भ्रष्टाचार निबंध मराठी – Corruption Essay in Marathi
मानव हा समाजात राहाणारा प्राणी आहे. तो एकटादुकटा राहू शकत नाही. समाजात राहूनच तो जीवन जगतो आणि स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा विकास करतो. ज्या समाजात सत्प्रवृत्ती अधिक असतात तो समाज श्रेष्ठ समाज म्हणून गणला जातो. समाज सत्प्रवृत्त असेल तर राष्ट्राची प्रगती होते. ह्याविरूद्ध समाजात एकी नसेल, लाचलुचपत, भ्रष्टाचार ह्यांची कीड लागली असेल तर त्या समाजाची प्रगती होत नाही. पर्यायाने त्या देशाचीही प्रगती होत नाही. भ्रष्टाचार हा असा महाभयंकर रोग आहे ज्यामुळे देशात अशांती, स्वार्थी वृत्ती, अनैतिकता ह्यांचा बुजबुजाट होतो. भारताबाबतीत म्हणायचे झाले तर लोकसंख्यावाढीच्या समस्येसोबत गरीबी, महागाई, अशिक्षितपणा, बेकारी इत्यादी प्रश्न निर्माण झाले आणि त्यात भ्रष्टाचाराची भर पडल्यामुळे ह्या समस्या आणखीनच भीषण झाल्या.
आज असे दिसते की ब-याच क्षेत्रांत भ्रष्टाचाराने आपली पावले रोवलेली आहेत. वरपासून खालपर्यंत ही कीड लागली आहे. भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमावून आपले घर भरण्यात आणि त्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यात लोकांना काहीही गैर वाटेनासे झाले आहे. लाच दिली नाही तर कचेरीतील फाईल पुढे सरकत नाही. फायदा मिळावा म्हणून भेटवस्तू द्याव्या लागतात. मूठ गरम केली की नोकरी मिळते. काळा बाजार, करांची चोरी ह्यात समाजातील सर्व थरातील मंडळी गुंतलेली असतात. शिपायापासून ते मंत्र्यापर्यंत सर्व लोक खरीदले आणि विकले जाऊ शकतात. औषधे, दूध, अन्नपदार्थ ह्यात भेसळ होते, ती कधीकधी जीवावर उठणारी ठरू शकते. येनकेन प्रकारेण मला पैसा मिळाला पाहिजे मग त्यासाठी दुस-या कुणाचे वाट्टोळे का होईना अशी मानसिकता निर्माण झाली आहे. खरोखर भ्रष्टाचारी व्यक्तींनी ह्या देशाची जेवढी लूटमार केली आहे तेवढी देशावर आलेल्या परचक्रामुळेही झाली नसेल.
भ्रष्टाचाराचा हा महारोग नष्ट करण्यासाठी तो समाजातूनच नष्ट व्हायला हवा. त्यासाठी काळ्या पैशावर चाप लावला पाहिजे. आधारकार्ड आणि पॅनकार्डाची सक्ती, तसेच वीस हजार रूपयांवरील रक्कम देताघेताना चेकनेच दिली पाहिजे अशी काही स्तुत्य पावले सरकारने त्या बाबतीत उचलली आहेत, त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागेल. शासनव्यवस्थेतही परिवर्तन झाले पाहिजे. राजकारणी आणि गुन्हेगारांचे संबंध तुटले पाहिजेत. राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी लागणारे पैसे चेकने स्वीकारता आले पाहिजेत. भ्रष्टाचाराचा उगम तिथूनच होतो. गृहबांधणी उद्योगातही काळ्या पैशाची खूप उलाढाल होते. ह्या सर्व गैर गोष्टींना चाप लावण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची जरूरी आहे.
म्हणूनच चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत, शिस्त आणि नियमांचे कठोर पालन झाले पाहिजे.भ्रष्टाचा-यांना कठोर शासन झाले पाहिजे आणि नैतिकतेचे संस्कार बालवयापासूनच झाले पाहिजेत. तरच भ्रष्टाचाराच्या रोगाचा समूळ बिमोड करता येईल.
भ्रष्टाचार निबंध मराठी – Corruption Essay in Marathi
मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात राहून जीवन जगत असताना तो स्वत:चा व राष्ट्राचा विकास करतो. अशा रीतीने समाजच राष्ट्राच्या विकासाची आधारशिला आहे. ज्या समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात तो समाज चांगला समजला जातो, असा समाज राष्ट्राच्या प्रगतीला मदत करतो. जर समाजात वाईट प्रवृत्ती असतील तर तो समाज भ्रष्टाचारी असतो. भ्रष्टाचार राष्ट्राला पतनाच्या गर्तेत घेऊन जातो. भ्रष्ट + आचार मिळून भ्रष्टाचार ही संधी होते. भ्रष्ट आचरण करणे म्हणजे भ्रष्टाचार करणे. भ्रष्टाचार हा असा महारोग आहे जो राष्ट्राला अशांती, स्वार्थीपणा, अनैतिकतेचा बालेकिल्ला बनवितो. अंतर्मनाला खिळखिळे करून टाकतो.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचा विकास दर कोणताही असला तरी लोकसंख्या आणि भ्रष्टाचार वाढीचा दर भरपूर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक चीनचा लागतो. भ्रष्टाचाराबाबत आपला तिसरा क्रमांक आहे. पहिला व दुसरा क्रमांक अनुक्रमे इंडोनेशिया व चीनचा आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे बेरोजगारी, गरिबी, चलनवाढ, भूकबळी, अशिक्षितपणा इत्यादी प्रश्न निर्माण झाले. भ्रष्टाचारामुळे या प्रश्नांनी विक्राळपणा धारण केला. लोकसंख्या वाढली की वस्तूंची मागणी वाढते. पण भ्रष्टाचारामुळे वस्तूंची लालसा वाढते.
संपूर्ण भारतात भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्र भ्रष्टाचारापासून अलिप्त राहिलेले नाही. लहानात लहान कर्मचाऱ्यापासून मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सगळे जण या रोगाने ग्रस्त आहेत. कोणी कोणत्या का पदावर असेना भ्रष्टाचाराच्या वाहत्या गंगेत स्नान करणे आपले पवित्र कर्तव्य समजतो. भ्रष्टाचाराने सगळे आपले घर भरू लागले आहेत. लाच दिल्याखेरीज कार्यालयात फाईल पुढे सरकत नाही. भेट दिली तर फायदा होईल. मूठ गरम केली तर नोकरी मिळेल. इतकेच नव्हे तर हुंडा दिल्याशिवाय मुलीला वर मिळत नाही. जणू ती कन्या नसून खरेदी-विक्रीची वस्तू आहे. कधी तरी वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त गुण मिळतात. तर वर्षभर जिवापाड मेहनत करणारा विद्यार्थी मागे राहतो. काळा बाजार, कराची चोरी होते. चपराशापासून मंत्र्यांपर्यंत विकले-खरीदले जातात. औषधे नकली तर खाण्या-पिण्याच्या पदार्थांत भेसळ असते. भ्रष्टाचारी दोन्ही हातांनी देशाला लुटत आहेत.
जसजसा काळ जात आहे तसतसा भ्रष्टाचार वाढत आहे. लोक आपली प्राचीन संस्कृती विसरून गेले आहेत. त्यागाची भावना नष्ट झाली आहे. राष्ट्र प्रेमाचा अभाव आहे. लोक म्हणत गांधीजी असोत नसोत गांधीवाद राहील, नथुराम गोडसेने गांधीजीचा खून करून टाकला. ज्या गांधीवादाकडे सारे जग आदराने पाहत होते त्याच गांधीवादाची आता रोज हत्या होते आहे.
हे युग ईहवादी आहे. धन त्याचे मुख्य अंग आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धनाचेच महत्त्व दिसते. एखाद्या व्यक्तीजवळ किती धन आहे यावर तिच्याबद्दलचा आदर अवलंबून असतो. वाईट मार्गाने पैसा कमावण्याची वृत्ती वाढत आहे. धर्मकर्माला लोक तिलांजली देऊ लागले आहेत. कारण धनाचा विजय व धर्मकर्माची हार होत आहे. पैशाने धर्म कर्म सगळे काही खरेदी करता येते. धनाची साधना करणारे लोक हे विसरले की त्यांच्याजवळ धन कोणत्या मार्गाने येते. ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता. त्याच आज लोकांना फक्त धन दिसते. पैशासाठी लोक वाटेल ते वाईट कर्म करण्यास तयार होतात. ते नैतिकता आणि मानवतेची मूल्ये विसरली आहेत व धनाच्या अधीन झाले आहेत.
