तरूण पिढीची नैतिकता निबंध मराठी

“आजकालची तरूण मुले म्हणजे अगदी उच्छंखल झाली आहेत. त्यांना कसलेही बंधन नको असते. हवे तेव्हा वाटेल तसे उंडारणे, त-हे तहेच्या फॅशन्स करणे, आईवडिलांचे पैसे उधळणे ह्यातच त्यांचा सगळा वेळ जातो. मुलगे आणि मुली एकत्र फिरतात, मनाला हवे तसे वागतात, आमच्या वेळेस असे नव्हते,” असे समाजातील वयस्कर आणि मध्यमवयीन पिढीचे लोक म्हणत असतात. परंतु आपण स्वतः तरूणपणी कसे वागत होतो हे मात्र तेसोयीस्करपणे विसरतात.

अर्थात् तरूण पिढीवर घेतला जाणारा हा आक्षेप थोड्या प्रमाणात खरा असला तरी सर्वच तरूण तसे नसतात. आजच्या मुलामुलींची नैतिकता हरवली आहे, त्यांना नीतिमत्ता कशाशी खातात हे माहितीच नसते असा त्यांच्यावर आरोप होतो. पण ही मुले अचानक एकदम तरूण होतात काय? ती जेव्हा लहान असतात तेव्हा ती आपल्या पालकांच्याच घरात राहात असतात ना? मग तेव्हा हे नावे ठेवणारे पालक त्यांच्यावर योग्य ते संस्कार का करीत नाहीत? असा प्रश्न पडतो.

त्याचे असे आहे की काळ बदलतो, तसतसा समाजही बदलतो, नवेनवे शोध लागतात. त्यामुळे जीवनशैलीच बदलून जाते. हेच बघा ना, मोबाईल आला, इंटरनेट आले, टीव्हीवर चोवीस तास चालणा-या कार्यक्रमांचा महापूर लोटला. विभक्त कुटुंब पद्धती आली. घरात बसवून ठेवल्या जाणा-या स्त्रिया शिकल्या, उच्चशिक्षित झाल्या, बाहेर कामाला जाऊ लागल्या, करियर करू लागल्या. वरील सर्व कारणांनी नीतिमत्तेच्या कल्पनाही बदलल्या.

आता ही नीतिमत्ता म्हणजे काय ते तपासून पाहू. जगातील सर्व धर्मग्रंथात वागण्याचे नियम घालून दिले आहेत. ते नियम ते ग्रंथ ज्या काळात लिहिले गेले त्या काळासाठी योग्य होते. परंतु काळ बदलला, नवे नवे शोध लागले, माणसाची विचारसरणी बदलली. त्यामुळे ह्या नीतीच्या कल्पनाही बदलल्या. उदाहरणार्थ, स्त्रियांना आणि शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही असे मनुस्मृतीत लिहिले आहे. पण आपण ते आज मानत नाही. हिंदूंना समुद्र ओलांडून जाणे वर्ण्य होते, तेही आपण आज मानत नाही. विधवा केशवपन, सती इत्यादी प्रथा चुकीच्या म्हणून आपण सोडून दिल्या. म्हणजेच काय, समाजात सतत नवे विचार आणि नवे नीतीनियम बनत असतात. हे आपण मान्य करायला हवे.

थिल्लरपणा न करणे, प्रामाणिकपणाने वागणे, शिस्त पाळणे, वेळ पाळणे, मनापासून काम करणे, अभ्यास करणे ह्यात नैतिकता आहे. एकमेकांना मदत करणे, वडिलधा-यांचा आदर ठेवणे ह्यात नैतिकता आहे.

आजचे तरूण आसपास काय पाहातात? कॉप्या करून उत्तीर्ण होता येते, पैसे देऊन गुण वाढवता येतात, खोट्या पदव्या मिळवता येतात, लाच दिल्याशिवाय सरकारी कामे होत नाहीत, नव्या नव्या घोटाळ्यांच्या बातम्या रोज वर्तमानपत्रात येत असतात. ह्याचा अर्थ एकुणच समाजाची नीतिमत्ता ढासळली आहे. मग त्यात तरूणांचा अपवाद कसा असेल बरं?

परंतु सगळेच चित्र निराशादायक नाही. कित्येक तरूणतरूणी खूप कष्ट करतात, डॉक्टर, इंजिनियर, सीए, पत्रकार आणि असे अनेक अभ्यासक्रम शिकतात. डॉ. अभय बंग ह्यांच्या निर्माण शिबिरात जाऊन समाजसेवेचा वसा घेतात. त्यामुळेच तरूण पिढीची नैतिकता ढासळली आहे असे सरसकट म्हणता येणारच नाही. खरे तर तरूण पिढी ही तर आपली उद्याची अशा आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply