मला पडलेले गमतीदार स्वप्न – Mala Padlele Swapna Essay in Marathi

एकदा मी शाळेतून घरी येत होतो. वाटेत अडखळून पडलो. हातापायांवरील धूळ झाडत उठलो आणि मला धक्काच बसला. मी अचानक गुडघ्याएवढा झालो होतो! घरी आलो, तर दाराची कडीही उंचावर! मी उड्या मारून मारून कडी वाजवली!

आईने दार उघडले. आईसुद्धा खूप उंच दिसत होती. माझ्याकडे बघून ती खो खो हसू लागली. घरातले सगळे माझ्याभोवती जमले आणि मोठमोठ्याने हसत सुटले!

मी हादरूनच गेलो होतो. मला खुर्चीवर बसता येईना. खाटेवर जाण्यासाठी स्टुलाचा आधार घ्यावा लागला. न्हाणीघरात गेलो, तर नळाला हात पोहोचेना. शर्ट घातला, तर तो पायापर्यंत आला. दप्तर जड वाटू लागले. पुस्तक मोठे वाटू लागले. पेन नीट पकडता येईना. जेवताना तर तारांबळच उडाली. मी मोठमोठ्याने रडू लागलो.

शेवटी आईबाबांनी मला डॉक्टरांकडे न्यायचे ठरवले. रस्त्यावर आलो, तर प्रचंड गर्दी होती. बसगाड्या अवाढव्य दिसत होत्या. गडबडीत आईचा हात सुटला आणि मला आईबाबाच दिसेनात! मी घाबरलो.

जोरजोरात ओरडू लागलो. बघतो, तर काय! सगळे माझ्याभोवती जमले होते आणि मला झोपेतून जागा करत होते. म्हणजे ते भयंकर स्वप्नच होते तर!

मला पडलेले स्वप्न निबंध मराठी – Mala Padlele Swapna Essay in Marathi

एका काळोख्या रात्री आम्ही खूप आकाश निरीक्षण केले. लुकलुकत जाणारी विमाने, चांदण्या, तारकापुंज, नक्षत्रे यांची माहिती घेता घेताच मला गच्चीवरच गाढ झोप लागली. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ याप्रमाणेच पुढे घडले…

पांढरा शुभ्र वेश परिधान केलेली, अप्रतिम सौंदर्य लाभलेली एक नाजूक परी अलगद येऊन माझ्या उशाशी बसली. माझा हात हातात धरून मला हळुवारपणे उठवू लागली. “शुभम्… बाळ… ऊठ. तुला अवकाशात भरारी मारायची आहे ना ! मग चल तर माझ्या यानात.” माझे डोळे विस्फारले. अचंबित होऊनच मी तिला विचारले, “तू तर कल्पना चावलासारखी दिसतेस् ! आणि यान कसले गं? पुष्पक यान तर नव्हे ना ! तू या यानातून ग्रह, तारे सगळे मला दाखवणार?” सगळ्या प्रश्नांची होकारार्थी उत्तरे मिळाल्यावर मी पटकन् यानात बसलो आणि माझा अंतराळ प्रवास सुरू झाला.

आमचे यान जसजसे अंतराळात दूरवर जाऊ लागले, तसतसे माझे शरीर जड बधीर होऊ लागले. परीने माझ्या अंगावरून आपला गोड, नाजूक हात फिरवला आणि मी तरतरीत झालो. परी म्हणाली, “आता आपण निर्वात पोकळीत आलोय. इथे शून्य गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. स्पेस वॉक करायला आता काहीच हरकत नाही.” आम्ही दोघेही स्पेस वॉक करू लागलो. अहाहा ! किती रोमांचकारी क्षण आहे हा ! नंतर आम्ही सरळ चंद्रावर आणि मंगळावर गेलो. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला बाल अंतराळवीर तो मीच ! परीने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले. इतक्यात… इतक्यात परीच्या हातातून माझा हात सुटला आणि भिरभिरत येऊन धपकन् अंथरुणात पडलो.

चांगली जाग आल्यावर मला पडलेल्या एका सुंदर स्वप्नाने मी सुखावलो.

मला पडलेले गमतीदार स्वप्न – Mala Padlele Swapna Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply