प्रसंगी अखंडित वाचीत जावे निबंध मराठी – Prasangi Akhandit Vachit Jave

समर्थ रामदासांनी तीनशे वर्षांपूर्वी म्हणून ठेवले आहे की, ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे. खरोखरच आजच्या काळातही ते किती खरे आहे?

मला पुस्तके वाचायला खूपच आवडतात. म्हणूनच मी एका वाचनालयाचे सदस्यत्व घेतले आहे. तिथे पुस्तके बदलायला गेलो की कुठले पुस्तक घेऊ आणि कुठले नको असे होऊन जाते अगदी.

पुस्तकांना एवढे महत्व आहे त्यामागील मुख्य कारण हेच की ग्रंथ आपले गुरू आहेत, ग्रंथ हे आपले मार्गदर्शक आहेत. पुस्तकाचे पान कधीही उघडले तरी ती आपल्याला ज्ञानदान देण्यास तत्पर असतात. त्यात असलेले ज्ञान सर्व काळ उपलब्ध असते आणि आपल्याला सोयीच्या असेल त्या ठिकाणी बसून आपण त्यांचे वाचन करू शकतो. महाभारत, भगवद्गीता, रामायण, गुरू ग्रंथसाहेब, कुराण, बायबल आदि धार्मिक पुस्तकांतून आपल्याला त्या त्या धर्मात सांगितलेली जीवनविद्या मिळते

पुस्तकांचे प्रकारही किती वेगवेगळे असतात. आत्मचरित्रे, इतिहास, कादंब-या, कथा, बालसाहित्य, कविता, तत्वज्ञान, विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील ज्ञान देतातच त्याशिवाय आनंदही देतात. आपले मन समृद्ध करतात. कार्ल मार्क्स, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी ह्यांच्यासारखी थोर माणसे आज जरी आपल्यात नसली तरी त्यांचे विचार त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून चिरंतन राहातात. हे आपले केवढे मोठे भाग्य असते.

आपण एखादे चरित्र वाचतो तेव्हा त्या व्यक्तीचे जीवन आपण जणू काही त्याच्यासोबतच जगतो. त्या व्यक्तीने कसेकसे निर्णय घेतले, त्याच्यावर काय काय प्रसंग आले हे आपल्याला त्यातून कळतेच पण त्याशिवाय त्या काळातील सामाजिक परिस्थिती काय होती, त्या काळातील आर्थिक व्यवहार कसे होत होते, त्या काळात काय सुखसोयी उपलब्ध होत्या ह्यांचा जणू आरसाच आपल्यासमोर उभा राहातो. इतिहास वाचतानाही अगदी तसेच होते. कथा आणि कादंब-यांतून आपल्याला मानवी जीवनातील ताणबाणे समजतात, कविता वाचून आपल्याला प्रतिभेच्या सागरात डुंबल्यासारखे होते. तत्वज्ञान वाचून ह्या क्षणभंगूर जीवनाचे रहस्य ओळखता येते. एकुणच काय तर पुस्तकांमुळे एकाच जन्मात अनेक जन्म जगल्याचा आनंद आपल्याला मिळतो.

काही पुस्तके अगदी रोजच्या कामाची सुद्धा असतात बरे. म्हणजे स्वयंपाक, शिलाईकाम, रांगोळी काढणे, बागकाम, आरोग्य, आजीबाईंचा औषधांचा बटवा अशी आणि अशासारखी पुस्तके आपल्याला रोजच्या जीवनात मदत करतात. त्याशिवाय काही पुस्तके सल्ला देणारी पण असतातती म्हणजे जीवनात यशस्वी कसे व्हावे, चांगले मित्र कसे जोडावेत, आत्मविश्वास कसा मिळवावा? ह्यासारख्या पुस्तकांच्या वाचनानेही आपल्या मनावर चांगले संस्कार होतात. स्वतःची ओळख होणे जीवनात खूप महत्वाचे असते. हे सर्व आपल्याला ह्या पुस्तकांतूनच मिळते.

शिवाय जोडीला आमची अभ्यासाची पुस्तके असतातच. आत्ताची आमची पुस्तके त्या त्या विषयाची केवळ तोंडओळख करून देणारी आहेत. मात्र पुढे जाऊन आम्हाला तेच विषय अगदी सखोल अभ्यासावे लागणार आहेत. तो सखोल अभ्यास करताना आम्हाला मार्गदर्शन करायला शिक्षक तर असतीलच पण त्याच जोडीला पुस्तकेही असतीलच ना.

म्हणूनच मला वाटते की पुस्तके आपले मनोरंजन करतात, ती आपल्या कल्पनाशक्तीला खाद्य पुरवतात, साहसाची, नवे काहीतरी करून पाहाण्याची प्रेरणा देतात. आपल्याला आत्मिक विकास करण्याची संधी देतात. तसेच ती आपल्याला ज्ञानाचा तिसरा डोळा देतात म्हणूनच मी म्हणतो की प्रसंगी अखंडित वाचित जावे.

पुढे वाचा:

Leave a Reply