भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी – Bhrashtachar Sampla Tar

१९४७ साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. गुलामगिरी आणि पारतंत्र्याच्या शृंखला गळून पडल्या. खऱ्या अर्थाने आपण भारतीय म्हणून गणले जाऊ लागलो पण खरेच आपण स्वतंत्र झालो का ? आपल्याच देशात आपल्याच लोकांकडून आपण लूटले जात आहोत, नागवले जात आहोत आणि याच कारणामुळे देशाची प्रगती खुंटली जात आहे.

आजचे युग विज्ञानाचे युग आहे. शास्त्रज्ञ निरनिराळे शोध लावत आहेत. उदयोजक निरनिराळया उदयोगधंदयात प्रगती करत आहेत. प्रगत देश म्हणून आपल्या देशाचे भविष्य निश्चित आहे. परंतु हाच सुशिक्षित समाज आपल्या बांधवांना भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुरफटून टाकत आहे. शिक्षणापासून ते रोजच्या व्यवहारापर्यंत सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आणि काळा बाजार यांनी आपला विस्तार केला आहे. सर्व क्षेत्रात आणि लहानांपासून मोठयांपर्यंत हा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की भ्रष्टाचाराशिवाय कोणतेच काम पुढे सरकत नाही. ‘लाच देणे किंवा घेणे कायदयाने गुन्हा आहे’ या ओळी फक्त कायदयाच्या पुस्तकातच वाचायला मिळतात. कारण प्रत्येकाला माहीत असते की लाच दिल्याशिवाय आपले काम होणारच नाही. सगळ्या भ्रष्टाचारी वृत्तीचे मूळ म्हणजे आपले शासनच आहे. आपल्या देशात कायदे बनवणारेही तेच आणि कायदे मोडणारेही तेच. .

हे शासनकर्ते भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. या शासनातील लोक मत मिळवण्यापासून ते निवडून आल्यावर देखील सुधारणांच्या नावाखाली मंजूरी मिळवण्यापर्यंत लाच देत, घेत असतात. त्यामुळे स्वत:च्या सात पिढया बसून खातील एवढी तुंबडी भरून ठेवू शकतात. पण सामान्य माणूस मात्र दबून पिचून जातो. जिथे दोन वेळेचे पोट भरण्यासाठी पुरेसे उत्पन्न मिळत नाही तिथे लाच देण्यासाठी कुठून पैसा आणणार आणि लाच देत नाही तोपर्यंत कितीही हेलपाटे घातले तरी काम न होता हात हलवत परत यावे लागणार. त्यामुळे नाइलाजाने कर्ज काढून, उपासमार सोसून हा सामान्य माणूस लाच देऊन आपले काम करून घेत असतो आणि ‘माझे तर काम झाले दुसऱ्याचे मला काय करायचे’ अशा वृत्तीमुळे हरएकजण प्रत्येक क्षेत्रात असेच वागत असतो.

मूल जन्मल्यानंतर शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी देखील शाळा संचालकांचे हात ओले करावे लागतात. नावे वेगळी दिली तरी इथून-तिथून अर्थ एकच आणि अर्थाशीच निगडीत. शाळेत प्रवेश घेण्यापासून ते नोकरी लागण्यापर्यंत पैसे दया कॉलेजला प्रवेश घ्या, कॉलेज संपले की नोकरीसाठी लाच दया. नोकरी लागण्यापासून घर घेणे, ओळखपत्र काढणे, प्रमोशन मिळवणे या सर्वांसाठी इतकेच काय तर खालच्या शिपायापासून वरच्या मॅनेजर पर्यंत सर्वांचे हात ओले करावे लागतात.

असे वाटते भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटण्यासाठी एकजुटीची गरज आहे. एकजुटीने हा प्रश्न सोडवला तरच पैशाशिवाय देखील कामे होऊ शकतात ही भावना लोकांत रुजवली जाईल. आणि ‘आपला’ भारत न राहता ‘माझा’ भारत होईल. दुसऱ्याचे दोष दाखविण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:ला आधी सुधारायला हवे. तरच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम होईल, स्वतंत्र आणि भ्रष्टाचारमुक्त होईल.

भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी – Bhrashtachar Sampla Tar

पुढे वाचा:

Leave a Reply