पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम – Pruthvivar Pradushanache Parinam in Marathi

हाय ! कुणी मला या प्रदुषणाच्या विळख्यातून वाचवेल का ? असे विव्हल उद्गार रोज पृथ्वीच्या म्हणजेच आपल्या भूमातेच्या पोटातून निघत आहेत असेच आपणास रोज ऐकावयास येते. खरंच आम्ही मनुष्यप्राणी या भूतलावरील भार आहोत. सर्व बाजूंनी या भूमातेची कुचबणा, विटंबना करण्यास कारणीभूत आहोत. म्हणजे भूमीला प्रदूषणयुक्त बनवत आहोत तिच्या अंगाप्रत्यांगांची वाताहात करत आहोत. हजारो वर्षापासून मानवजात या पृथ्वीतलावर बसली आहे. पण आजचा मानव तिचा कली म्हणून अवतरला आहे. तो आपल्या स्वार्थासाठी तिचे खनन करत आहे. खनिजे मिळवण्यासाठी खाणीतुन नैसर्गिक संपत्ती लूटत आहे. सृष्टीचे सौंदर्य नष्ट करत आहे. निरनिराळे प्रकल्प उभारण्यासाठी जमिनीला खचवत आहे.

इमारती, कारखाने, रस्ते बांधण्यासाठी माणसाने वृक्षतोड केली. किलबिलणारे पक्षी, मंजूळ गाणी गात चिवचिवत, झऱ्यातील पाणी पिऊन स्वच्छंदपणे बागडणारे पशुगण जलाशयात डुंबून विराट वृक्षाखाली विसावा घेत. त्यांचा निवाराच या मनुष्याने नष्ट केला. त्यामुळे त्यांचा शिरकाव मनुष्यवस्तीत होऊ लागला. वरुन कांगावा करत हा मनूष्यप्राणी त्यांच्या प्राणांचा शत्रू झाला आहे. त्यांची कत्तल करुन त्यांच्या अवयवांचा व्यापार करत आहे. बागडणारे व स्वैर विहरणारे पशुपक्षी यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कळपातील प्राणी एकाकी पडले आहेत. या करणीला केवळ मनुष्यच जबाबदार आहे. या भूतलावर रहाण्याचा फक्त आपलाच हक्क आहे याप्रमाणे मनुष्य वागत आहे. स्वत:च्या लोकसंख्येला आळा न घालता दुसऱ्या प्राणीमात्राची हत्या करत आहे कारण बुद्धीचे वरदान लाभलेला मनुष्य ‘हम करेसो कायदा’ या उक्तीप्रमाणे सगळीकडे संचार करत आहे.

निरनिराळ्या रासायनिक कारखान्यातुन निघणारे घातक वायू एके दिवशी त्याच्याच घातास कारणीभूत ठरतील, पण तेव्हा वेळ निघून गेली असेल. त्या विषारी वायूंच्या दुष्परिणामामुळे हृदयविकार, रक्तविकार, कर्करोग, श्वसनाचे रोग या रोगांचा सामना करावा लागेल. सुधारणेच्या कारणापोटी नैसर्गिक शक्ती आणि साधनसंपत्तीची लयलूट होत आहे. शास्त्राचे शस्त्र वापरुन मनुष्य आपल्याच पायावर कु-हाड मारुन घेत आहे. त्यामुळे परतीचा मार्ग बंद झाला आहे. समोर मृत्यूचा सापळा व पाठीमागे रोग आणि रोगजंतूनी व्यापलेले विश्व त्यामुळे मनुष्याची अवस्था त्रिशंकूप्रमाणे झाली आहे.

मनुष्य सर्व प्राणीमात्रांत बुद्धीजीवी म्हणून गणला जातो. त्यामुळे कृषीसुधारणा, करण्यासाठी संकरित बी बियाणे. जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक खते, औषधे तसेच तांत्रिक उपाययोजना यामुळे जमिनी नापिक होऊन गेल्या. कारखाने व त्यातून सोडलेले विषारी वायू आणि सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने आरोग्यास घातक झाले आहे त्यामुळे हे रसायनमिश्रित पाणी पिऊन वांत्या, आंतड्याचे रोग होतात.

निरनिराळे सण निरनिराळ्या देशात प्रसंगानुरुप साजरे केले जातात पण आजचा प्रगत मानव निरनिराळे शोध लावून रसायने वापरुन होळीचे रंग, फटाके बनवत आहे. शिवाय प्रत्येक सण साजरा करण्याची रीतदेखील न्यारी बँडबाजा, ढोलताशा आणि कमाल आवाजातील गाण्यांच्या रेकॉर्डस् यामुळे लहानबालके, रुग्ण, वृद्ध यांना किती त्रास होतो याची तमाच नसते. मोठा गाजावाजा व आवाज जितका जास्त तितका आनंद जास्त, असे जणू समीकरणच बनले आहे त्यामुळे आवाजाची तीव्रता वाढतच जाते. त्याच्या दुष्परिणामामुळे उच्चरक्तदाब, बधिरपणा, चीडचीडेपणा वाढत जातो व मनुष्यदेह दुःखाचे व रोगाचे कोठार बनून जातो.

या प्रदूषणाची तीव्रता थेट अवकाशापर्यंत पोहोचली आहे. विश्वसंशोधन, अवकाशीय शोध यामुळे निरनिराळे उपग्रह, क्षेपणास्त्रे अवकाशात पाठवली जातात आणि याचा परिणाम म्हणून ऋतुचक्र बदल, रसायनमिश्रित पाऊस पडतो. हिवाळ्यात थंडी जाणवत नाही, पावसाळ्यात पाऊसच गडप होतो आणि उष्माघाताने मनुष्याचा बळी जातो. दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याचा अभाव जाणवतो त्यामुळे जमीनी वैराण, वाळवंटी बनल्या आहेत. खाणी, विहिरी आणि कूपनलिका यांच्या उपशामुळे भूजलसाठा संपला आहे. प्राणीमात्रांचीही ‘दे माय धरणी ठाय’ अशी अवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलन् मैल हिंडावे लागते.

सूर्यापासून बाहेर पडणारी अतिनील किरणे थेट आपल्यापर्यंत पोहचून निरनिराळ्या त्वचारोगांना बळी पडावे लागते. प्रदूषणामुळे आपला संरक्षक असा ओझाने वायूचा स्तर विरळ होत आहे आणि कवीच्या कल्पनेप्रमाणे ‘पृथ्वी या कराने करीन थांबती’ अशी अवस्था होऊ घातली आहे. त्यामुळे पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण चक्र बदलते आहे. दिवसरात्र आणि ऋतुचक्र बदलत आहे. मानवाच्या या कुकर्माने धरणीवर ताण पडतो आणि वारंवार भूकंप, भूपटटे तयार होणे, दुष्काळ किंवा पूरस्थिती प्राप्त होते. यामुळे प्राणहानी, वित्तहानी होवून स्वत:च्या नाशाला मनुष्यच कारणीभूत होतो आहे. पशुपक्ष्यांचे स्थैर्य नष्ट झाले आहे. म्हणूनच मनुष्याला सांगावेसे वाटते ‘मानवराजा जागा हो’ ‘जगा आणि जगू द्या’ हा मंत्र जपा. सृष्टीचा विनाश होण्यापासून सावध व्हा म्हणजे जीवितकार्य सुरळीत चालू राहील, नाहीतर भूमीचा संहार अटळ आहे.

पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम

पुढे वाचा:

Leave a Reply