प्रशासनाची शिथिलता हे पण भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण आहे. पुढारी नोटांच्या मोबदल्यात मते विकत घेऊन सत्तारुढ होतात. निवडणुकीत जिंकून येण्यासाठी अनेक वाईट मार्गाचा अवलंब करतात. भ्रष्ट पुढारी भ्रष्टाचार मिटविण्याच्या घोषणा करून भ्रष्टाचारानेच आपले घर भरतो व पुढील निवडणुकीसाठी पैसा जमा करतो. आपल्या प्रशासनातील प्रत्येक कार्य कासवाच्या गतीने होते. म्हणून सामान्य जनता लाच देण्यास प्रवृत्त होते.
उपासमार, बेरोजगारी, महागाई, गरिबी, निरक्षरता इ. मुळे भ्रष्टाचाराचा जन्म होतो. माणूस भुकेला असला की त्याला काही सुचत नाही. आपले पोट भरण्यासाठी तो वाईट काम करतो. म्हणतात ना?
“भुकेल्या पोटी भजन सुचत नाही” आज बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे आहे. शिकलेले अनेक तरुण-तरुणी बेकार असल्यामुळे शेवटी वाईट मार्गाला लागतात. वाढती महागाईसुद्धा अप्रत्यक्षपणे माणसाला भ्रष्टाचारी बनविते. गरीब माणूस घर चालविण्यासाठी अप्रामाणिक होतो. अशिक्षित माणसाला चांगल्या-वाईटाची ओळख नसते. तो कळत नकळत दुसऱ्याच्या हातातील खेळणे बनून भ्रष्टाचाराला गती देतो.
नैतिक मूल्यांचा-हास हे पण भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण आहे. शिक्षण हा व्यवसाय झाल्यामुळे नैतिक शिक्षण जनसामान्यांपासून दूर जात आहे. अशा वातावरणात माणूस भ्रष्ट होण्याची शक्यता वाढते.
भ्रष्टाचाररूपी या महारोगाची लागण थांबून हा रोग समाजातून नष्ट झालाच पाहिजे. यासाठी त्याची कारणे शोधून ती नष्ट केली पाहिजेत. शासन व्यवस्थेत काही परिवर्तने केली पाहिजेत. राजकारणी आणि गुन्हेगारांचे संबंध तुटले पाहिजेत. चांगले लोक राजकारणात यावेत यासाठी काही तरी उपाययोजना केली पाहिजे. शिस्तीचे आणि नियमांचे पालन कठोरपणे केले पाहिजे. भ्रष्टाचाऱ्यास कठोर शासन झाले पाहिजे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले पाहिजे. चलनवाढ थांबवून देशाची अर्थव्यवस्था सुदृढ़ केल्यास त्यामुळे उपासमार, गरिबी, बेरोजगारी इ. नष्ट होईल. अन्य उपायांचाही अवलंब करावा. नैतिक शिक्षण अनिवार्य करण्यात यावे. त्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर करावा. शिक्षणामुळे चांगल्या-वाईटाचे ज्ञान होऊन मनुष्य भ्रष्टाचारापासून दूर पळतो. .
जो सदाचारी असतो त्याचा आदर करण्यात यावा. भ्रष्टाचाराची निंदा करण्यात यावी. आपण जे बोलतो तेच आपण करावे स्वतः भ्रष्ट आचरण करू नये व दुसऱ्यांनाही करू देऊ नये. आदर्श मानवी मूल्यांची स्थापना करून भ्रष्टाचाराला बाहेरचा रस्ता दाखवावा. अन्यथा आपले राष्ट्र खंडित होण्याचा धोका निर्माण होईल.
पुढे वाचा:
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध
- भारतीय शेतकरी निबंध मराठी
- भारतीय लोकशाही निबंध मराठी
- भारतीय राज्यघटना निबंध मराठी
- भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
- भारतातील वनसंपदा निबंध मराठी
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
- डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
- भारत माझा जगी महान मराठी निबंध
- विविधतेत एकता निबंध मराठी
- भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
- भाऊबीज निबंध मराठी
- भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत