प्रदूषण निबंध मराठी – Pollution Essay in Marathi

आपल्याभोवती असलेले हवा, पाणी आणि माती म्हणजेच आपल्याभोवती असलेला निसर्ग असतो. मानवाला देवाने इतर पशुंपेक्षा शारीरिक ताकद कमी दिली असेल परंतु त्यानेच मानवाला बुद्धीचे वरदान दिले. ह्या बुद्धीच्या वरदानामुळेच मानव आज त्याच्या आसपासच्या . पर्यावरणावर मर्यादित प्रमाणात का होईना परंतु विजय मिळवू शकला आहे. आपले जीवन सुखकर व्हावे म्हणून त्याने निसर्गात खूप काही बदल घडवून आणले. पूर्वी तो शिकार करीत असे तेव्हा त्याला जागोजागी भटकावे लागे. परंतु लौकरच त्याने अग्नीचा शोध लावला, चाकांचा शोध लावला आणि शेतीचाही शोध लावला.

त्यामुळे एका ठिकाणी वस्ती करून राहाणे त्याला शक्य झाले. शेती करता यावी म्हणून त्याने जंगले तोडली आणि मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावर त्याला हव्या त्याच धान्याचे पीक घ्यायला सुरूवात केली. तसेच राहायला नगरे हवीत, रस्ते हवेत म्हणूनही त्याने जंगले तोडली. अशा पद्धतीने मानवाने स्वतःच्या सोयीसाठी आसपासच्या पर्यावरणाला वेठीस धरले. हे करता करता आसपासची हवा, भूमी, जल आणि ध्वनी ह्यांचे प्रदूषण केले.

विज्ञानाची जसजशी प्रगती होऊ लागली तसतशी मानवाची सुखाची लालसा वाढू लागली. जमिनीचा कस वाढावा म्हणून रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर, पिकांवर कीड पडू नये म्हणून कीटकनाशकांची वाढती फवारणी, वाढते औद्योगीकरण आणि ते करताना पर्यावरणाची केलेली अक्षम्य हेळसांड हे मानवाने केलेले मोठे गुन्हे आहेत. कारखान्यांचे आणि शहरांतले सांडपाणी नद्यांत आणि समुद्रात सोडल्यामुळे जलप्रदूषण झाले. दर वर्षी अनेक घातक रासायनिक संयुगांची निर्मिती होत असते. ही सर्व संयुगे हवेत, पाण्यात आणि जमिनीत मिसळतात. तिथून ती मानवी शरीरात जातात. त्यामुळे कर्करोगा- सारख्या प्राणघातक रोगांचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच वाढत्या शहरांसाठी बेलगाम वृक्षतोड होत आहे.

झाडे स्वतःचे अन्न तयार करताना कार्बन वायू घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. परंतु झाडेच कमी झाल्याने हवेतील शुद्धताही कमी होते. त्यातच हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीभोवती असलेल्या ओझोनच्या सरंक्षक थराला भोक पडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे थेट जमिनीवर येऊ शकतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी ते अत्यंत धोकादायक आहे. शिवाय आसपास मोटारींचे आणि वाहनांचे भोंगे, सणांच्या वेळेस ध्वनीवर्धकांचा वाढलेला वापर, मोठ्याने टीव्ही वगैरे लावणे आदी गोष्टींमुळेही ध्वनीप्रदूषण खूप होत आहे.

खरोखर, प्रदूषणाचे हे वाढते प्रमाण आपल्याला विनाशाच्या काठावर तर नेऊन ठेवत नाहीये ना? आपली ही अमर्याद सुखलालसा आपण आवरली नाही तर आपल्या पुढल्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी शिल्लकच नसेल.

प्रदूषण निबंध मराठी – Pollution Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply