वादळवाऱ्याचा दिवस निबंध मराठी

उन्हाळ्याची रणरण संपून पावसाळा सुरू झाला होता. कधी मुसळधार, तर मधूनच रिमझिम पाऊस पडत होता. पण आजचा दिवस उगवला, तोच मुळी वेगळा तोंडवळा घेऊन ! खरे सांगायचे तर, आजचा दिवस मुळी उगवलाच नाही. घड्याळात आठ वाजलेले दिसत असतानाही आकाशात सूर्याचे दर्शन नव्हते. सर्वत्र काळोख दाटलेला होता. पक्ष्यांची किलबिलही कानी येत नव्हती.

आज अधिराज्य होते ते पावसाचे आणि त्याला साथ होती उन्मत्त वाऱ्याची! पाहता पाहता वाऱ्याने आपला अवखळपणा वाढवला. त्याला रूप आले भीषण वादळाचे. त्या वादळवाऱ्याचा आवाज थरकाप उडवणारा होता. रस्त्यावरील मोठमोठी झाडे उन्मळून पडत होती. आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेले होते. मुसळधार पावसाला खंड पडत नव्हता. साऱ्या आसमंतात वादळवारा घोंघावत होता. रस्ते निर्मनुष्य होते. मला तर घराबाहेर डोकावण्याचेही धाडस होत नव्हते.

दिवसभर पावसाने आणि वाऱ्याने झोडपून काढल्यावर संध्याकाळी वातावरण काहीसे निवळले. आकाशही उजळले. पाऊस थांबला हे पाहून दिवसभर घरात अडकून पडलेली मुलेमाणसे पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडू लागली आणि वादळवाऱ्याच्या उत्पाताचा अंदाज घेऊ लागली.

असा हा आपले शक्तिप्रदर्शन करणारा वादळवाऱ्याचा दिवस जणू काही माणसाच्या उन्मादाला धडा शिकवण्यासाठीच उगवला होता.

पुढे वाचा:

Leave a Reply