Set 1: मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी – Manoranjanachi Adhunik Sadhane Nibandh Marathi
खूप पूर्वी मनोरंजन म्हणजे प्रेक्षकांसमोर दाखवलेली एखादी कला किंवा खेळ असे. पूर्वी माकडवाले, दोरीवरून तोल सांभाळत चालणारे डोंबारी, अस्वल घेऊन फिरणारे दरवेशी गावोगाव फिरत असत आणि खेळ दाखवून लोकांकडून पैसे मिळवत असत. तेव्हा लोकांना इतर काही मनोरंजनाची साधने नव्हती, त्यामुळे लहान मुले आणि अगदी मोठी , माणसेसुद्धा हे खेळ आवडीने पाहात. नाटके तर पार भरतमुनींच्या काळापासून होत आहेत. भरतमुनीलिखित नाट्यशास्त्र ह्या संस्कृत ग्रंथात नाटक कसे करावे ह्याचे विस्तृत विवेचन आढळते. महाराष्ट्रातील लोकांना नाटकांचे फार वेड होते आणि आहे.
त्यामुळे पूर्वी खेडोपाडी नाटके होत असत ती पहाटेपर्यंत चालत. बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब फाटक असे दिग्गज नट त्या काळात होऊन गेले. त्याशिवाय गावोगावी मंदिरात कीर्तने होत. कीर्तने करणारे कीर्तनकार अत्यंत रसाळ भाषेत पुराणातल्या कथा सांगून त्यांचा संदर्भ आजच्याही काळाशी जोडत.गावोगावी जत्रा भरत. ह्या जत्रेच्या निमित्ताने तमाशाचे फड गावात येत. ही सर्व जुन्या काळची मनोरंजनाची साधनेच होती.
त्यानंतर विज्ञानाने बरेच शोध लावले. चित्रपट हा त्यातीलच एक शोध होता. भारतात दादासाहेब फाळके ह्यांनी सर्वप्रथम मूकचित्रपट बनवला. मग गावोगावी टुरिंग टॉकीज निघाल्या. ह्या मूकपटात संवाद अजिबात नसे. त्यामुळे त्या चित्रपटांमध्ये शारीरिक हालचाली आणि प्रसंगनिष्ठ विनोदांवर अधिक भर द्यावा लागे. चार्ली चॅप्लिनचे काही मूकपट अजरामर आहेत. नंतर बोलपट निघाले. त्यातले नट आणि नट्या जगप्रसिद्ध होऊ लागले.
त्याशिवाय रेडियो आणि टीव्ही हीसुद्धा मनोरंजनाची साधने निघाली होतीच. ह्या साधनांमुळे घरबसल्या मनोरंजन होऊ लागले आणि ज्ञानही मिळू लागले. वृत्तपत्रे, मासिके हीसुद्धा मनोरंजनाची साधनेच आहेत. हल्ली त्या जोडीला फेसबुक, मोबाईल, इंटरनेट इत्यादी नवीन साधने माणसाचे मनोरंजन करण्यासाठी निर्माण झाली आहेत.
आता थोडक्यात असे झाले आहे की मनोरंजनाचा महापूरच निर्माण झाला आहे. मात्र माणसापाशी वेळ थोडा आहे. रात्र थोडी सोंगे फार, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या महापुरात गुदमरून न जाता आपली महत्वाची कामेही करीत राहाणे हेच आता कौशल्याचे काम झाले आहे.
Set 2: मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी – Manoranjanachi Adhunik Sadhane Nibandh Marathi
दिवसभर काम केल्यावर आपण थकतो. हा थकवा शारीरिक व मानसिक असा दोन्ही प्रकारचा असतो. आपल्या नेहमीच्या व्यापामुळे आपण कंटाळतो. कंटाळा किंवा थकवा दूर व्हावा यासाठी आपण स्वत:चे मनोरंजन करतो. मनोरंजनामुळे आपले मन व शरीर दोन्हीही ताजेतवाने होते. मनाला आनंद मिळतो. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने मर्यादित होती. परंतु आजच्या आधुनिक युगात मात्र अशी अनेक साधने व मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी वेगवेळ्या असतात. त्यानुसार प्रत्येक जण स्वत:चे मनोरंजन करवून घेतो. चे
जुन्या जमान्यात मनोरंजनाची साधने फारच कमी होती. त्यात मुख्यतः शिकार करणे, नृत्य, चित्रकला, घोडदौड, प्राण्यांच्या झुंजी, उत्सव साजरे करणे इत्यादीचा समावेश होत असे. परंतु विज्ञानातील नवनवीन शोधांबरोबरच ही साधने बदलत गेली. मानव हा मुळतः प्रयोगशील व चंचल प्राणी असल्याने तो सतत नवनवीन साधनांच्या शोधात असतो. मनोरंजनाच्या आधुनिक साधनात टेलीफोन, रेडीओ, दूरचित्रवाणी, सिनेमा, कॅमेरा, टेप रेकॉर्डर, कंप्यूटर्स आणि सध्याचे इंटरनेट यांचा समावेश होतो.
टेलीफोन हे संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन आहे. आज फोन व मोबाईल याशिवाय आपण जीवनाचा विचारही करु शकत नाही. रेडीओ व टेपरेकॉर्डरच्या मदतीने आपण आवडीचे संगीत ऐकू शकतो. टि. व्ही. आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. त्याद्वारे आपण चित्रपट पाहू शकतो, संगीत ऐकू शकतो किंवा घर बसल्या जगभरातील बातम्या ऐकू शकतो. संगणक व इंटरनेट मुळे तर आपल्या जीवनात मोठीच क्रांती झाली. त्याद्वारे आपण माहितीही मिळवू शकतो आणि मनोरंजनही होते. संगणक व व्हिडीओवरील गेम्स किती लोकप्रिय आहेत.
इंटरनेट द्वारे आपण नव-नवीन मित्र मिळवू शकतो, चर्चा करु शकतो किंवा आपल्या आवडीचे कुठलेही काम करु शकतो. या इलेक्ट्रॉनिक साधनांशिवाय मनोरंजनाची इतरही अनेक साधने आहेत. खेळांद्वारेही आपण आपले मनोरंजन करु शकतो. त्यामुळे आपणास उत्साह येतो तसेच तब्बेतही चांगली रहाते. चित्रकला, नृत्य, पर्वतारोहण, पोहोणे, वाचन, पर्यटन हे देखील मनोरंजनाचे चांगले पर्याय आहेत. माणूस मनोरंजनप्रिय असल्याने तो नवनवीन साधने व मार्ग सतत शोधतच रहाणार.
पुढे वाचा:
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध
- भारतीय शेतकरी निबंध मराठी
- भारतीय लोकशाही निबंध मराठी
- भारतीय राज्यघटना निबंध मराठी
- भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
- भारतातील वनसंपदा निबंध मराठी
- भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
- डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
- भारत माझा जगी महान मराठी निबंध
- विविधतेत एकता निबंध मराठी