स्त्री शिक्षणाचे महत्व निबंध मराठी – Stri Shikshanache Mahatva Essay in Marathi

आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत एके काळी गार्गी आणि मैत्रेयीसारख्या विदुषी होऊन गेल्या, परंतु वेदांचा तो काळ सोडला तर पुढे मात्र स्त्रियांची परिस्थिती अत्यंत शोचनीय बनली. ‘ न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य नाही तसेच ‘ स्त्रियांना आणि शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही’ असे ठरवण्यात आले. त्यामुळे केवळ चूल आणि मूल एवढेच केवळ स्त्रियांचे कार्यक्षेत्र बनले. शिक्षण नसल्यामुळे आणि बाहेरच्या जगाचा वाराही न लागल्यामुळे त्या अडाणी आणि परावलंबी बनल्या. त्यांना पुरूषांवर संपूर्णपणे अवलंबून राहावे लागू लागले. पती जर मरण पावला तर त्यांची स्थिती फारच दयनीय बनूलागली.

परंतु मागील दोन शतकांमध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परिस्थिती बदलू लागली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, राजा राममोहन रॉय इत्यादी सुधारकांनी भारतात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. त्यातूनच पुढे डॉ. आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई, डॉ. रखमाबाई इत्यादी स्त्रियांनी उच्च शिक्षण घेतले आणि समाजापुढे महान आदर्श ठेवला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तर सर्वांनाच स्त्रीशिक्षणाचे महत्व समजले. राजकारण, वद्यक, वकील, पोलिस, सेना अशा सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आज उज्वल कामगिरी करून दाखवली आहे.

त्यांनी सिद्ध केले आहे की त्या पुरूषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत. खरे तर स्त्री ही तिच्या बाळाची पहिली गुरू असते. जन्मल्यापासून ते वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मूल आपल्या आईच्या जवळ असते. तीजे संस्कार करते ते संस्कार जीवनभर मुलावर राहातात. प्रत्येक महान व्यक्तीला घडवण्यामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते. त्यामुळेच ती जर शिकलेली नसेल तर ती आपल्या मुलांना काय शिकवणार? एक पुरूष शिकला तर फक्त तोच शिकतो परंतु एक स्त्री शिकली तर तिचे संपूर्ण कुटुंब शिकते. म्हणूनच स्त्री शिक्षणाला महत्व आहे.

सुशिक्षित स्त्री जीवनातील प्रत्येक समस्येला तोंड देण्याचे मार्ग सुजाणपणे निवडू शकते. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनू शकते. त्यामुळेच तिच्या बोलण्याला वजन प्राप्त होते. तिच्या बुद्धीचा विकास झाल्यामुळे ती आपल्या आणि घरातील सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते. ती अंधश्रद्धांना बळी पडत नाही. ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र सर्वांच्या हिताचा विचार करू शकते. आजकाल राजकारणात स्त्रियांना तीस टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत. त्यामुळे स्त्रिया पुढे येतील अशी अपेक्षा आहे.

भारताला जर उद्याची महासत्ता व्हायचे असेल तर येथील स्त्रीशिक्षणाला पर्यायच नाही हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. असे आहे स्त्रीशिक्षणाचे महत्व.

स्त्री शिक्षणाचे महत्व निबंध मराठी – Stri Shikshanache Mahatva Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply