पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध – Pustakachi Atmakatha in Marathi

तुम्ही आजपर्यंत अनेक महापुरुषांच्या आत्मकथा वाचल्या असतील. पण आज मी तुम्हाला माझी कहाणी ऐकवणार आहे. मी एक अतिशय जुने पुस्तक आहे. माझ्या आयुष्यात मी अनेक प्रकारचे सुख दुःख पाहिले आहेत. सध्या या कोपऱ्यात मी धूळ खात पडलो आहे. कोणाचेही माझ्याकडे लक्ष जात नाही.

सर्वप्रथम मी तुम्हाला माझा जन्म कसा झाला ते सांगणार आहे. या शहरातील एका छोटयाशा घरात मी जन्मलो. तेथे एक अतिशय प्रसिद्ध लेखक रहात असत. त्यांनीच माझी रचना केली. लिखाण पूर्ण झाल्यावर ते मला एक प्रकाशनगृहात घेऊन गेले. प्रकाशकांना ती कादंबरी आवडली व त्यांनी ते पुस्तक छापायचे ठरविले. ते पुस्तक म्हणजे मीच. एक मोठया छापखान्यात माझी छपाई केली गेली. मग एका चित्रकाराने माझ्यातील कथेला अनुसरून सुंदर चित्र काढले. ते झाले माझे मुखपृष्ठ. त्यानंतर जाड पुठ्ठा लावुन माझी बांधणी करण्यात आली. आता मी अतिशय सुंदर दिसू लागलो. लेखकही माझे रूप पाहून खुष झाले. प्रकाशकांनी त्यांना कराराप्रमाणे रक्कम दिली.

यानंतर माझा प्रवास सुरु झाला. सर्वप्रथम मला एक पुस्तकांच्या दुकानात आणण्यात आले, येथे एका मोठ्या कपाटात इतर मित्रांसोबत मजेत दिवस चालले होते. अशातच एके दिवशी एका पुस्तकवेड्या माणसाने मला विकत घेतले व आपल्या घरी नेले. त्याला माझ्यातील विषय खूप आवडला. त्याने अनेकदा माझे वाचन केले. आपल्या मित्रांजवळ त्याने माझी खूप तारिफ केली. सर्वांनी उत्सुकतेने माझे वाचन केले. सर्वांनाच माझ्यातील आशय आवडला. एका मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे प्रवास करीत असताना एका मित्राकडे माझा मुक्काम लांबला. त्याने मला माझ्या मूळ मालकाकडे परत दिलेच नाही. .

हा नवीन मालक माझी अजिबात काळजी घेत नसे. काही वर्षांनी जुने पुस्तक म्हणून त्याने मला विकून टाकले. तेथून मी एका वाचनालयात आलो. अनेक वाचकांनी माझे वाचन केले. माझे कौतुक केले. अनेकांनी हाताळल्यामुळे मी आता जीर्ण झालो आहे. आता एका कपाटात मी व माझ्यासारखी इतर जुनी पुराणी पुस्तके पडून आहोत. फाटण्याच्या भितीने कोणी आम्हास हात लावत नाही. कपाटात व अंगावर साठलेल्या धुळीने माझा जीव गुदमरतो. बारीक किडे व वाळवी यांनी माझ्या शरीरात घर केले आहे. परंतु तक्रार कोणाकडे करणार? मला खात्री आहे, एक ना एक दिवस मला माझे पूर्वीचे वैभव परत प्राप्त होईल.

पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध – Pustakachi Atmakatha in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply