भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी

हल्लीच शनी-मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही म्हणून खूप मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. स्त्री आणि पुरूष असा भेदभाव करणे अयोग्य आहे असा निकाल न्यायालयाने दिला आणि स्त्रियांसाठी मंदिरप्रवेशाचे दरवाजे खुले झाले.

जुन्या काळी आपल्या देशात स्त्रीला सन्मानाने वागवले जात होते. तिला स्वयंवर करून स्वतःचा पती स्वतः निवडण्याचा अधिकार होता. गार्गी आणि मैत्रेयी ह्या बुद्धिमान विदुषी वेदाभ्यास करीत होत्या. परंतु नंतरच्या काळात स्त्रियांच्या पायात जाचक नियमांच्या आणि रूढीपरंपराच्या बेड्या घालण्यात आल्या आणि पुरूषसत्ताक समाजव्यवस्थेने स्त्रीला आपल्या पायाची दासी बनवले. म्हणजे वर वर तिला’ गृहलक्ष्मी’, दुर्गामाता अशा पदव्या दिल्या परंतु प्रत्यक्षात मात्र तिला खूपच । दुय्यम स्थान दिले.

बालविवाह, विधवांचे केशवपन, शिक्षणाचा अधिकार नाकारणे, सतीची अत्यंत क्रूर प्रथा अशा गोष्टींमुळे स्त्रीवर्गाची परिस्थिती अत्यंत शोचनीय झाली होती. अशा काळात जेव्हा आपल्यावर इंग्रजांचे राज्य आले तेव्हा राजा राम मोहन राय ह्या बंगाली सुधारकांनी त्याविरूद्ध चळवळ उभारली आणि ब्रिटिशांना सतीची क्रूर प्रथा नष्ट करायला लावली. कारण धर्माच्या नावाखाली केलेली ती हत्याच होती. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांनी देशात स्त्रीशिक्षणाचे बीज रोवले. त्या पायी शेणगोळ्याचा मार सोसला. गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे ह्यांनी विधवाविवाहाला उत्तेजन दिले. विधवांनी आपल्या पायांवर उभे राहावे म्हणून त्यांना शिक्षण देण्याची सोय केली. आज जे श्रीमति नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मोठ्या दिमाखाने उभे आहे त्याची उभारणी महर्षी कर्वे ह्यांनीच केली आहे. त्यांचे पुत्र रघुनाथराव कर्वे ह्यांनी कुटुंबनियोजनाचा प्रचार केला तेव्हा लोकांनी त्यांनाही खूप त्रास दिला. परंतु ह्या सर्वांनी जे कार्य केले त्यातून स्त्रियांचे कल्याणच झाले.

आज आपल्या समाजात आपण स्त्रियांना समानता दिली आहे असे वरकरणी म्हणतो. परंतु प्रत्यक्षात तसे घडते का? मुलींना आपण शिक्षण देतो आणि मग म्हणतो की आता तू मोठी झालीस. तुझे लग्न झाले की सासरी जाऊन खालमानेने सर्वांचे ऐकायचे. तिथे आपली मते मांडायची नाहीत. ह्यात किती विसंगती आहे, नाही का? आजही हुंडाबळी होतात. सासरी छळ होतो. अपहरण, बलात्कार होतात. आजही तिला उपभोग्य वस्तू मानले जाते. स्त्रीला एकीकडे उडायला शिकवले जाते तर दुसरीकडे तिचे पंख पद्धतशीरपणे कापण्याचे कारस्थानहीचाललेले असते.

बाहेर कितीही मोठ्या पदावर काम करीत असली तरी घरकाम तिचेच आहे, मुलांनाही तिनेच पाहिले पाहिजे अशा अपेक्षा उच्चशिक्षित मुलींकडूनही केल्या जातात. हे सर्व हळूहळू कमी होत जायला हवे. समाज हा परिवर्तनशील असतो. त्यामुळे तशी आशा व्यक्त करून हा निबंध संपवतो.

पुढे वाचा:

Leave a Reply