प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे निबंध मराठी

ह्या जगात परिश्रमाला पर्याय नाही. आपण ससा आणि कासव ह्यांच्या स्पर्धेत पाहिले आहे की कासव खूप मेहनत करते आणि शेवटी स्पर्धा जिंकते एखाद्या दगडावर जर सतत पाण्याची धार वाहात राहिली तर त्यालाही भेग पडते. त्याप्रमाणेच वारंवार प्रयत्न केले तर माणूस त्या गोष्टीत प्रभुत्व मिळवू शकतो. पारंगत होऊ शकतो. आपल्यातील कलागुणांना अधिक पैलू पाडू शकतो.

तसे पाहिले तर सुतारकाम, शिंपीकाम, लोहारकाम, कुंभारकाम, सोनारकाम आदी सर्व कसबी कामात प्रशिक्षण घेऊन सतत सराव केला असता माणूस त्यात अगदी तरबेज होऊन जातो. पूर्वी हे व्यवसाय आपल्याकडे परंपरागत होते त्यामुळे घरातील मुलांना लहानपणापासूनच त्यातील कसब आणि बारकावे शिकवले जायचे. अर्थात, पहिल्याच दिवशी कुणी एकदम निष्णात् होत नसते. चुकतमाकत शिकतच हळूहळू लोक त्या कलेत प्राविण्य मिळवतात.

कुठलीही विद्या मिळवण्याच्या बाबतीतही ते सत्यच आहे. जुन्या काळी टेपरेकॉर्डरची वगैरे सोय नव्हती तेव्हा गुरूंचे किंवा मोठ्या गायकांचे गाणे ऐकून, त्यांनी घेतलेल्या ताना लक्षात ठेवून नवे गायक पुन्हा पुन्हा रियाज करीत आणि हा रियाज करता करता संगीतही आपोआप आत्मसात् करीत. श्रेष्ठ गायिका माणिक वर्मांनी तसे एका मुलाखतीत सांगितले होते. गानप्रतिभेच्या जोडीला असा रियाज असल्यानेच त्यांचे गाणे श्रोत्यांना दिव्य आनंदाचा लाभ मिळवून देऊ शकले. थोडक्यात काय, प्रतिभा, चिकाटी आणि ध्यास असेल तर माणूस त्या कलेत परिपूर्णतेच्या मार्गावर चालू शकतो. ते नसेल तर काहीच होत नाही. झोपलेल्या सिंहाच्या मुखातही हरीण काही आपोआप येऊन पडत नसते.

डॉक्टरी शिक्षण, इंजिनियरिंग, चार्टर्ड अकाउंटंट अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांत यशस्वीपणे उत्तीर्ण व्हायचे असतील तर सरावाला पर्याय नसतो. डॉक्टरलाही वेगवेगळ्या रोगांची लक्षणे आणि औषधे अगोदर पाठ करावीच लागतात. नंतर त्याला सरावाने ती आपोआपच आठवतात. तसेच नव्यानव्या उपचारपद्धतींचा शोध लागत असल्यामुळे आपले ज्ञानही त्याला अद्ययावत् ठेवावे लागते. मंत्रपठण करणा-या ब्राम्हणाला अगोदर सगळे पूजाविधी पाठ करावे लागतात, नंतरच तो पुरोहिताची कामे करू शकतो.

ज्याप्रमाणे वापरात नसलेल्या हत्याराला गंज चढला की ते निकामी होते तसेच जर सराव ठेवला नाही तर ज्ञानालाही गंज चढतो हे अगदी सत्य आहे. एकलव्याला गुरूचे मार्गदर्शन मिळाले नाही परंतु चिकाटी आणि ध्यासाने तो सराव करीत राहिला आणि त्यामुळेच त्याला अर्जुनाच्या तोडीस तोड ठरणारी धनुर्विद्या आत्मसात् करता आली. कालिदास अभ्यासाने महाकवी बनले. वाल्या कोळी अभ्यासाने वाल्याचा वाल्मिकी बनला. अब्राहम लिंकनही अनेकदा निवडणुकीत हरले पण त्यांनी आपले लोकसेवेचे कार्य सोडले नाही आणि सरतेशेवटी एक दिवस ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.

मात्र एक आहे, ते म्हणजे आपण नेहमी चांगल्या गोष्टींचाच सराव करायला हवा. तरच आपले जीवन सुफळसंपूर्ण होईल. वाईट सवयींचा सराव करणे अयोग्यच आहे. जुगार खेळणे, मद्यपान ह्यांचा सराव करणे कधीही उचित ठरणार नाही हे लक्षात घ्यायला हवे हेही तितकेच खरे आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply