Set 1: बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi

पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला जातो. भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग होतो. बैल वर्षभर शेतात कष्ट करतो. त्याच्यामुळे आपल्याला अन्न मिळते. बैल आपला पोशिंदा आहे. त्याचा मान राखण्यासाठी हा सण साजरा केला जातो. म्हणून या सणाला ‘बैलपोळा’ असेही म्हणतात.

पोळा हा सण श्रावणातल्या अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी बैलांच्या कष्टांना सुट्टी असते. त्यांना त्या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी माळरानावर सोडले जाते. आंघोळ घालून सजवले जाते. त्याला ओवाळून त्याची पूजा केली जाते. त्याला वरणापुरणाचे जेवण जेवू घातले जाते. नंतर त्याची मिरवणूकही काढली जाते

हा सण म्हणजे बैलाचा सत्कारच असतो. शेतकरी हा सण मोठ्या कृतज्ञतेने व अत्यंत आनंदाने साजरा करतात.

बैल पोळा निबंध मराठी-bail pola nibandh in marathi
बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi

Set 2: बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi

बैल हा पाळीव प्राणी आहे. त्याचे डोळे टपोरे असतात. त्याला दोन शिंगे व गोंडेदार शेपूट असते. तो काळ्या, पांढऱ्या किंवा तांबूस रंगाचा असतो. तो खूप ताकदवान असतो. बैल गवत, कडबा व पेंड आवडीने खातो. शिवाय आपण जे अन्न घालू तेही खातो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. म्हणून येथे बैलाला फार महत्त्व आहे. नांगराला बैल जोडतात. बैल मोट ओढतो. बैलगाडीतून प्रवास करता येतो व बरेचसे ओझेही वाहून नेता येते. खेडेगावात बैलगाड्यांच्या शर्यतीचा खेळ खेळतात.

पोळा हा सण खास बैलांसाठी साजरा करतात. त्यादिवशी शेतकरी बैलाला कामाला सुट्टी देतात. त्याला नटवतात, सजवतात, त्याची पूजा करतात. त्याला पुरणपोळी खाऊ घालतात. शेतकऱ्याचे जीवन बैलांवर अवलंबून असते. म्हणून शेतकरी बैलाचे उपकार विसरत नाही.

Set 3: बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi

पोळा हा सण बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो. तो महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा किंवा बेंडूर म्हणून मानला जातो. शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतात कष्ट करतो. पण त्याच्या जोडीला असतात बैल.

ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या हातातील चाबकाचे फटके सहन करीत हा बैल काळ्याकभिन्न अशा जमिनीतून सोने पिकविण्यास आणि शेतकरी आणि इतर लोकांचे पोट भरण्यासाठी सतत राबत असतो. पण पोळ्याच्या दिवशी त्याला काम नसते. म्हणून त्या बैलाच्या कष्टाचे मोल करावे, कौतुक करावे यासाठी, पेरणीची कामे संपल्यानंतर शेतकरी हा सण साजरा करतो.

या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सकाळीच स्वच्छ अंघोळ घालतो. त्यानंतर त्याच्या शिंगांना टिंगळ (रंग) दिला जातो. त्याचा खांदा तेलाने चोळून मालिश केले जाते. त्याच्या सर्व अंगावर विविध रंग रंगविले जातात. पायात तोडे, शिंगांना गोंडे तर गळ्यात (शृंगराच्या) घागरमाळा घालून सजविले जाते. त्याच्या पाठीवर सुंदर रंगीबेरंगी झुली घालून संध्याकाळी गावात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.

शेतकऱ्याची पत्नी हळद कुंकू बैलाला लावते व पुरणपोळीही खाऊ घालून त्याचे दर्शन घेते. अशाप्रकारे शेतकरी स्पोळा हा सण आनंदाने साजरा करतात.

Set 4: बैल पोळा निबंध मराठी – Bail Pola Nibandh in Marathi

ज्याप्रमाणे पोंगल हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. त्याचप्रमाणे ‘पोळा’ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीचा व्यवसाय बैलांच्या जिवावरच करता येतो. भारतीय संस्कृतीत गाई बैलाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची पूजा केली जाते.

‘पोळा’ हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतो. ज्या बैलांकडून वर्षभर आपण काम करून घेतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी पहाटेच शेतकरी बैलाला आंघोळ घालतात. मग बैलाला सजविण्याचे काम सुरू होते. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे छापे मारतात. शिंगांना रंग देतात. बैलांच्या गळ्यात घुगूरमाळा घालतात. अंगावर झूल घालतात. बैलं सजले की गावातील सगळ्या बैलांची मिरवणूक काढतात. त्यावेळी तरुण मुले मिरवणुकीपुढे बेभान होऊन नाचतात. त्यानंतर प्रत्येक शेतकरी आपले बैल घरी नेतो. तिथे त्याची पत्नी बैलाची मनोभावे पूजा करते. त्याला पोटभर पुरण पोळी खाऊ घालते. घरातील लहान थोर बैलांच्या पाया पडतात.

बैलांची मिरवणूक ज्यांच्या दारावरून जाते ते लोक बैलांची पूजा करतात. स्वत:च्या मालकीचे बैलं नसले तरी कोणत्याही बैलाची पूजा केल्यास चालते. शहरात बैलं नसतात म्हणून लोक कुंभाराकडून मातीचे बैलं आणून त्यांची पूजा करतात.

पोळ्याच्या दिवशी बैलाला कोणत्याही कामाला लावण्यात येत नाही. त्याला मारत नाहीत. माणसाबद्दलची कृतज्ञता तर कुणीही व्यक्त करतो, पण प्राण्याबहलची कृतज्ञता व्यक्त करण्याचे वैशिष्ट्य जगात फक्त भारतीय संस्कृतीतच दिसते.

पुढे वाचा:

Leave a Reply