स्पर्धेचे युग मराठी निबंध – Spardheche Yug Nibandh Marathi

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे असे म्हणतात. लहानपणापासूनच मुलांना जणू स्पर्धेतच ढकलले जाते. पहिला नंबर आलाच पाहिजे, अमूक एक कला तुला आलीच पाहिजे, त्या अमक्या मुलाला जमते म्हणजे तुलाही जमलेच पाहिजे, कसे नाही जमत? म्हणून कित्येक पालक आपल्या मुलावर दडपण आणतात आणि त्यांचे बाळपण नासवून टाकतात.

स्पर्धा हवी परंतु ती निकोप स्पर्धा हवी. निकोप स्पर्धा असेल तर अंगच्या गुणांना चालना मिळते. रबराला थोडा ताण द्यावाच लागतो. नाहीतर तो ढिला पडतो. परंतु जास्त ताण दिला तर तो तुटतोसुद्धा. स्पर्धेचेही तसेच आहे. मानवाला मुळात दुस-या व्यक्तीच्या पुढे जाण्याची इच्छा असते, आपण कुणीतरी बनावे, चार लोकांनी आपल्याला नावाजावे ह्या उद्देशाने तो स्पर्धेत उतरतो. परंतु अंगात खिलाडू वृत्ती हवीच कारण स्पर्धा आली की हार-जीतही आली. अपयशाने खचून न जाता पुन्हा उभे राहाणा-यालाच यश मिळते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हणतात त्यात काही खोटे नाही.

दोन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असली तर ती योग्य मार्गाने पुढे न्यायची असते. पहिला नंबर येणा-या मुलाच्या उत्तरपत्रिकेवर शाई ओतून पहिला नंबर मिळवायचा नसतो. दोन शेजा-यांत स्पर्धा असते, दोन देशांतही स्पर्धा असते. माझ्या शेजारच्याने गाडी घेतली की मी ती घेतलीच पाहिजे, मग मला गाडीची गरज असो किंवा नसो, माझी परिस्थिती असो किंवा नसो. असे कधीच करता कामा नये.

आज आपल्याशी पाकिस्तान आणि चीन हे देश शत्रुत्व करतात. त्यामुळे सैन्यदल आणि शस्त्रास्त्रांवर आपल्याला आणि त्यांनाही खर्च करावा लागतो. त्यातूनच दुस-याहून आपल्याकडे अधिक उत्तम शस्त्रास्त्रे हवीत ही शस्त्रस्पर्धा निर्माण होते. त्याचा फायदा अमेरिका आणि युरोपामधील राष्ट्र उठवतात आणि आपल्याला त्यांनी बनवलेली संहारक शस्त्रास्त्रे विकत घेणे भाग पाडतात.

माणसामाणसातील आणि देशादेशातील स्पर्धा जरी घातक असली तरी क्रीडा हे क्षेत्र असे असते जिथे स्पर्धा असतात. ह्या स्पर्धांचा आनंद माणसे मनमुराद लुटतात. जगभर आज फुटबॉलचे आणि क्रिकेटचे सामने होतात. ते पाहायला माणसे भरपूर गर्दी करतात. ऑलिंपिक क्रीडामहोत्सवही दर चार वर्षांनी भरतो. त्या स्पर्धांसाठी कित्येक तरूणतरूणी जीव लावून मेहनत करतात. त्यांना त्या कष्टाचे फळ मिळते. परीक्षेच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट्स खूप मेहनत घेतात आणि ज्ञान मिळवतात. ह्या त्यांच्या ज्ञानाचा फायदा संपूर्ण समाजालाच होतो. त्याशिवाय दर वर्षी होणा-या नाट्यस्पर्धांतून नवेनवे नट, नट्या आणि लेखक, दिग्दर्शक उदयास येतात. दोन कंपन्यात स्पर्धा असते परंतु तशी स्पर्धा नसेल तर एकाच कंपनीची एकाधिकारशाही होईल आणि ती कंपनी चढे भाव ठेवून लूटमार करील.

त्यामुळे स्पर्धा वाईटच असतात असे म्हणता येत नाही. योग्य ती स्पर्धा प्रगती आणि विकासासाठी आवश्यक असतेच.

स्पर्धेचे युग मराठी निबंध – Spardheche Yug Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply