शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी – School Sports Day Essay in Marathi

खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या म्हणीचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहेत. निरोगी शरीरासाठी आपल्याला व्यायाम केले पाहिजे व खेळलेही पाहिजे. खेळांमुळे शिस्त, परिश्रम, संघभावना, नेतृत्व यांसारखे गुण वाढीस लागतात. सर्वच शाळा व महाविद्यालयांमध्ये वार्षिक क्रिडादिवसाचे आयोजन केले जाते. आमच्या शाळेतही दरवर्षी क्रिडादिवस साजरा होतो.

यावर्षी आमचा क्रिडादिवस २० डिसेंबर रोजी होता. शहरातील एका नामवंत खेळाडूस मुख्य पाहुणे म्हणून बोलवले होते. आम्हाला सकाळी सात वाजताच शाळेच्या मैदानावर येण्यास सांगितले होते. सर्वप्रथम खालच्या वर्गातील मुलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. यात चमचा-लिंबू शर्यत, दोन मिनीटांत बुट व मोजे घालणे अशा स्पर्धा होत्या. त्यानंतर वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी धावण्याची शर्यत होती. यात १०० मीटर्स, ४०० मीटर्स व १०० मीटर्स अडथळयांची शर्यत या स्पर्धा होत्या. मी ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. या सर्व स्पर्धांमध्ये आमचे रेड हाऊस आघाडीवर होते. त्यानंतर स्लो-सायकलिंगची स्पर्धा झाली. वरच्या वर्गातील ५० विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. ९ व्या वर्गातील एका मुलाने ही स्पर्धा जिंकली. लांब उडी, उंच उडी, गोळा फेक यांसारख्या स्पर्धा ९वी व १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी होत्या.

त्यानंतर सांघिक खेळांच्या स्पर्धा झाल्या. बास्केट बॉल, व्हॉलीबॉलफुटबॉल या स्पर्धा होत्या. व्हॉलीबॉलची स्पर्धा रेड हाऊस व ग्रीन हाऊस यांच्यामध्ये होती. दोन्ही संघाचे खेळाडू सारखेच ताकदीचे असल्याने ही स्पर्धा खूपच चुरशीची झाली. याही स्पर्धेत रेड हाऊसच विजेते ठरले. बास्केट बॉल व फुटबॉलच्या स्पर्धाही खूप उत्कंठापूर्ण झाल्या. सर्वात शेवटी सर्व शिक्षक-शिक्षिकांची १०० मीटर्स धावण्याची शर्यत झाली. आम्ही या स्पर्धेची आतुरतेने वाट पहात होतो. आमच्या पी. टी. च्या शिक्षकांनी स्पर्धा जिंकली.

सर्व स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस समारंभ होता. रेड हाऊसने सर्वोत्तम प्राविण्य चषक मिळवला. ग्रीन हाऊस दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी खेळांचे महत्त्व व त्यांनी मिळविलेली बक्षीसे याबद्दल सांगितले. त्यानंतर सर्वांना चॉकलेट्स वाटण्यात आली व समारंभ संपला. अतिशय उत्साह व आनंदात एक सकाळ घालवून आम्ही घरी परतलो.

शाळेचा वार्षिक क्रिडादिवस निबंध मराठी – School Sports Day Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply