकदा दूर दूर गेले. तरी आई मला जगातील धोक्यांची जाणीव देत होती. जपून राहायला सांगत होती. आईचे सांगणे मनावर न घेतल्याने जे व्हायचे तेच झाले. मी जाळ्यात अडकले आणि कायमची गुलाम झाले.

आता मी राहायचे कसे, खायचे काय, करायचे काय याचा निर्णय इतर घेऊ लागले. स्वच्छंद जंगलात हिंडायची मला सवय होती व इथे मला केवळ पिंजऱ्यातील लहानशा जागेत राहावे लागे. एका सर्कसच्या शिकारखान्यात माझा समावेश करण्यात आला होता. सर्कशीतील रिंगमास्टर वेगवेगळ्या कसरती माझ्याकडून करून घेत असे. कसरत जमली नाही की बसलाच चाबकाचा फटका. असा संताप यायचा त्या रिंगमास्टराचा… वाटायचे की त्याचा गळा पकडावा आणि नरडीचा घोट घ्यावा. पण मी गुलाम होते. मोठमोठे साखळदंड माझ्या पायांत अडकवलेले असत.

सर्कशीच्या रिंगणात माझे सारे आयुष्य गेले. शिकारखाना पाहायला मुलेमाणसे आली की मी पाठ करून बसायची. खूप गावे, खूप देश हिंडले. सर्कसचा मालक गब्बर झाला. पण आम्हांला काय मिळाले? केवळ गुलामी ! साऱ्या इच्छा, आकांक्षा मी गुंडाळून ठेवल्या होत्या. आता माझे वय झाले आहे, हातपाय हलत नाहीत. सर्कशीत माझा व्हावा तेवढा उपयोग होत नाही. आता आपले भवितव्य काय? या विचाराने मी अस्वस्थ होते. .

सर्कशीतून माझी रवानगी या प्राणिसंग्रहालयात झाली. आता मी थकले आहे. दररोज सकाळी-संध्याकाळी माझ्या पिंजऱ्यासमोर जी गर्दी होते त्याने मी अस्वस्थ होते. बेचैन होते. जंगलची राणी असलेली आज एक प्रेक्षणीय वस्तू बनली आहे. केवळ माझ्या अविचारी वागण्यानेच मी ही दुःखद अवस्था ओढवून घेतली आहे. केवळ मृत्यूच आता मला या दुर्दशेतून मुक्त करू शकेल.”

पुढे वाचा:

Leave a Reply