Set 1: मला लॉटरी लागली तर मराठी निबंध – Mala Lottery Lagli Tar Nibandh in Marathi
आमच्या घराजवळ एक पानवाल्याचे दुकान आहे. त्या दुकानाच्या बाजूलाच हल्ली एक लॉटरी तिकिटे विकणारे नवे दुकान आले आहे. त्या दुकानावर पाटी लिहिली आहे ‘ सौभाग्यलक्ष्मी लॉटरी केंद्र. आपले भविष्य आजमावून पाहा आणि करोडो रूपये जिंका. ते वाचून मला खूप कुतुहल वाटले. कित्ती मस्त ना? एक तिकिट फक्त काढायचे, तेही दहा किंवा वीस रूपयांचे आणि त्या बदल्यात मिळवायचे किती? तर करोडो? माझे डोळे तर अगदी चमकूच लागले. मला तेव्हा शाळेतून बक्षिसाचे वीस रूपये मिळाले होते.
मी मनाशी म्हटले की मी एक लॉटरीचे तिकिटच घेऊन टाकतो ह्याचे. घरी आईला सांगितले तेव्हा ती म्हणाली की गंमत म्हणून घेऊन पाहा एकदा, पण फार अपेक्षा ठेवू नकोस आणि वीस रूपये गेल्याचे दुःख करू नकोस. मी जाऊन लॉटरीचे तिकिट घेतले. पाच करोड रूपयांची लॉटरी होती ती महाराजा.
मग घरी येता येता मी स्वप्नच रंगवीत आले की खरोखर आपल्याला ही लॉटरी लागली तर आपण काय करू? लॉटरी लागली तर आम्ही मोठे घर घेऊ. माझे बाबा खूप मेहनत करतात परंतु त्यांना मोठे घर घेणे शक्य झाले नाही. तर आम्ही दोन बेडरूमचा मोठा फ्लॅटच घेऊ. मुख्य म्हणजे घर घेऊन ह्या उरलेले पैसे उडवणार नाही. पैशाची बचत केली तर तो व्याज आणि परतावा या रूपात पैसाच कमावतो. म्हणून उरलेले पैसे आम्ही चांगल्या सरकारी बँकेत आणि म्युच्युअल फंडांच्या योजनांत गुंतवू. मग त्या व्याजातून आम्हाला खूप काही करता येईल. मला आणि माझ्या ताईला नवे फ्रॉक, आईला साडी, बाबांना नवे कपडे, घरातील फर्नीचर, दर वर्षी थंड हवेच्या ठिकाणी सहल असे काय काय करता येईल. वाचायला आवडीची पुस्तके घेता येतील.
आजीआजोबांना गावाला पैसे पाठवता येतील. मला आणि ताईला हवे ते शिक्षण घेता येईल. मला पत्रकारितेचे शिक्षण घ्यायचे आहे तर ताईला इंजिनियर व्हायचे आहे. पैशांअभावी आमची शिक्षणे अडणार नाहीत. त्याशिवाय मला आमच्या घराजवळच्या अनाथाश्रमाला दर वर्षी काही रक्कम देणगी म्हणून देता येईल. लहानपणी आईबाबा आमचे वाढदिवस करायला आम्हाला तिकडेच घेऊन जायचे. तेव्हा आम्हाला कळायचे की आम्हाला आईबाबा आहेत ही केवढी चांगली गोष्ट आहे म्हणून. म्हणूनच समाजाची बांधिलकी मी नक्कीच जपेन. पैसा आला म्हणून उतणार नाही की मातणार नाही.
विचार करता करता मी घराच्या दाराशी आले आणि थांबले. मग विचार केला की लॉटरी लागली आहे कुठे अजून? आणि ती लागणार नाही हेसुद्धा ठाऊक आहे आपल्याला. पण एक दिवास्वप्न पाहायला काय हरकत आहे म्हणते मी…..
Set 2: मला लॉटरी लागली तर मराठी निबंध – Mala Lottery Lagli Tar Nibandh in Marathi
मला लॉटरी लागली तर.. खरंच काय मौज येईल! आनंदच आनंद! मज्जाच मज्जा! मी तरी खूप चैनी करीन. हॉटेलमध्ये जाऊन त-हेत-हेचे पदार्थ खाईन. बाबांना, आईला पैसा मिळवण्यासाठी कष्ट करावे लागणार नाही. मलाही बाबांकडे सहलीसाठी पैसे द्या, परीक्षा फी, पुस्तके, कपडे यासाठी पैसे द्या असा हट्ट धरावा लागणार नाही. माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. शाळेला मोटार गाडीने जाईन. चालत जाणाऱ्या मित्रांना हॉर्न करून सुसाट तसाच पुढे जाईन.
खरेच मला लॉटरी लागली तर मी असा वागेन! माझे मित्र चैनीखोर म्हणतील. कोणी म्हणतील पैशाचा गर्व झालाय याला. नाही.. नाही.. मला लॉटरी लागली तर मी इतका वाईट वागणार नाही. आईवडील, गुरूजी यांनी केलेले संस्कार मी विसरणार नाही. त्या पैशाचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करेन.
मला लॉटरी लागली तर नक्कीच मी त्या पैशाचा योग्य वापर करीन. लॉटरीच्या पैशातून मी गोर-गरीब मुलांची परीक्षा फी देईन. त्यांना कपडे घेऊन देईन. गरीब आजारी व्यक्तींच्या आजारपणासाठी काही रक्कम खर्च करीन. काही पैसे आई-वडिलांच्या आजारपणासाठी राखून ठेवीन. उरलेले पैसे माझ्या पुढील शिक्षणासाठी सुरक्षित ठेवीन.
मला लॉटरी लागली तर मी नक्कीच चांगला वागेन आणि लॉटरीचे पैसे सत्कार्यासाठी खर्च करेन.
Set 3: मला लॉटरी लागली तर मराठी निबंध – Mala Lottery Lagli Tar Nibandh in Marathi
माझ्या शाळेसमोरील बाजारात एक अपंग आणि एक आंधळा दररोज लॉटरी घ्या, लॉटरीची तिकीटे घ्या असे ओरडत असतात. मी एकदा असा विचार केला की जर मला पाच लाखांची लॉटरी लागली तर तर मी सर्वप्रथम आमच्या छोट्याशा घरात वीज नाही, पाण्याचीही सोय नाही ती करून घेईन म्हणजे आईला दिवा लावण्याची आणि डोक्यावर, कमरेवर दूरून पाणी आणण्याची गरज पडणार नाही. तिची कंबर दुखणार नाही.
बाबांसाठी एक छत्री घेईन आणि एक गाडीही घेईन म्हणजे त्यांना रेल्वेच्या गर्दीतून जाताना त्रास होणार नाही. आमच्या गल्लीत मोफत वाचनालये सुरु करीन म्हणजे लोकांना वर्तमानपत्र वाचण्यास मिळतील. एक व्यायामशाळा सुरु करुन मुलांना व्यायामाचे महत्व पटवून त्यांना व्यायाम करायला लावीन.
ज्या मुलांना वसतीगृहात व अनाथालयात रहावे लागते त्यांच्यासाठी खेळणी, पुस्तके, खाऊ, कपडे अशा वस्तू घेऊन देईन. गरीबांसाठीही जेवणाची, कपड्यांची व्यवस्था करुन देईन. पण हे सगळे केव्हा घडू शकेल जर मला लॉटरी लागली तरच.
पुढे वाचा:
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
- मराठी बाणा निबंध मराठी
- मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी
- मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध
- भारतीय शेतकरी निबंध मराठी