मराठी बाणा निबंध मराठी

“शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे आठवावे संकल्प, भूमंडळी’. शूर शिवरायांच्या मराठी वाण्याच्या या दोन काव्यपंक्ती गुणगुणताना शिवरायांनी स्थापन केलेले शूर मराठी मावळ्यांचे हिंदवी स्वराज्य व त्यांचा पराक्रम यापुढे मराठी मान नतमस्तक होते. आपली मराठी भूमी या शूर लढवय्यांच्या आणि थोर संतांच्या जन्मामुळे व पदस्पर्शामुळे पूनित आणि पावन झाली आहे. म्हणून संस्कृत भाषेतील भगवद्गीता मराठी सर्वसामान्यांसाठी ज्ञानेश्वरीच्या रुपाने मिळालेला अमूल्य ठेवा आहे. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकारामांचे अभंग कीर्तन, ओव्या, भारुडे, गवळणी आजही घराघरांत भक्तिभावाने गाईली जातात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर तरी मराठी भाषेचा गोडवा गाताना सांगुन जातात.

“माझा मराठीची बोलू कौतुके

अमृतातेही पैजा जिके ।।”

म्हणजेच अमृताची गोडी, रसाळपणा माझ्या मराठी भाषेपेक्षाही कमी आहे. म्हणूनच शाहिरांची कवने, पोवाडे लढाईतील पराक्रमांना डफावरील थापेसरशी यशश्री मिळवून देतात. लावण्यामधुन चाळविनाही पाय थिरकतात. रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी शाहिरांची ही कवने मराठी श्रीतृवृंदाला वरदानच आहे.

मराठी भाषेच्या या साहित्यसागरात अनेक कवींचीसुद्धा ‘जे न देख सके रवी ते देख सके कवी’ अशी अवस्था होते. संतकाव्यांचा रसास्वाद घेताना रस्त्यावरील दोन दगडही टाळाप्रमाणे वाजू लागतात व भान हरपून सच्चिदानंदी टाळी लागते. माझी मायबोली मराठी शूर वीराला पराक्रम शिकवते. साहित्यिकांशी हितगूज करते. नाटककाराला नाट्य सुचवते, तर कवींना काव्य. मराठी भाषेच्या महासागरात डुंबून गेल्यावर त्यातुन बाहेर निघण्याची कदापिही शक्यता नसते आणि ही रसाळ गोमटी मराठी आपल्याला सदेह रसातळात भिजवून टाकते त्यात तासनतास डुंबत राहिलो तरी मन भरुन येत नाही. हा मराठी वाड्मयाचा ठेवा अमर्याद आहे. त्याची गोडी अवीट आहे. म्हणूनच आजच्या नेतेमंडळीना, राज्यकर्त्यांना मराठीचे माहात्म्य समजले आहे आणि म्हणूनच ब्रिटीशकालीन इमारती आणि वास्तुंना असलेली इंग्रजी नावे बदलून गोड अशा मराठीतून नावे देण्याचा आग्रह चालू आहे.

माझी मायबोली आणि माझी मातृभूमी आम्हा इतकी प्रिय आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतरही मायबोलीची ओढदाटून आली आणि सागराला उद्देशून काव्यपंक्ती रचल्या गेल्या. “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” पाण्याबाहेर मत्स्य जसा तळमळत रहातो तसा त्यांचा प्राण मातृभूमीच्या ओढीने तळमळला. मराठी ज्ञानाचा ठेवा लूटण्यासाठी आजही परदेशी लोक आपल्या राज्यात रहायला येतात, विद्यासंपादन करतात आणि संत, पंत तंतकाव्याची महती गुणगुणत परततात.

मराठीतील दिग्गज लेखक, कवी, कवयित्री आपल्या रसाळ, ओघवत्या वाणीने काव्याने सर्वाना तृप्त करतात. गदिमा, पु. ल. देशपांडे, शांता शेळके एवढेच नव्हे तर अशिक्षित वहिणाबाई चौधरींना देखील प्रतिभा प्राप्त होते. सकाळी लवकर उठून जात्यावर दळताना, सडासंमर्जन करताना आपली खेडयातील गृहिणी सहजच गायिका बनते ते याच प्रतिभावंतांच्या अमूल्य ठेव्यांमुळे. हा ठेवा कायम राखण्यासाठी आज चोहोबाजूंनी प्रयत्न चालू आहेत. ग्रंथ, रेकॉर्डिंग करुन तो ठेवा मराठी माणसाच्या मन संग्रहात साठवला जात आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply